आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलशन कुमार यांची कहाणी:कधी वडिलांसोबत ज्यूस विकायचे गुलशन कुमार, कॅसेट्स विकून उभी केली कोट्यवधींची इंडस्ट्री; मंदिराबाहेर 16 गोळ्या झाडून करण्यात आली होती हत्या

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुलशन कुमार यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईच्या दक्षिण अंधेरी परिसरातील जितेश्वर महादेव मंदिराच्या बाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी दोषी अब्दुल रौफ उर्फ ​​दाऊद मर्चंटची याचिका मुंबई हायकोर्टाने गुरुवारी फेटाळून लावली. मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी अब्दुल रौफची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. आरोपीची गुन्हेगारी पाश्वभूमी आहे आणि तो एकदा फरारही झाला होता. त्यामुळे त्याचा सहानुभूतीने विचार होऊ शकत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे. रौफला कलम 392 आणि 397 च्या आरोपातून न्यायालयाने मुक्त केले आहे.

न्या. साधना जाधव आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने ही शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाने 29 एप्रिल 2002 रोजी अब्दुल रौफ दाऊद मर्चंटला भादंवि कलम 302, 307, 120 ब इ. आरोपात ( हत्या, हत्येचा प्रयत्न, कटकारस्थान) दोषी ठरविले होते. या निर्णयाला त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

उच्च न्यायालयाने अन्य आरोपी निर्माता रमेश तौरानी यांच्या विरोधात राज्य सरकारने केलेले अपील नामंजूर केले आहे. त्यामुळे तौरानी यांना दिलासा मिळाला आहे.

व्यावसायिक कारणातून गुलशन कुमार यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी जुहूमध्ये हत्या झाली होती. हत्येनंतर अब्दुल रौफ फरार झाला होता. 10 नोव्हेंबर 2016 रोजी बांग्लादेशातून त्याला पकडण्यात आले होते आणि बनावट पासपोर्ट प्रकरणात त्याला मुंबईत आणण्यात आले होते. अब्दुलला 2002 मध्ये गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि औरंगाबाद कारागृहात तो शिक्षा भोगत होता. 2009 मध्ये तो औरंगाबाद कारागृहातून आपल्या कुटूंबाला भेटण्यासाठी पॅरोलवर बाहेर आला होता. पण तो पॅरोल संपण्यापूर्वी बांग्लादेशात पळून गेला होता.

जाणून घेऊयात गुलशन कुमार यांची कुणी केली होती हत्या आणि गुलशन कुमार कसे बनले होते सर्वात मोठे कॅसेट किंग?

अंडरवर्ल्ड मागत होता पैसा
12 ऑगस्ट 1997 ला मुंबईतील अंधेरी भागातील जीतेश्वर महादेव मंदिरा बाहेर गुलशन यांची गोळ्या मारुन हत्या करण्यात आली होती. अबु सलेमने गुलशन कुमार यांना 10 कोटी द्यायला सांगितले होते. मात्र गुलशन कुमार यांनी यासाठी स्पष्ट नकार दिला होता. एवढ्या पैशांत वैष्णो देवीचा भंडारा करेल, असे त्यांनी अबु सलेमला म्हटले होते. यामुळे नाराज झालेल्या अबू सलेमने गुलशन कुमार यांना जीवे मारण्याची जबाबदारी दाऊद मर्चंट आणि विनोद जगताप नावाच्या दोन शार्प शूटरला दिला होती. 9 जानेवारी 2001 रोजी जगतापने कबुली दिली होती की, त्यानेच गुलशन कुमार यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

गुलशन कुमार यांना मारण्यात आल्या होत्या 16 गोळ्या
गुलशन कुमार बॉडीगार्डशिवाय मंदिरात पूजेसाठी जात होते. दरम्यान, मंदिराच्या बाहेर तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर एकामागून एक 16 गोळ्या झाडल्या. जेव्हा त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शूटर्सनी त्याच्यावरही गोळ्या झाडल्या होत्या. गुलशन कुमार यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता.

नदीम-श्रावण ही जोडी गुलशन कुमार यांची आवडती जोडी बनली आणि टी-सीरिजच्या ब-याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.
नदीम-श्रावण ही जोडी गुलशन कुमार यांची आवडती जोडी बनली आणि टी-सीरिजच्या ब-याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.

या प्रकरणात संगीतकार नदीमचे नाव आले होते समोर
गुलशन कुमार हत्याकांडमध्ये संगीतकार नदीम यांचे नावदेखील समोर आले होते. गुलशन कुमार यांची हत्या त्यांच्या सांगण्यावरुन करण्यात आली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. गुलशन कुमार यांच्या टी-सीरीज कंपनीने संगीत क्षेत्रात नदीम-श्रावण यांच्या जोडीला समोर आणले होते. परंतु, काही कारणास्तव नदीम आणि कुमार यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. त्यामुळे नदीम यांना इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नव्हते. परिणामी रागाच्या भरात नदीम यांनी अबू सालेमला गुलशन कुमार यांची सुपारी दिली असे म्हटले जाऊ लागले. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर नदीम इंग्लडला पळून गेले होते. 2002 मध्ये भारतीय कोर्टाने पुरावे नसल्याने त्यांच्याविरोधातील हत्येचा खटला रद्द केला, मात्र अटक वॉरंट रद्द केले नाही.

ज्युसच्या दुकानात काम करायचे गुलशन कुमार
गुलशन कुमार यांचा जन्म 1956 मध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला होता. दिल्लीतील देशबंधू कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. त्यांचे वडील चंद्रभान दुआ हे दिल्लीतील दरियागंज येथे ज्यूस विक्री करत होते.

लहानपणी गुलशकुमार वडिलांच्या दुकानावर ज्यूस विक्रीत त्यांना मदत करत होते. दरम्यान त्यांच्या वडिलांनी आणखी एक दुकान घेतले आणि तिथे त्यांनी रेकॉर्डर्स आणि ऑडिओ कॅसेट विक्री सुरु केली. गुलशन यांचादेखील या कामात रस वाढला. त्यानंतर पुढे त्यांनी नोएडा येथे स्वतःची कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली. गुलशन कुमारांनी त्यांच्या कॅसेट बिझनेसला 'सुपर कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड' हे नाव दिले. याच कंपनीला टी-सीरीज नावानेही ओळखले जाते. गुलशन कुमारांनी ओरिजनल गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करुन त्या कॅसेट कमी किंमतीत विक्री करण्यास सुरुवात केली होती. इतर कंपन्यांच्या कॅसेट 28 रुपयांमध्ये मिळत असताना, त्याचवेळी 15 ते 18 रुपयात टी-सीरीजची कॅसेट देण्याची किमया त्यांनी केली होती.

त्याचवेळी त्यांनी भक्ती संगीताकडेही मोर्चा वळवला. देवा-धर्माची गाणी रेकॉर्ड करुन ती त्यांनी प्रसिद्ध केली. काही गाणी ते स्वतः गात होते. 70 च्या दशकात गुलशन कुमार यांच्या कॅसेटची डिमांड वाढत गेली आणि म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये ते यशस्वी झाले. बिझनेस वाढता बघून गुलशन यांनी मुंबईत स्थायिक होण्याचा विचार केला.

मुंबईत आल्यानंतर बदलले नशीब
ऑडिओ कॅसेट्समध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार फिल्म इंडस्ट्रीकडे वळले आणि त्यासाठी ते मुंबईला पोहोचले. बॉलिवूडमध्ये बस्तान बसविल्यानंतर ते हिंदू पौराणिक कथांवर आधारित चित्रपट आणि सीरियल्स देखील प्रोड्यूस करु लागले. त्यांनी 15 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली तर 'बेवफा सनम' या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. त्यांची निर्मिती असलेला पहिला चित्रपट 1989 मध्ये आलेला 'लाल दुपट्टा मलमल का' हा होता. मात्र त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती 1990 मध्ये आलेल्या 'आशिकी' या चित्रपटाने.

गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार
गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार

आता गुलशन कुमार यांचा मुलगा सांभाळतो काम
गुलशन कुमार यांची हत्या झाली त्यावेळी ते संगीत क्षेत्रातील इंटरनॅशनल ब्रॅण्ड बनले होते. टी-सीरिज या कंपनीचे नाव आघाडीच्या म्युझिक कंपनीत गणले जाऊ लागले होते. रिपोर्ट्सनुसार, टी-सीरिजचा बिझनेस 24 देश तसेच 6 खंडांमध्ये पसरला आहे. सध्या टी-सीरिज कंपनीचे काम गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार सांभाळत आहे. टी-सीरिज या कंपनी अंतर्गत अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. कंपनीने 'रेडी' (2011), 'आशिकी 2' (2013), 'हेट स्टोरी 4' (2014), 'बेबी' (2015), 'भाग जॉनी' (2015), 'एयरलिफ्ट' (2016), 'बादशाहो' (2017) सह अन्य चित्रपटांची निर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...