आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआशा भोसले हे नाव माहीत नसलेला संगीतप्रेमी सापडणे अवघडच. गेली अनेक वर्षे सुरेल आवाजाने कानसेनांना आनंद देणारी आणि शास्त्रीय तसेच पाश्चिमात्य शैलीची गाणी लिलया गाणारी ‘मेलोडी क्वीन’ म्हणून आशाताईंना ओळखले जाते. आज आशाताईंचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 88 वर्षे पूर्ण केली आहेत. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झाला.
आशा भोसले यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्यांचे पहिले लग्न अपयशी ठरले होते. आरडी बर्मन यांच्यासोबत आशा ताईंनी दुसरे लग्न केले होते. आशा भोसले आणि पंचम दा या दोघांचेही हे दुसरे. आशा भोसले पंचम दांपेक्षा वयाने सहा वर्षांनी मोठ्या होत्या. दोघांची लव्ह स्टोरी अतिशय इंट्रेस्टिंग आहे. दोघांची पहिली भेट ही संगीतकार-गायिकेची नव्हे तर फॅन आणि एका सेलिब्रिटीच्या रुपातील होती. 1956 साली दोघांची पहिली भेट झाली होती.
अशी होती पहिली भेट
पंचम दा आशा भोसले यांचे फॅन होते. पहिल्या भेटीत दोघांमध्ये फारसे बोलणे झाले नव्हते. पंचम दांनी फक्त आशा भोसले यांना त्यांचा ऑटोग्राफ मागितला होता. त्याकाळात आशा भोसले यांनी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. तर आरडी बर्मन प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांचा टीनएज मुलगा होता. या भेटीनंतर तब्बल दहा वर्षांनी म्हणजे 1966 साली आरडी बर्मन यांनी 'तीसरी मंजिल' या चित्रपटातील गाणी गाण्यासाठी आशा भोसले यांच्याशी संपर्क साधला होता. 'ओ हसीना जुल्फों वाली..' या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या काळात दोघांची मैत्री झाली.
दोघांचेही पहिले लग्न ठरले होते अपयशी
'तीसरी मंजिल' या चित्रपटानंतर आशा यांनी पंचम दांसाठी गाणे सुरु केले. आरडी बर्मन ज्या चित्रपटांचे संगीत देत, त्या चित्रपटांमध्ये आशा भोसले यांचे गाणे नक्की असायचे. 70 च्या दशकात दोघांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. हा तो काळ होता, जेव्हा दोघांचेही पहिले लग्न अपयशी ठरले होते. आरडी बर्मन त्यांची पहिली पत्नी रीता पटेलपासून विभक्त झाले होते. 1971 मध्ये रीता पटेल आणि आरडी बर्मन यांचा घटस्फोट झाला होता.
तर दुसरीकडे आशा भोसले यादेखील त्यांचे पहिले पती गणपतराव भोसलेंपासून वेगळ्या झाल्या होत्या. 1960 मध्ये आशा आणि गणपत भोसले यांचा घटस्फोट झाला होता. पहिल्या लग्नापासून आशा भोसले यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर आशा भोसले आणि आरडी बर्मन दोघेही एकटे होते, हळूहळू दोघे एकमेकांच्या जवळ आले.
आरडी बर्मन यांच्या आईचा होता लग्नाला विरोध
आरडी बर्मन यांनी आशा यांना लग्नाची मागणी घालताना म्हटले होते, की तुच फक्त माझा सूर समजू शकते. मी तुझ्या आवाजाच्या प्रेमात पडलोय. आशा यांना आरडींच्या बोलण्याचा उद्देश कळला आणि त्यांनी लग्नाला होकार दिला. ही गोष्ट स्वतः आशा यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. पण या लग्नाला आरडी यांच्या मातोश्रींचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी लग्नासाठी योग्य वेळेची प्रतिक्षा केली.
याचकाळात आरडी बर्मन यांचे वडील सचिनदेव बर्मन यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या धक्क्याने आरडींच्या आई मीरा मनोरुग्ण झाल्या. त्यांची स्मृती गेली होती. त्या स्वतःच्या मुलालासुद्धा ओळखत नव्हत्या. एक वेळ अशी आली, जेव्हा आईच्या प्रकृतीत सुधार होणार नसल्याचे आरडींना कळले आणि त्यांनी 1980 मध्ये आशा यांच्यासोबत लग्न केले.
लग्नाच्या 14 वर्षांनी म्हणजे 1994 मध्ये आरडी बर्मन यांचे निधन झाले आणि आशा पुन्हा एकदा एकट्या पडल्या. आरडी यांच्या निधनापूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती ठिक नव्हती, त्यामुळे ते दोघेही वेगळे राहात असल्याचे म्हटले जाते.
आशा भोसले आणि आरडी बर्मन यांनी या चित्रपटासांठी केले एकत्र काम
आरडी बर्मन संगीतकार असलेल्या 'ओ मेरे सोना ना रे..', 'चुरा लिया है जो दिल को..', 'तुम साथ हो जब अपने..', 'दम मारो दम..', 'दो लफ्जो की है दिल की..', 'कह दूं तुम्हें..', 'सुन सुन दीदी तेरे लिए..' या गाण्यांना आशा भोसले यांनी स्वरसाज चढवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.