आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शकुंतला देवी, भूल भुलैय्या आणि कहानी यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारी बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहेत. आज बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये विद्याची गणना होते, मात्र एक काळ असा जेव्हा तिला सगल तीन वर्षे रिजेक्शनला सामोरे जावे लागले होते. तिने फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती तेव्हा तिला 'कमनशिबी' स्टार म्हटले गेले होते. त्याचे कारण म्हणजे तब्बल 12 सिनेमांसाठी तिला रिजेक्ट करण्यात आले होते. नंतर मात्र तिला नशिबाची अशी काही साथ मिळाली, की ती आज बॉलिवूडमधील अभिनयसंपन्न अभिनेत्रींपैकी एक आहे. एक नजर टाकुयात तिच्या संघर्षाच्या दिवसांवर...
विद्या बालनचा जन्म 1 जानेवारी 1978ला केरळमध्ये झाला. ती लहानाची-मोठी मुंबईमध्ये झाली. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. एकदा तिने माधुरी दीक्षितला टीव्हीवर 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना बघितले आणि तेव्हाच निश्चय केला, की ती अभिनेत्रीच होणार. दाक्षिणात्य कुटुंबामध्ये त्यांच्या मुलांना डान्स आणि गायनाचे धडे दिलेच जातात. अशामध्ये विद्या डान्स आणि गायन शिकली. मात्र विद्याने अभिनेत्री व्हावे, अशी तिच्या पालकांची इच्छा नव्हती. मात्र पालकांच्या इच्छेविरुद्ध कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्या अभिनय करायला लागली. तिने 'हम पांच' आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केले.
दिला होता 'कमनशिबी' असल्याचा टॅग
समाजशास्त्रमध्ये एम.ए केल्यानंतर 21 वर्षाच्या विद्याने मोहनलाल यांच्या अपोझिट 'चक्रम' हा मल्याळम सिनेमा साइन केला होता. यानंतर विद्याने सलग 12 सिनेमे साइन केले होते. परंतु चक्रमच्या वेळी मोहनलाल आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये वाद झाला आणि सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. मोहन लाल आणि दिग्दर्शक कमालने त्यापूर्वी आठ सुपरहिट सिनेमे दिले होते, म्हणून या वादासाठी विद्या बालनला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विद्याने जेवढे मल्याळम सिनेमे साइन केले होते, त्यामधून तिला काढून टाकण्यात आले. त्यामुळे विद्या स्वतःला कमनशिबी समजू लागली होती. निर्मात्यांनी तिला 'मनहूस' म्हटले होते.
पुढे विद्याला एका तामिळ सिनेमासाठी साइन करण्यात आले. मात्र याही सिनेमातून हकालपट्टी होईल, अशी भीती तिच्या मनात होती. दुर्दैवाने तेच झाले. तिच्या ऐवजी दुस-या अभिनेत्रीला त्या सिनेमासाठी साइन करण्यात आले. विद्याची आईसुध्दा तिच्यासाठी प्राथर्ना करायला लागली, की कमीत-कमी एक तरी सिनेमा विद्याला मिळावा.
'परिणीता' चित्रपटाद्वारे मिळाली ओळख
विद्याला नंतर प्रदीप सरकारने त्यांच्या एका अल्बमसाठी साइन केले. 'यूफोरिया' हा त्याकाळचा गाजलेला अल्बम होता. विद्याने नैराश्य बाजुला सारुन या अल्बममध्ये काम केले आणि तिला नशीबाची साथ मिळाली. प्रदीप सरकारने तेव्हा तिला सांगितलं होते, की 'मी तुझ्यासोबत एक सिनेमा बनवेल.' यामुळे विद्याचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या वचनाच्या आधारे सरकारने तिला 'परिणीती' सिनेमासाठी साइन केले. 'परिणीता'नंतर विद्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमात तिने उत्कृष्ट अभिनय केला. पहिल्याच सिनेमासाठी विद्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि विद्या बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये सामील झाली.
'परिणीता'साठी विद्याला 2005मध्ये सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर विद्याने 'मुन्ना भाई MBBS', 'कहानी', 'द डर्टी पिक्चर' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
साऊथ इंडियन असूनदेखील विद्याचे बंगालसोबत खास कनेक्शन आहे. तिला बंगालीत बोलायला आवडते. विद्याचे पती सिध्दार्थ रॉय कपूर अर्धे बंगाली आहेत. रिपोर्ट्नुसार, दोघे जास्तीत जास्त बंगालीमध्येच बोलतात.
सिनेमात पदार्पण करण्यात अपयशी ठरलेल्या विद्याने जाहिरातीत काम करण्यास सुरुवात केली. 'हम पांच' या टीव्ही शो मिळेपर्यंत तिने खूप संघर्ष केला. पालकांची इच्छा होती, की तिने शिक्षण पूर्ण करावे. त्यामुळे शिक्षण घेता-घेता तिने जाहिरातीत काम करणे सुरु ठेवले. सोशियोलॉजीमध्ये मास्टर डिग्रीमध्ये एनरोल करण्यापूर्वी तिने जवळपास 90 जाहिरातीत काम केले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.