आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे मिथून चक्रवर्ती आज 71 वर्षांचे झाले आहेत. एकेकाळी बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट डान्सरचा दर्जा मिळवलेल्या मिथून दा यांनी आपल्या अभिनयाने प्रत्येक पात्रात जीव ओतला. असे म्हणतात की मिथून चक्रवर्ती आपल्या चित्रपटांमध्ये पहिल्या टेकमध्येच परफेक्ट शॉट्स देत असत. पण एक काळ असा होता जेव्हा ते कॅमे-यासमोर नव्हे तर स्टार्सच्या मागे फिरायचे. होय, मिथून चक्रवर्ती लोकप्रिय अभिनेत्री हेलन यांचे असिस्टंट होते. आणि येथूनच त्यांना चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला. आज मिथून दांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, जाणून घेऊया त्यांचा चित्रपट प्रवास कसा सुरु झाला...
भावाच्या निधनानंतर घेतला होता नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडण्याचा निर्णय
16 जून 1950 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या मिथून चक्रवर्ती यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. ओरियंटल सेमिनारमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेजमधून केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. खुप कमी लोकांना माहिती असेल की, मिथून चित्रपट चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी कट्टर नक्षली होते. नक्षली बनल्याने ते कुटुंबापासून वेगळे झाले होते. मात्र एका अपघातात त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मिथून यांनी नक्षलवादी चळवळींमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आणि ते आपल्या कुटुंबामध्ये परत आले.
मिथून चक्रवर्ती हेलन यांचे असिस्टंट होते
चित्रपटात येण्यासाठी मिथून यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेतून अभिनयाचा कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. बर्याच संघर्षानंतर मिथून यांना हेलन यांच्या असिस्टंटची नोकरी मिळाली होती. एका जुन्या मुलाखतीत मिथून दांनी सांगितले होते की, एक काळ असा होता, जेव्हा त्यांना एख वेळचे जेवणही मिळत नसायचे. मात्र ही वाईट वेळ फार काळ टिकली नाही. सहायक म्हणून काम करत असताना त्यांना अमिताभ बच्चन यांच्या ‘दो अनजाने’ या चित्रपटात काही मिनिटांचा रोल मिळाला होता.
पहिल्याच चित्रपटासाठी मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार
चित्रपटांमध्ये लहानमोठ्या भूमिका आणि अॅक्शन सीनमध्ये बॉडी डबल म्हणून काम केल्यानंतर मिथून दा यांनी म्ृणाल सेन यांच्या 1976 मध्ये आलेल्या 'मृगया' या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनाराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर दोन वर्षांनी 1978 मध्ये मध्ये आलेल्या रक्षक या चित्रपटात त्यांनी काम केले. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता. 1979 मध्ये आलेल्या सुरक्षा या चित्रपटाने त्यांना स्टारडम मिळवून दिले. आणि प्रत्येक जण त्यांच्या अभिनयाचा दिवाना झाला.
1982 मध्ये आलेला 'डिस्को डान्सर' हा चित्रपट मिथून यांना मिळाला आणि त्यांच्या करिअरचा सुवर्णकाळ सुरु झाला. या चित्रपटानंतर ते डान्सिंग स्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी कसम पैदा करने वाले की, डिस्को-डिस्को (1982), कमांडो (1988), प्यार झुकता नहीं (1985), गुलामी (1985), मुझे इन्साफ चाहिए (1983), घर एक मंदिर (1984), स्वर्ग से सुदंर (1986) आणि प्यार का मंदिर (1988) या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला होता.
एका वर्षात 19 चित्रपटांत झळकून बनवला रेकॉर्ड
एकामागून एक हिट चित्रपट दिल्यानंतर मिथून चक्रवर्ती बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते बनले. 1989 मध्ये त्यांचे तब्बल 19 चित्रपट प्रदर्शित झाले होते. यात इलाका, मुजरिम, प्रेम प्रतिज्ञा, लडाई, गुरु आणि बीस साल बाद या चित्रपटांचा समावेश आहे.
तीनदा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
मिथून यांना मृगया या पहिल्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 1993 मध्ये 'ताहादार कथा' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या आणि 1996 मध्ये रिलीज झालेल्या 'स्वामी विवेकानंद' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.