आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने गेल्या आठवड्यात मुंबईस्थित कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 29 एप्रिल रोजी त्यांचा कोविड 19 टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 74 वर्षीय रणधीर कपूर यांना सुरुवातीला रुग्णालयाच्या नॉर्मल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर एका दिवसासाठी त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. रविवारी त्यांना आयसीयूमधून नॉर्मल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. स्वतः रणधीर कपूर यांनी अलीकडे एका वेबसाइटला टेलिफोनिक इंटरव्ह्यूमध्ये ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ते आता बरे आहेत आणि लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
मला ताप आला होता, पण आता मी ठीक आहे
रणधीर कपूर म्हणाले, "मी आता पूर्वीपेक्षा चांगला आहे. मी एक दिवस आयसीयूमध्ये होतो. आता डॉक्टरांनी मला आयसीयूमधून नॉर्मल वॉर्डमध्ये हलवले आहे. कारण माझी ऑक्सिजनची पातळी सामान्य असून मला श्वास घेण्यास त्रास होत नाहीये. मला ताप आला होता. पण आता मी पूर्णपणे ठीक आहे," असे रणधीर म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, 'मुलींनी मला रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले होते. पण आता मी लवकरच घरी जाणार आहे.'
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही रणधीर यांना झाला संसर्ग
यापूर्वी ई-टाईम्सशी बोलताना रणधीर यांनी सांगितले होते की, त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र तरीदेखील कोविडचा संसर्ग कसा झाला, हे समजले नाही. ते म्हणाले, "कोविडचा संसर्ग कसा झाला, याची मला कल्पना नाही. मला धक्का बसला आहे. माझा पाच सदस्यांचा स्टाफदेखील पॉझिटिव्ह आला आहे. मी त्यांनादेखील माझ्यासह कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केले आहे," असे रणधीर यांनी सांगितले होते. दरम्यान, रणधीर यांची धाकटी बहीण रीमा जैन यांनी आपले दुःख व्यक्त करताना म्हटले होते की, गेल्या दोन वर्षांत मी माझ्या दोन भावांना गमावले आहे, आणि आता एक भाऊ रुग्णालयात आहे.
माझी मनःस्थिती ठीक नाही
रीमा जैन 30 एप्रिल रोजी रणधीर यांचे धाकटे भाऊ ऋषी कपूर यांची पहिली पुण्यतिथी होती. यानिमित्ताने एका संभाषणात आपल्या भावाचे स्मरण करताना रीमा जैन म्हणाल्या, "मी माझे दोन भाऊ (ऋषी कपूर आणि राजीव कपूर) गमावले आहेत आणि एक रुग्णालयात आहे. त्यामुळे माझी मनःस्थिती चांगली नाही. प्रार्थना करते की, त्यांच्या (ऋषी) आत्म्याला शांती मिळेल. मला त्यांची खूप आठवण येते," अशा शब्दांत रीमा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
16 महिन्यांत तीन बहीणभावंडांना गमावले
शोमॅन म्हणून ओळखल्या जाणार्या राज कपूर यांच्या पाच मुलांपैकी तीन मुलांचे गेल्या 16 महिन्यांत निधन झाले आहे. राज कपूर यांना रणधीर, ऋषी आणि राजीव ही तीन मुले आणि रितू आणि रीमा या दोन मुली होत्या. आता तीन भावांपैकी रणधीर कपूर आणि बहिणींमध्ये रीमा जैन हयात आहेत. ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल 2020 रोजी कॅन्सरमुळे निधन झाले. ऋषी कपूर दोन वर्षे कर्करोगाशी लढा देत होते. मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली होती. तर सर्वात धाकटे भाऊ राजीव यांचे यावर्षी 9 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बहीण रितू नंदा यांचे 14 जानेवारी 2020 रोजी दिल्लीत निधन झाले होते. त्यांना कॅन्सर झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.