आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ अपडेट:प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम अद्यापही व्हेंटिलेटरवर, व्हिडिओद्वारे मुलाने दिली प्रकृतीविषयी माहिती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना विशेष आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.

74 वर्षीय गायक एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांची तब्येत अद्यापही चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांचा मुलगा एस. पी. चरणने रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

रविवारी पोस्ट केलेल्या व्हिडिओत एस. पी. चरणने सांगितले की, “वडिलांना तिसऱ्या मजल्यावरील आयसीयूतून सहाव्या मजल्यावरील विशेष आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. दिलासादायक बातमी म्हणजे ते थोडीफार हालचाल करत आहेत. ते अजूनही व्हेंटिलेटरवर असून काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती जशी होती, त्यापेक्षा आता ते थोडे बरे आहेत. त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.”

5 ऑगस्टला व्हिडिओद्वारे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती
एस.पी. यांना 5 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांना उत्तम प्रतिसाद देत होते. पण, 13 ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना आयसीयूत हलवण्यात आले होते. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर आहेत.

  • व्हिडिओ प्रसिद्ध करुन सांगितले होते - मी ठिक आहे मला कॉल करु नका

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एस. पी. यांनी रुग्णालयातून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यात ते म्हणाले होते, “गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी कोरोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला'', असे त्यांनी सांगितले होते. घरी क्वारंटाइनमध्ये राहिल्यास कुटुंबीय अधिक चिंतेत राहतील म्हणून बालसुब्रह्मण्यम यांनी स्वत:ला रुग्णालयात दाखल करून घेतले होते. या व्हिडिओत बालसुब्रह्मण्यम यांनी त्यांच्या मित्रांना कॉल न करण्याची विनंती केली होती.

एस.पी. यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रह्मण्यम आहे. तसेच, बालू या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या एस. पी. यांनी 16 भाषांमध्ये 40 हजारांपेक्षा जास्त गाणी गाण्याचा रेकॉर्ड केला आहे. 2011 मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एस.पी. बालसुब्रह्मण्यम हे नाव संगीत क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या गाण्यांनी भारताला मंत्रमुग्ध केले. पत्थर के फूल, हम आप के है कौन, बागी, साजन, रोजा आदी शेकडो चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. 90 च्या दशकामध्ये अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणून एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांच्याकडे पाहिले जाते.

बातम्या आणखी आहेत...