आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या हरनाज संधू हिने मिस युनिव्हर्स 2021 चा किताब आपल्या नावी केला आहे. इस्रायलमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत 75 हून अधिक सुंदर आणि हुशार तरुणींनी भाग घेतला. टॉप 3 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि पॅराग्वेच्या सौंदर्यवतींना मागे टाकत हरनाज संधूने मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत बाजी मारत मुकुटावर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे हरनाजपूर्वी केवळ दोन भारतीय महिला मिस युनिव्हर्स बनल्या आहेत. भारताने 21 वर्षांपूर्वी हे जेतेपद पटकावले होते. अभिनेत्री सुष्मिता सेनने 1994 मध्ये आणि लारा दत्ताने 2000 मध्ये विजेतेपद हा किबात आपल्या नावी केला होता.
सकारात्मक उत्तराने अंतिम फेरीत मिळाला विजय
हरनाजला विचारण्यात आले होते की, दबावाचा सामना करणाऱ्या महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल?
या प्रश्नाच्या उत्तरात हरनाज म्हणाली, ‘आजच्या तरुणाईवर सर्वात मोठे दडपण म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. तुम्ही अद्वितीय आहात आणि तेच तुम्हाला सुंदर बनवते, हे समजून घ्या. स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. स्वतःसाठी बोला, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात. तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे.’तिचे हे उत्तर ऐकून उपस्थित प्रेक्षकांसह सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
विजयानंतर म्हणाली - चक दे फट्टे इंडिया
मिस युनिव्हर्स 2021 चा ताज जिंकल्यानंतर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये हरनाज खूप आनंदी दिसत आहे. हसत हरनाज 'चक दे फट्टे इंडिया... चक दे फट्टे' म्हणताना दिसली.
उपांत्य फेरीत विचारण्यात आला होता हा प्रश्न
उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर होस्ट स्टीव्ह हार्वेने संधूला तिच्या आवडत्या प्राण्याबद्दल विचारले. यावर तिने सांगितले की तिला मांजरी खूप आवडतात.
असा रचला इतिहास
भारताच्या हरनाज संधूने तीन तासांच्या या लाइव्ह स्पर्धेत मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्यापूर्वी अनेक फेऱ्या पार केल्या. तिने नॅशनल कॉश्च्युम, इव्हिनिंग गाऊन, इंटरव्ह्यू आणि स्विमवेअर राउंडमध्ये आपला आत्मविश्वास दाखवला. तिच्यासोबत टॉप 10 मध्ये पॅराग्वे, पोर्तो रिको, यूएसए, दक्षिण आफ्रिका, बहामास, फिलीपिन्स, फ्रान्स, कोलंबिया आणि अरुबाच्या सौंदर्यवती होत्या. हरनाजने प्रत्येक फेरीत चांगली कामगिरी करत हा इतिहास रचला आहे.
'आपल्या छंदाशी कधीही तडजोड करू नका'
उपांत्य फेरी गाठण्यापूर्वी हरनाज म्हणाली होती, 'आपण कधीही आपल्या छंदाशी तडजोड करु नये, कारण यामुळे तुमचे स्वप्नवत करिअर बनू शकते.' या सौंदर्य स्पर्धेत फ्रान्स, कोलंबिया, सिंगापूर, ग्रेट ब्रिटन, यूएसए, भारत, व्हिएतनाम, पनामा, अरुबा, पॅराग्वे, फिलीपिन्स, व्हेनेझुएला आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील सौंदर्यवतींनी भाग घेतला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.