आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इमली'मधील अभिनेत्रीचा अपघात:हेतल यादव यांच्या कारला भरधाव ट्रकची धडक, थोडक्यात बचावल्या

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील 'इमली' या लोकप्रिय मालिकेतील शिवानी राणा ही व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेत्री हेतल यादव यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. हेतल मालिकेचे चित्रीकरण संपवून घरी परत येत असताना त्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातातून हेतल बचावल्या आहेत. हा अपघात घडला तेव्हा हेतल स्वतः त्यांची गाडी चालवत होत्या.

हेतल यांनी ई-टाम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये या अपघाताची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'रविवारी पावणे नऊच्या सुमारास माझे पॅकअप झाले. त्यानंतर मी फिल्मसिटीहून घरी जायला निघाले. मी स्वतः गाडी चालवत होते. जेव्हीएलआर रस्त्यावर आले असता एका ट्रकने माझ्या गाडीला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्या धक्क्याने माझी गाडी फ्लायओव्हरच्या कडेपर्यंत गेली. तिथून गाडी खाली पडली असती परंतु सुदैवाने तसे काही झाले नाही.'

हेतल यांनी पुढे सांगितले की, 'अपघात झाल्यानंतर मी खूप घाबरले होते. पण सर्व हिंमत गोळा केली आणि माझ्या मुलाला फोन करून अपघाताबद्दल सांगितले. तसंच त्याला याबाबत पोलिसांना कळवायला सांगत तातडीने तिथे यायला सांगितले. सुदैवाने मला दुखापत झाली नाही, मात्र मला मानसिक धक्का बसला. अजूनही मी यातून बाहेर आलेली नाही.'

हेतल यादव सध्या स्टार प्लस शो 'इमली' मध्ये शिवानी राणाची भूमिका साकारत आहे. गेल्या 25 वर्षांपासून त्या मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये ज्वालाची भूमिका साकारल्यानंतर त्या घराघरात प्रसिद्ध झाल्या. हेतल यांनी डान्सर म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली.

बातम्या आणखी आहेत...