आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरफान खान यांच्या निधनानंतर कोलमडला होता लेक:म्हणाला - 45 दिवस स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते, मी खूप वाईट अवस्थेत होतो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांची आज म्हणजेच 7 जानेवारी रोजी जयंती आहे. आज ते हयात असते तर त्यांनी वयाची 56 वर्षे पूर्ण केली असती. त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना बाबिलने सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर तो पूर्णपणे कोलमडला होता, त्याने स्वतःला 45 दिवस एका रूममध्ये कोंडून घेतले होते.

माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी खूप वाईट अवस्थेत होतो
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत बाबिल म्हणाला, 'माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या पहिल्या दिवशी मला विश्वास बसत नव्हता की, ते आता आमच्यासोबत नाहीत. या घटनेला एक आठवडा पूर्ण झाल्यानंतर माझ्यासमोर सत्य परिस्थिती आली. जेव्हा माझ्या मनाने असे काहीतरी घडले आहे, हे मान्य केले. तेव्हा मला धक्का बसला आणि पुढे जे घडले ते भयंकर होते. मी खूप वाईट अवस्थेत होतो. जवळपास 45 दिवस मी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते.'

मी स्वतःला समजावत होतो की ते शूटिंगसाठी गेले असतील
बाबिल पुढे म्हणाला, "माझे बाबा बराच वेळ शूटिंग करत असायचे. त्यामुळे ते बरेच दिवस शूटिंगसाठी बाहेर असायचे. त्यांच्या निधनानंतर मी स्वत:ला सांगत होतो की, ते शूटिंग शेड्यूलनंतर परत येतील. परंतु हळूहळू मला समजू लागले की हे कधीही न संपणारे शूटिंग शेड्यूल आहे.'

मी माझा सर्वात खास मित्र गमावला आहे

'मी माझ्या सर्वात जवळच्या मित्राला गमावले होते. मी अजूनही एवढा कोलमडलो आहे की, हे दुःख मी शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. पण त्याच्या आठवणींनी मी स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याच आधारे मी आयुष्यात पुढे जातोय,' असे बाबिल म्हणाला.

2020 मध्ये झाले इरफान खान यांचे निधन
इरफान खान यांचे 1995 मध्ये सुतापा सिकंदरसोबत लग्न झाले होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत असताना दोघांची भेट झाली होती. या जोडप्याला बाबिल आणि अयान ही दोन मुले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच हॉलिवूडमध्येही त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनी 'लाइफ ऑफ पाय', 'द अमेझिंग स्पायडर-मॅन', 'इन्फर्नो' इत्यादी ऑस्कर विजेत्या चित्रपटांमध्येही काम केले.
इरफान खान यांना 2018 मध्ये न्यूरोएन्डोक्राइन कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर जवळपास 2 वर्षे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र 29 एप्रिल 2020 रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बाबिलने 'काला' चित्रपटाद्वारे केले अभिनय क्षेत्रात पदार्पण
बाबिल खानबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2022 मध्ये 'काला' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात बाबिलने प्रतिभावान गायकाची भूमिका साकारली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बाबिलच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. यासोबतच बाबिल लवकरच 'द रेल्वे मॅन' या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. 1984 च्या भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित ही सिरीज शिव रवैल यांनी दिग्दर्शित केली आहे. त्यात केके मेनन, आर. माधवन आणि दिव्यांदू यांच्याही भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...