आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
2020 हे वर्ष एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीसाठी एकामागून एक धक्के देणारे ठरत आहे. कोरोनाचे सावट पसरल्यापासून इंडस्ट्री ठप्प पडली आहे. त्यातच लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. अलीकडेच अभिनेते जगेश मुकाटी यांचे निधन झाल्याची बातमी आली. ‘अमिता का अमित’, ‘श्रीगणेश’ यांसारख्या मालिका व ‘हंसी तो फसी’, ‘मन’ या चित्रपटांत ते झळकले होते. 10 जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 47 वर्षांचे होते. टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील ते एक मोठे नाव होते.
जगेश मुकाटी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे गेल्या दोन ते तीन महिन्यांत निधन झाले आहे. यामध्ये अभिनेते, संगीतकार, दिग्दर्शक, गीतकार यांचा समावेश आहे. काहींचे आजारपणामुळे निधन झाले, तर
काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून या जगाचा कायमचा निरोप घेतला. एक नजर टाकुयात....
बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक असणाऱ्या इरफान खानचे 29 एप्रिल रोजी निधन झाले. कोलोन इन्फेक्शनमुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयाच्या 54 व्या वर्षी त्याने या जगाचा कायमचा निरोप घेतला.
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी 30 एप्रिल रोजी निधन झाले. ते गेल्या दोन वर्षांपासून ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. गेल्या वर्षी अमेरिकेत बराच काळ उपचार घेतल्यानंतर ते सप्टेंबर महिन्यात मुंबईला परतले होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला.
'क्राइम पेट्रोल'मधील आपल्या अभिनयामुळे प्रसिद्धीस आलेल्या शफीक यांचे 10 मे रोजी निधन झाले. त्यांना कॅन्सर होता अशी माहिती आहे.
'पीके', 'रॉक ऑन' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेला प्रसिद्ध अभिनेता साई गुंडेवारचे 10 मे रोजी निधन झाले. 10 रोजी सकाळी 7:30 वाजता अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथील इस्पितळात 'ग्लायोब्लास्टोमा' या कर्क रोगाने त्याची प्राणज्योत मालवली.
गेले 25 वर्षे अभिनेता आमिर खानचा असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या अमोस यांचे 13 मे रोजी निधन झाले. ह्रदयविकाराचा झटका आल्याने वयाच्या 60 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अमोस यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी, दोन मुले आणि सुना असा परिवार आहे.
‘कहानी घर घर की’ या मालिकेतील अभिनेता सचिन कुमार याचे 15 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 42 वर्षीय सचिनची झोपेतच प्राणज्योत मालवली. मुंबईतील अंधेरीस्थित राहत्या घरी हार्ट अटॅकने त्याचे निधन झाले. सचिन बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आत्याचा मुलगा होता. सचिनने सुरुवातीला अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत काम केलं. त्यानंतर तो फोटोग्राफीकडे वळला होता.
'छोटे मियाँ' या कॉमेडी रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहित बघेलने 23 मे रोजी या जगाचा निरोप घेतला. सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या 'रेडी' चित्रपटातून तो प्रसिद्धीझोतात आला होता. त्याला कॅन्सर झाला होता. वयाच्या 26 व्या वर्षीच त्याने जगाचा निरोप घेतला.
चरित्र भूमिकांमधून चित्रपटप्रेमींच्या मनावर वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ (72) यांचे दीर्घ आजाराने 24 मे रोजी निधन झाले. धुमाळ यांनी उरूस, म्हैस, फँड्री, सैराट, मुळशी पॅटर्न, टाइमपास अशा हिट चित्रपटांमधील भूमिका गाजवल्या. ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजमध्येही त्यांनी छाप सोडली.
लेखक आणि संगीतकार योगेश गौर यांनी 29 मे रोजी जगाचा निरोप घेतला. 'कही दूर जब दीन ढल जाये' आणि 'जिंदगी कैसे है पहेली'सारखी त्यांची गाणी आजही प्रसिद्ध आहेत.
टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवालने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने मनमीतने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. 2017 ते 2018 या काळात छोट्या पडद्यावर प्रसारित झालेल्या 'आदत से मजबूर' या कॉमेडी शोमध्ये मनमीत कृष्णा अभिषेकसोबत झळकला होता. तो फक्त 32 वर्षांचा होता.
प्रेक्षा मेहता क्राइम पेट्रोलमधील आपल्या भूमिकांमध्ये प्रसिद्धीस आली होती. 25 मे रोजी तिने इंदूर येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. काम नसल्याने निराश होऊन तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असे म्हटले जाते.
रिअल इस्टेट कमर्शियलमध्ये झळकलेली कन्नड अभिनेत्री आणि टीव्ही अँकर चंदना व्हीके हिने 28 मे रोजी आत्महत्या केली. वृत्तानुसार चंदनाचा प्रियकर दिनेश गोवाडाने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. तिने विष प्राशन करून स्वत:चे आयुष्य संपवले.
‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचा कास्टिंग डायरेक्टर क्रिश कपूर याचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. अवघ्या 28 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेता. 31 मे रोजी क्रिशचे निधन झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
शाहरुख खानचा अत्यंत जवळचा मित्र तसेच त्याच्या टीमचा सदस्य असणाऱ्या अभिजीत यांचा मे महिन्यात मृत्यू झाला. शाहरुख खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना शाहरुखने अभिजीत रेड चिलीजबरोबर सुरुवातीपासूनच जुळले असल्याचे सांगितले होते.
1 जून रोजी बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद या जोडीतील वाजिद खान यांचे निधन झाले. वाजिद खान यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार सुरु असताना ह्रदय बंद पडल्याने त्यांचे निधन झाले.
अक्षय कुमारच्या गाजलेल्या 'खिलाडी' या चित्रपटातील 'वादा रहा सनम'सारखी गाणी लिहिणारे ज्येष्ठ गीतकार अनवर सागर यांचे 3 जून रोजी निधन झाले. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना रुग्णालयात आणले जाईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे वय 70 च्या आसपास होते.
‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों मे’, ‘एक रुका हुआ फैसला’ यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटांचे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे 4 जून रोजी मुंबईत निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
बॉलिवूडचे ज्येष्ठ निर्माता अनिल सूरी यांचे 4 जून रोजी कोरोनाव्हायरस संसर्गामुळे निधन झाले. ते 77 वर्षांचे होता. अनिल यांचे भाऊ आणि चित्रपट निर्माता राजीव सूरी यांनी सांगितले की, 2 जूनला अनिल यांना ताप आला होता, परंतु काही तासांतच त्याची प्रकृती खालावली. 4 जून रोजी संध्याकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल सूरी यांनी राजकुमार आणि रेखा स्टारर 'कर्मयोगी' आणि 'राजतिलक'सारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती.
कन्नड चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे रविवारी 7 जून रोजी निधन झाले. हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. चिरंजीवी यांच्या अकाली निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.
सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे 8 जून रोजी निधन झाले. इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला, पोलिसांकडून दिशाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिशाने सुशांतशिवाय भारती सिंग, वरुण शर्मा यांच्यासाठी काम केले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.