आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचित्रपटातील जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफ आज 66 वर्षांचे झाले आहेत. एकेकाळी मुंबईच्या तीन बत्ती चाळीतील 10x10 खोलीतून आयुष्याची सुरुवात करणारे जॅकी आज 212 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहेत. मुलगा टायगर देखील बॉलिवूडच्या टॉप स्टार्सपैकी एक आहे. विशेष म्हणजे यश मिळाल्यानंतरही जॅकी श्रॉफ आपल्या आयुष्यातील सुरुवातीचे दिवस विसरले नाहीत. तीन बत्ती चाळीत आजही त्यांच्याकडे त्यांचे एका खोलीचे घर आहे, जिथे ते अनेकदा जात असतात.
एका मुलाखतीत त्यांनी स्वतः सांगितले होते की, 'मला अजूनही चाळीच्या त्याच खोलीत शांत झोप लागते.'
जॅकी यांचे खासगी आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असे आहे. त्यांचे वडील गुजराती, आई कझाकिस्तानची. वडील काकूभाई श्रॉफ हे ज्योतिषी होते. जॅकी यांच्या आयुष्यातील 31 वर्षे तीन बत्ती चाळीत गेली. 'हिरो' या चित्रपटानंतर ते स्टार झाले. त्यानंतरही काही वर्षे ते चाळीत राहिले. चाळीचा जग्गू दादा ते मॉडेल आणि मॉडेल ते हिरो हा त्यांचा प्रवास खूपच रंजक आहे.
जॅकीदादा एकेकाळी थिएटरबाहेर शेंगदाणे विकायचे. कधी कधी चित्रपटांचे पोस्टर्स चिकटवायचे. एके दिवशी बस स्टँडवर एका माणसाने त्यांना पाहिले आणि विचारले, तू मॉडेलिंग करशील का? जॅकी यांनी पैसे किती मिळतील? असे विचारले. येथूनच जॅकीदादांचे नशीब पालटले.
आज जॅकी श्रॉफ यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याशी निगडीत रंजक गोष्टी जाणून घेऊया...
आई-वडिलांची भावूक करणारी कहाणी -
जॅकी श्रॉफ यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1957 रोजी मुंबईतील चाळीत झाला. त्यांची आई कझाकिस्तानमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर जीव वाचवून लाहोरला आल्या होत्या. 1936 च्या सुमारास कझाकिस्तानमध्ये युद्धाचे वातावरण होते, त्यावेळी रिटा 10 वर्षांच्या होत्या. तिथे राहणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात हत्या केली जात होती. जॅकी यांची आई रिटा यांना सात बहिणी होत्या. सर्दीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी लसणाची पेस्ट अंगावर लावली होती.
ती इतकी उष्ण होती की, अंगभर मोठ्या जखमा झाल्या होत्या. जेव्हा सैनिक त्यांना मारायला आले तेव्हा त्यांना वाटले की तिला कुष्ठरोग झाला आहे, जो स्पर्शाने पसरतो. सुदैवाने संपूर्ण कुटुंब वाचले. जीव वाचवून सात बहिणी आपल्या आईसोबत लाहोरला आल्या आणि नंतर दिल्ली आणि फाळणीनंतर मुंबईत राहायला आल्या. येथे त्यांची भेट काकूबाई श्रॉफ यांच्याशी झाली. काकूभाई ज्योतिषी होते.
वास्तविक काकूभाई हे अतिशय श्रीमंत कुटुंबातील होते आणि शेअर बाजाराचे मोठे शेअरहोल्डर होते, मात्र एकदा त्यांचे सर्व पैसे बुडाले आणि कुटुंब अडचणीत आले. वयाच्या 17 व्या वर्षी काकूभाईंनी उदरनिर्वाहासाठी घर सोडले. मुंबईच्या चाळीत राहत असताना त्यांची रिटाशी ओळख झाली आणि दोघांचे लग्न झाले. चाळीत राहत असताना रिटा यांनी दोन मुलांना जन्म दिला. जॅकी हा त्यांचा धाकटा मुलगा आहे.
जॅकी यांचे बालपण आणि तारुण्य हे तीन बत्ती चाळीत 10x10 खोलीत गेले. चाळीत 7 खोल्या होत्या, ज्यामध्ये सुमारे 30 लोक राहत होते आणि त्यामध्ये फक्त 3 बाथरूम होते. रोज बाथरूमला जाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असे. जॅकी या चाळीशी भावनिरित्या जुळलेले आहेत. आजही ते वेळात वेळ काढून त्या चाळीला भेट देतात आणि तेथील मित्रांना भेटतात.
चाळीचा खरा जग्गू दादा होता मोठा भाऊ
जॅकी श्रॉफ यांचा मोठा भाऊ त्यांच्यापेक्षा सात वर्षांनी मोठा होता. चाळीतील लोकांच्या मदतीसाठी तो सदैव तत्पर असायचा. कोणाला मदत हवी असेल तर तो त्यांच्याकडे मदतीसाठी हजर राहायचा.
शेंगदाणे विकून पैसे कमवायचे
जॅकी श्रॉफ चाळीत राहत असताना चित्रपट सुरू होण्याची वाट पाहत असत. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पोस्टर चिकटवण्याचे काम त्यांना मिळायचे. त्याचबरोबर चित्रपटगृहांच्या बाहेर शेंगदाणे विकून ते पैसे कमावयचे.
मोठा भाऊ डोळ्यासमोर समुद्रात बुडाला, जॅकी यांना वाचवता आले नाही
जॅकी यांच्या जग्गू दादा नावामागे एक एक वेदनादायी सत्य लपले आहे. जॅकी श्रॉफ यांना एक मोठा भाऊ होता. तो 17 वर्षांचा तर जॅकी त्यावेळी 10 वर्षांचे होते. सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये जॅकी म्हणाले होते की, "माझा भाऊ आमच्या चाळीतील खरा जग्गू दादा होता. जेव्हा माझ्या परिसरातील लोकांना गरज असायची तो मदतीसाठी नेहमी हजर असायचा. तो 17 वर्षांचा होता, तेव्हा त्याने समुद्रात बुडताना एक व्यक्ती पाहिला, त्याला वाचवण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली. खरंतर माझ्या भावाला पोहताही येत नव्हते, यामुळे तोसुध्दा पाण्यात बुडाला. तेव्हा मी एक केबल लाइन त्याच्याकडे फेकली. त्याने ती पकडली. पण काही सेकंदांनंतर त्याच्या हातून ती निसटली. मी तेव्हा खुप लहान होतो आणि खुप घाबरलो होतो. मी उभा राहून त्याला बुडताना पाहत होतो. यानंतर मी ठरवले की, आपल्या भावाप्रमाणेच आपल्या परिसरातील लोकांची रक्षा करेल आणि नंतर मी जग्गू दादा बनलो." जॅकी यांनी सांगितले की, त्यांचा भाऊ मिल वर्कर होता आणि मृत्यूच्या एक महिनापुर्वीच त्याला जॉब मिळाला होता.
आईने साड्या आणि भांडी विकून दहावीपर्यंतचे शिक्षण दिले
घरात आधीच आर्थिक कोंडी होती, अशा परिस्थितीत वडिलांना शिक्षणाचा खर्च उचलणे कठीण जात होते. जॅकी यांना पुढील शिक्षण घेता यावे यासाठी जॅकीच्या आईने त्यांच्या साड्या आणि घरातील भांडी विकली. अकरावीनंतर कॉलेजचा खर्च भागवणे कठीण असताना जॅकीदादांनी शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला.
बस स्टॉपवर उभे असताना मिळाली होती मॉडेलिंगची ऑफर
पुढे, जॅकी श्रॉफ यांनी घरखर्चासाठी मदत करण्यासाठी रामपत रोडवरील ट्रेड विंग्स नावाच्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. एके दिवशी एका माणसाने जॅकी यांना बस स्टॉपवर उभे असलेले पाहिले. त्यांनी विचारले तुम्ही काय करता. जॅकीने सांगितले की, ते ट्रॅव्हल एजन्सीमध्ये आहे. ती व्यक्ती जाहिरात एजन्सीमधील एक व्यक्ती होती, त्यांनी जॅकी यांना सांगितले की, छायाचित्रे क्लिक केल्याबद्दल त्यांना पैसे मिळतील.
हे ऐकून जॅकी खूश झाले आणि म्हणाले मला पण काम द्या. दुसऱ्याच दिवशी जॅकी यांना नॅशनल अॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये बोलावण्यात आले. जॅकी येताच तिथे त्यांच्या कपड्यांचे माप घेण्यात आले आणि आम्ही तुम्हाला मॉडेल बनवत आहोत, असे त्यांना सांगण्यात आले.
या कामासाठी जॅकी यांना 7 हजार रुपये मिळाले. जॅकीने हे पैसे त्यांच्या आईला दिले आणि म्हणाले, आई, मला माझी नोकरी सोडून असे काहीतरी करायचे आहे, जिथे मला फोटो काढण्यासाठी पैसे मिळतील. आईने होकार दिला आणि जॅकी यांनी ट्रॅव्हल एजन्सीची नोकरी सोडली.
चित्रपटांमध्ये कसे आले जॅकीदादा?
मॉडेलिंग करत असताना जॅकी यांची देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंदशी मैत्री झाली. जॅकी यांनी एके दिवशी त्याला सांगितले की, मला तुझ्या बाबांना भेटायचे आहे, मी त्यांचा मोठा चाहता आहे. जेव्हा जॅकी देवसाहेबांना भेटायला पोहोचले तेव्हा देवसाहेब त्यांना म्हणाले, सकाळी तुझा फोटो पाहिला आणि संध्याकाळी तू माझ्यासमोर उभा आहेस, मी तुला भूमिका नक्की देईन.
देव आनंद यांच्या चित्रपटात जॅकी श्रॉफला सेकंड लीड रोल मिळाला. 15 दिवसांनंतर मात्र देव आनंद यांनी जॅकीला सांगितले की, मी ती भूमिका मिथुन चक्रवर्तीला दिली आहे, मी तुला दुसरी भूमिका देईन. जॅकी यांना शक्ती कपूरच्या चेल्याची भूमिका मिळाली. काम नीट जमत नसल्याने त्यांना खूप ओरडादेखील मिळाला. तो चित्रपट होता 1982मध्ये आलेला 'स्वामी दादा'. यानंतर सुभाष घई यांनी जॅकीला 'हिरो' चित्रपटात काम दिले. हा चित्रपट प्रचंड गाजला आणि जॅकी हिरो बनले.
जॅकी श्रॉफ स्टार झाल्यानंतरही चाळीतच राहिले
अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतरही जॅकी आपल्या आईसोबत चाळीत राहत होता. संपूर्ण चाळीत केवळ 3 बाथरूम असल्याने येथील बाथरूममध्ये जाण्यासाठी त्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागायचे. कित्येकदा असेही घडले की, दिग्दर्शक कधी कधी चाळीत, तर कधी बाथरूमबाहेर तासन्तास त्यांची वाट पाहत असत.
13 वर्षांच्या मुलीला पाहताच क्षणी प्रेमात पडले होते जॅकी श्रॉफ
चित्रपटांमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर जॅकी श्रॉफ यांनी 1987 मध्ये आयशा श्रॉफशी लग्न केले. मात्र, त्यांनी आयशासोबत लग्न करण्याचा निर्णय 1973 मध्येच घेतला होता. आयशा ही श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती आणि जॅकी त्यावेळी तीन बत्ती चाळीत राहणारे एक सामान्य तरुण होते. आयशा 13 वर्षांची असताना दोघांची पहिली भेट झाली होती.
जॅकीची नजर एक दिवस स्कूल बसच्या गेटवर उभ्या असलेल्या आयशावर पडली. जॅकी यांनी धावत जाऊन स्वतःची ओळख करून दिली. दुसरी भेट एका कॅसेट रेकॉर्डिंगच्या दुकानात झाली जिथे आयशा काही रेकॉर्डिंग घेण्यासाठी आली होती. जॅकी यांनी तिला मदत केल्यावर आयशाही प्रभावित झाली. या मुलाशीच लग्न करायचे असे आयशानेदेखील ठरवले.
जॅकीवर इतके प्रेम होते की, आयशा त्यांची दुसरी पत्नी होण्यास तयार झाली
सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये जॅकी श्रॉफने सांगितले होते की, आयशापूर्वी त्यांचे आणखी एका मुलीवर प्रेम होते. ती मुलगी शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती, पण ती मुलगी परत आल्यावर तिच्याशी लग्न करावे, अशी जॅकी यांची इच्छा होती. जॅकी यांनी ही गोष्ट आयशाला सांगितली. आयशाला हे कळताच तिने जॅकीकडे त्या मुलीला पत्र लिहिण्याची परवानगी मागितली.
आयशाने पत्रात लिहिले होते, तू परत येशील तेव्हा आपण दोघीही जॅकीसोबत लग्न करू आणि बहिणींप्रमाणे राहू. हे पाहून जॅकीला समजले की आयशाचे त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे.
हलाखीच्या काळात शूटसाठी गर्लफ्रेंड आयशाची बिकिनी घातली होती
1980 मध्ये जॅकी श्रॉफ यांना फोटोशूटचे काम मिळाले होते, त्यासाठी त्यांना स्विमिंग ट्रंक्स घालायचे होते. संघर्षाच्या दिवसांत पैसे नव्हते, त्यामुळे जॅकी यांना महागडे स्विमिंग ट्रंक्स विकत घेता आले नाही. जेव्हा त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला मदत मागितली तेव्हा मैत्रिणीने त्यांना तिची टू-पीस बिकिनी दिली. जॅकी यांनी फोटोशूटमध्ये त्याच बिकिनीचा वापर केला होता.
अनिल कपूरसाठी लकी ठरली होती जॅकी यांची पँट
अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांची घट्ट मैत्री आहे. आजही अनिल कपूर यांनी जॅकीदादांनी दिलेली पँट लकी म्हणून जपून ठेवली आहे. जॅकी श्रॉफ हे त्यांच्या काळातील फॅशन आयकॉन मानले जात होते. जेव्हा अनिल यांना 'विरासत' चित्रपटासाठी एका पँटची गरज होती, तेव्हा त्यांनी जॅकी यांची एक पँट मागितली कारण त्यांना ती खूप आवडली होती.
जॅकी यांनीही प्रश्न न करता पँट दिली. विरासत हा चित्रपट हिट झाला तेव्हा अनिल यांनी याचे श्रेय जॅकीच्या पँटला दिले. ही पँट आपल्यासाठी लकी आहे, असे अनिल यांना वाटले. म्हणून आजही त्यांनी ती पँट जपून ठेवली आहे.
आयुष्यभराची कमाई चित्रपटात गुंतवली, नुकसान झाल्यावर घरातील फर्निचर विकावे लागले
2003 मध्ये आलेल्या 'बूम' या चित्रपटाची निर्मिती जॅकी श्रॉफ आणि त्यांची पत्नी आयशा श्रॉफ यांनी केली होती. या चित्रपटात दोघांनीही आयुष्यभराची पुंजी गुंतवली होती. कतरिना कैफचा हा पहिलाच चित्रपट होता, तर त्यात अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोवर, झीनत अमान अशी मोठी स्टारकास्ट होती. शेवटच्या क्षणी चित्रपटाच्या वितरकांनी माघार घेतली आणि जॅकी यांना मोठा तोटा सहन करावा लागला.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आणि जॅकी यांचे सर्व पैसे बुडाले. गरिबीमुळे त्यांना त्यांचे फर्निचर, आर्टवर्क आणि घरदेखील विकावे लागले. टायगर श्रॉफने त्यावेळी आपल्या आईला घर परत विकत घेण्याचे वचन दिले होते. आज टायगरने त्याच्या आईसाठी घर विकत घेतले आहे.
मदतीसाठी भिकाऱ्यांना दिला आहे आपला मोबाइल नंबर
स्टार बनल्यानंतर जॅकीदादांनी गरिबांच्या हितासाठी अनेक मोठी कामे केली आहेत. अनेक मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला. अनेक गरजूंवर उपचार केले. जॅकी यांच्यामुळे आज जवळपास 100 कुटुंबे चांगले आयुष्य जगत आहेत. जॅकी यांनी त्यांचे जुने घर तीन बत्तीपासून ते पाली हिलच्या घरापर्यंतच्या मार्गावर राहणाऱ्या अनेक भिकाऱ्यांना वैयक्तिक मोबाइल नंबर दिला आहे.
आजही अनेक भिकारी त्यांना मदतीसाठी हाक मारतात आणि जॅकी त्यांना लगेच मदत करतात. 5 मार्च 2021 रोजी, जॅकी यांनी लोणावळ्यातील अॅनिमल शेल्टरला रुग्णवाहिका दान केली होती.
212 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत जॅकी श्रॉफ
एकेकाळी गरिबीत जीवन जगलेल्या जॅकीदादांची संपत्ती आता 26 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 212 कोटी रुपये आहे. 2012 पर्यंत, जॅकी सोनी टीव्हीचे 12% शेअर्सचे मालक होते, परंतु त्यांनी हे शेअर्स विकले. जॅकी प्रत्येक चित्रपटासाठी चार कोटी रुपये मानधन घेतात. याशिवाय जॅकी श्रॉफ सेंद्रिय शेतीही करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.