आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आहे. 5 डिसेंबर रोजी परदेशी जात असताना जॅकलिनला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले होते. तिच्याविरोधात ईडीने लुकआउट नोटीस जारी केली आहे. दरम्यान, ही अभिनेत्री गुरुवारी पुन्हा एकदा ईडीसमोर हजर झाली. तिहार तुरुंगात कैदेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याशी असलेल्या संबंधांबद्दल तिच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. जॅकलिनची ईडीकडून तिस-यांदा चौकशी करण्यात आली आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री आणि कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर यांच्यात जवळचे संबंध होते आणि तो या अभिनेत्रीवर पाण्यासारखा पैसा खर्च करत असे. चंद्रशेखरने जॅकलिनला सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, आयात केलेली क्रॉकरी दिली होती. याशिवाय 52 लाख रुपये किमतीचा घोडा आणि 9-9 लाख रुपये किमतीच्या चार पर्शियन मांजरीही भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. सुकेशने जॅकलिनसाठी अनेक चार्टर्ड फ्लाइट्स बुक केल्या होत्या. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखरने जॅकलिनवर सुमारे 10 कोटी रुपये खर्च केले होते.
हॉटेलमध्ये राहण्याचा खर्चही सुकेशनेच उचलला होता सुकेशने अभिनेत्रीसाठी दिल्ली ते मुंबई आणि तेथून चेन्नई अशी चार्टर्ड फ्लाइटही बुक केल्याचे तपासात समोर आले आहे. अभिनेत्रीच्या काही पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचा खर्चही सुकेशने उचलला होता. दोघांमध्ये झालेल्या तीन भेटीबाबत ईडीला ठोस माहिती मिळाली असून, यासाठी अभिनेत्रीची चौकशी करण्यात येत आहे. सुकेशची अंतरिम जामिनावर सुटका झाल्यानंतर ही भेट झाली होती.
सुकेश जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता
सुकेशने जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला जातोय. दोघांची काही छायाचित्रे या दाव्याला पुष्टी देतात. या छायाचित्रांमध्ये जॅकलिन आणि चंद्रशेखर यांच्यातील जवळीक दिसत आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार ही छायाचित्रे एका पंचतारांकित हॉटेलची आहेत. मात्र, जॅकलिनने तपास यंत्रणांसमोर असे कोणतेही नाते स्वीकारलेले नाही. तिहार तुरुंगात असताना सुकेशने जॅकलिनसोबत अनेकवेळा फोनवर बोलल्याचेही तपासात समोर आले आहे. याचे सबळ पुरावे मिळाल्यानंतर ईडीच्या पथकाने तिहार तुरुंगालाही भेट दिली होती.
नोराला सुकेशने बीएमडब्ल्यू आणि आयफोनही दिला होता
सूत्रांच्या माहितीनुसार, केवळ जॅकलिनच नाही तर अभिनेत्री नोरा फतेही हिलादेखील सुकेशने आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याकडून नोराला अनेक महागड्या भेटवस्तूही पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे नोराही ईडीच्या रडारवर आली आहे. सुकेशने नोराला सुमारे एक कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू आणि आयफोन गिफ्ट केल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. ईडीने 14 ऑक्टोबर रोजी नोराची चौकशी केली होती. नोराला सुकेशसमोर बसवण्यात आले होते आणि मग प्रश्न विचारण्यात आले होते. चौकशीदरम्यान नोराने सांगितले होते की, 2020 मध्ये ती चेन्नईतील एका कार्यक्रमाला गेली होती. या कार्यक्रमात तिला सुकेशची पत्नी आणि अभिनेत्री लीना पॉलने बोलावले होते. लीना एक अभिनेत्री देखील आहे आणि तिने मद्रास कॅफेमध्ये काम केले होते.
या आरोपाखाली तुरुंगात आहे सुकेश चंद्रशेखर
सुकेश चंद्रशेखरशी संबंधित प्रकरणात प्रथम दिल्ली पोलिसात एफआयआर नोंदवण्यात आला होता. दिल्ली ईओडब्ल्यूने ऑगस्टमध्ये त्या एफआयआरची चौकशी सुरू केली. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचीही चौकशी सुरू केली होती. रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मालविंदर सिंग यांच्या पत्नींना तुरुंगातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने 200 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा सुकेशवर आरोप आहे. तो कधी स्वत:ला पीएम ऑफिस तर कधी गृहमंत्रालयाशी संबंधित अधिकारी असल्याचे सांगत असे. या फसवणुकीत तिहार तुरुंगातील अनेक अधिकारीही सहभागी होते. सुकेश या सर्वांना मोठी रक्कम द्यायचा.
ईडीने 24 ऑगस्ट रोजी सुकेशचा चेन्नईतील सी-फेसिंग बंगला जप्त केला होता. बंगल्यातून 82.5 लाख रुपये, 2 किलो सोने आणि 12 पेक्षा जास्त आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.