आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात गझलचा उल्लेख होताच जे नाव सर्वप्रथम घेतलं जातं ते नाव म्हणजे जगजीत सिंग. गझल नवाज जगजीत सिंग यांची आज 80 वी जयंती आहे. 8 फेब्रुवारी 1941 रोजी राजस्थानात श्रीगंगानगर येथे अमरसिंग धीमन आणि बचन कौर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. चार बहिणी आणि दोन भावांसह राहणाऱ्या जगजीत सिंग यांना घरी 'जीत' या टोपण नावाने बोलावत. तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणाऱ्या जगजीत सिंग यांनी हजारो गझला गायल्या आणि अजरामर केल्या. जगजीत सिंग यांचे 80 अल्बम संगीत जगतात विक्रम नोंदवणारे ठरले. संगीत अल्बम ही संकल्पनाच जगजीत सिंग आणि चित्रा सिंग या दांपत्याने भारतात पहिल्यांदा रुजवली.
मुलाच्या मृत्यूने खचले होते जगजीत सिंग
जगजीत सिंग यांना एकुलता एक मुलगा होता. विवेक सिंग हे त्याचे नाव. मात्र 1990 साली एका कार दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या मुलाचे वय केवळ 21 वर्षे होते. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी दुःखद घटना होती. मुलाला गमावल्याचा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. मुलाच्या मृत्यून ते खचले होते. सहा महिने ते या धक्क्यातून सावरु शकले नव्हते. जगजीत सिंग यांनी 'ना चिठ्ठी ना कोई संदेश...' ही गझल आपल्या मुलाच्या मृत्यूने दुःखी होऊन लिहिली होती.
जगजीत सिंग यांची पत्नी चित्रा सिंग आपल्या मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन करु शकल्या नाही. आपल्या मुलाच्या मृत्यूचा एवढा परिणाम त्यांच्यावर झाला, की त्यांनी गाणेच सोडून दिले होते. 'समवन समव्हेअर' हा त्यांचा शेवटचा अल्बम होता. या अल्बममध्ये जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी एकत्र गाणी म्हटली होती.
जगजीत सिंग यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यास त्यांच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. जगजित सिंग यांनी ब्युरोक्रेट व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगजीत यांना आपल्या कुटुंबीयांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. मुंबईत दाखल झाल्यानंतर जगजित सिंग यांना आर्थिक अचडणींचा सामना करावा लागला होता. आपल्या उदरनिर्वाहासाठी ते लग्न समारंभात गात होते.
अल्बमच्या विक्रीतून होणा-या नफ्यातील काही भाग गीतकारांना देण्याची पद्धत जगजीत सिंग यांनी सुरु केली होती. सुरुवातीला गीतकाराला केवळ गाणं लिहून द्यायचे पैसे मिळत होते. अल्बमच्या विक्रीतून होणारा नफा त्यांना मिळत नव्हता. मात्र जगजीत सिंग यांनी गीतकारांना नफा मिळवून देणे सुरु केले होते.
जगजीत सिंग यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. घरात वीज नसल्यामुळे त्यांना दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करावा लागायचा.
पार्श्वगायक कुमार शानू यांना त्यांचा पहिला मोठा ब्रेक जगजीत सिंग यांनीच दिला होता.
डिजिटल सीडी अल्बम लाँच करणारे जगजीत सिंग भारतातील पहिले संगीतकार होते. त्यांनी 1987 साली 'बियॉन्ड टाईम' या नावाने पहिला डिजिटल सीडी अल्बम लाँच केला होता.
1982 साली आयोजित करण्यात आलेल्या जगजीत सिंग यांच्या 'लाईव अॅट रॉयल अल्बर्ट हॉल' या लाईव्ह कॉन्सर्टच्या तिकिट केवळ तीन तासांत विकल्या गेल्या होत्या.
सर्वसामान्य रसिकांपर्यंत गझल पोहोचवणारे जगजीत सिंग यांनी 10 ऑक्टोबर 2011 या दिवशी जगाचा कायमचा निरोप घेतला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.