आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी केले असून त्यांना पुढील सुनावणीला कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीदरम्यान अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्याच्या पार्श्वभूमीवर तालिबान आणि संघाची कथित तुलना केली होती. यावर स्वत:ला संघ समर्थक असल्याचा दावा करणारे वकील संतोष दुबे यांनी या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर कोर्टाने जावेद अख्तर यांना कोर्टापुढे हजर राहण्याचा आदेश दिले आहेत. जावेद अख्तर यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी संघाचे नाव अनावश्यकपणे वादात ओढले, असा आरोप संतोष दुबे यांनी केला आहे. संतोष दुबे यांनी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात जावेद अख्तर यांच्याविरोधात आयपीसी कलम 499(मानहानी), 500(बदनामी) अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
6 जानेवारीला हजर राहण्याचे मुलुंड न्यायालयाचे आदेश
जावेद अख्तर यांनी राजकीय हेतूने आरएसएसच्या नावाचा अनावश्यकपणे वापर केल्याचे दुबे यांनी म्हटले आहे. त्याची दखल घेऊन न्यायालयाने जावेद अख्तर यांना मंगळवारी समन्स बजावत 6 जानेवारी रोजी मुलुंड न्यायालयात होणाऱ्या पुढील सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी केली होती तुलना
ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानमधील सत्तांतरानंतर जगभरात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यातच जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीवर यासंदर्भात मत व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची थेट तालिबानशी तुलना केली होती. संघाची विचारसरणी ही तालिबानींसारखी आहे, आरएसएस लोकांची दिशाभूल करते, त्यांचे मानसिक खच्चीकरण असल्याचे मत अख्तर यांनी व्यक्त केलं होते. यामुळे संघाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा आरोप संतोष दुबे यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.