आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळ फिल्म इंडस्ट्रीमधील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून एटलीला ओळखले जाते. लवकरच एटली 'जवान' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याच्या या चित्रपटात बॉलिवूडचा किंग शाहरुख खान झळकणार आहे. आता एटलीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. एटली बाबा झाला आहे. त्याची प्रिया मोहनने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
दिग्दर्शक एटलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. "आई-वडील होण्याची भावना वेगळीच आहे. आम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. पालकत्वाचा प्रवास आजपासून सुरू होत आहे," असे कॅप्शन त्याने पोस्टला दिले आहे. लग्नाच्या आठ वर्षांनी प्रिया आणि एटलीच्या घरी पाळणा हलला आहे.
काही दिवसांपूर्वी एटलीची पत्नी कृष्णा प्रिया हिने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. "आम्ही गरोदर आहोत हे जाहीर करताना आनंद होत आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे. विथ लव एटली आणि प्रिया," असे कॅप्शन तिने दिले होते. तर एटली म्हणाला होता, "आम्ही तुमच्या सर्वांचे प्रेम आणि समर्थनासाठी कृतज्ञ आहोत आणि तुम्ही आमच्या येणाऱ्या नव्या पाहुण्यावर अशाच प्रेमाचा वर्षाव करत रहावे अशी आमची इच्छा आहे."
जवळजवळ आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर एटली आणि प्रिया यांनी 2014 मध्ये लग्न केले होते. अनेकदा एटलीला त्याच्या रंगावरुन ट्रोल केले जाते, पण त्याने त्याच्या कामातून तो खणखणीत नाणं असल्याचे सिद्ध केले आहे.
कोण आहे एटली?
एटली कुमार हा हिंदीत पदार्पण करणार असला तरी तो तामिळ फिल्म इंडस्ट्रीमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. तामिळनाडूमधील मदुरईमध्ये 21 सप्टेंबर 1986 रोजी जन्मलेल्या एटलीचे पूर्ण नाव अरुण कुमार आहे. एटली तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शनाबरोबरच स्क्रीनप्ले रायटींग आणि निर्माता म्हणून ओळखला जातो. 2013 मध्ये 'राजा राणी' चित्रपटामधून एटलीने तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. फॉक्स स्टार स्टुडिओ आणि ए. आर. मुर्गुदास यांची संयुक्त निर्मिती असणाऱ्या ‘राजा राणी’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. ‘राजा राणी’ चित्रपटाच्या आधी एटलीने एस शंकर यांच्या एन्थीरान (2010) आणि नानबान (2012) चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. ‘राजा राणी’च्या यशानंतर त्याने थारी (2016), मिरसाल (2017) आणि बिगील (2019) या चित्रपटाचे दिग्दर्शन निर्मिती आणि स्क्रीन प्ले रायटींग केले. दिग्दर्शनानंतर त्याने ‘ए ऑफ अॅपल प्रोडक्शन’ नावाची कंपनी स्थापन करुन निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.