आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे:पहिल्याच चित्रपटात जितेंद्र यांनी साकारला हिरोईनच्या बॉडी डबलचा रोल, धर्मेंद्रमुळे होऊ शकले नाही हेमामालिनीसोबत लग्न

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या खास डान्स शैलीसाठी ओळखले जाणारे आणि जंपिंग जॅक नावाने प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण केली आहेत. जितेंद्र यांनी 1960-90 दरम्यान श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट दिले. 'नवरंग' या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली, मात्र 'फर्ज' या चित्रपटाने त्यांना मोठा ब्रेक दिला. जितेंद्र इतके प्रसिद्ध झाले की त्यांनी परिधान केलेले कपडे भारतीय बाजारपेठेत विकले जाऊ लागले. अभिनयासोबतच जितेंद्र यांनी प्रॉडक्शन हाऊसमधूनही भरपूर कमाई केली, पण चित्रपटांची निर्मिती करताना जीतेंद्र दोनदा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरही आले होते. पण जितेंद्र यांनी यावर मात करत दमदार पुनरागमन केले आणि 1512 कोटींहून अधिकचे साम्राज्य उभे केले.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया-

हलाखीत गेले बालपण, घरात पंखा लावला तर जमली होती गर्दी
जितेंद्र यांचा जन्म अमृतसरमध्ये दागिने विकणाऱ्या अमरनाथ यांच्या घरी झाला. त्यांचे खरे नाव रवी कपूर हे आहे. पण चित्रपटात येण्यापूर्वी जितेंद्र या नावाने रंगभूमीवर पाऊल ठेवले होते. जितेंद्र 20 वर्षे मुंबईतील गोरेगाव येथील एका चाळीत राहिले. 4 मजली इमारतीत जितेंद्र 80 कुटुंबांसह राहत होते. हलाखीची परिस्थिती असताना जेव्हा जितेंद्र यांनी त्यांच्या घरात पंखा लावला तेव्हा संपूर्ण चाळीतील लोक तो पंखा बघण्यासाठी त्यांच्या घरी जमले होते.

पहिल्याच चित्रपटात बनले होते हिरोईनचे बॉडी डबल
सेंट सेबॅस्टिअन शाळेत शिकत असतानाच त्यांची राजेश खन्ना यांच्याशी ओळख झाली. जितेंद्र यांचे वडील फिल्म इंडस्ट्रीत दागिने सप्लाय करत असे. जितेंद्र आपल्या वडिलांना मदत करत असताना चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांना दागिने पुरवत असत. त्यासाठी त्यांना महिन्याला 100 रुपये मिळायचे. एके दिवशी शांताराम यांनी जितेंद्र यांना 'नवरंग' चित्रपटात कास्ट केले. पण या चित्रपटात त्यांनी मुख्य नायिका संध्यासारखे तयार होऊन त्यांच्या बॉडी डबलचा अभिनय केला.

झाले असे की, आगीतून उडी मारण्याच्या दृश्यासाठी कोणतीही मुलगी तयार नव्हती, त्यामुळे सेटवर उपस्थित असलेल्या जितेंद्र यांनी ही जबाबदारी पेलली. त्यांनी मुलीचा गेटअप घेऊन शूटिंग पूर्ण केले होते. जितेंद्र यांच्या मदतीमुळे प्रभावित होऊन शांताराम यांनी त्यांना 'गीत गाया पत्थरों' (1964) मध्ये मुख्य भूमिका दिली.

25 रिटेक करूनही 'टिड्डियों' हा शब्द बोलू शकले नाही, नाराज दिग्दर्शकाने चुकीचा सीन फायनल केला

व्ही. शांताराम यांच्या एका चित्रपटात जितेंद्र यांना एक छोटासा संवाद म्हणायचा होता. जितेंद्र यांना म्हणायचे होते, 'सरदार..सरदार.. दुश्मन का दल टिड्डियों की तरह आगे बढ़ता ही आ रहा है।' पण प्रत्येकवेळी जितेंद्र 'टिड्डियों' या शब्दावर अडकायचे. काही वेळातच 25 रिटेक झाले आणि सेटवरील सर्वजण नाराज झाले. दिग्दर्शक व्ही. शांताराम देखील हे पाहून इतके नाराज झाले की त्यांनी चुकीच्या उच्चारांसह संवादाला अंतिम रूप दिले.

पहिला चित्रपट बघायला वडील आले, थिएटर रिकामे होते
1964 मध्ये जितेंद्र यांचा पहिला चित्रपट 'गीत गाया पत्थरों' ने प्रदर्शित झाला होता. जितेंद्र यांनी त्यांच्या आई-वडिलांसाठी तिकिटे खरेदी केली. त्यावेळी ते गोरेगावच्या चाळीत राहत होते आणि थिएटर चाळीजवळ होते. दोघेही चित्रपट बघायला पोहोचले तेव्हा गेटकीपरकडे जाऊन तिकीट दाखवून विचारले, हे आमचे तिकीट आहे, कुठे बसायचे? उत्तर मिळाले, संपूर्ण थिएटर रिकामे पडले आहे, हवे तेथे बसा. हे ऐकून वडील संतापले आणि म्हणाले, आमचे जे तिकीट आहे तिथेच आम्ही बसू. सुरुवातीचे काही दिवस हा चित्रपट चालला नाही, पण 10-15 दिवसांनी प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली.

चित्रपट फ्लॉप होऊ लागल्याने स्वतः खरेदी केली होती सर्व तिकिटे
1967 मध्ये आलेला 'फर्ज' हा रविकांत नागाइच यांचा दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. नवोदित दिग्दर्शकासोबत काम करण्याचा धोका पत्करण्यास कोणताही अभिनेता तयार नव्हता. त्यामुळे नवोदित जितेंद्रची चित्रपटाचा नायक म्हणून निवड करण्यात आली. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटगृहे रिकामी होती.

जितेंद्र यांना चित्रपट फ्लॉप ठरला तर मार्केटमध्ये प्रतिमा खराब होईल अशी भीती वाटली होती. या भीतीपोटी जितेंद्र यांनी पाच हजार रुपये खर्चून अनेक चित्रपटगृहांची पूर्ण तिकिटे खरेदी केली. काही काळानंतर अचानक लोकांमध्ये चित्रपटाची क्रेझ वाढली आणि सर्व शो हाऊसफुल्ल होऊ लागले. जितेंद्र यांना स्टारपद बहाल करणारा हा चित्रपट ठरला.

'फर्ज' चित्रपटातून बनले ट्रेंडसेटर
जितेंद्र यांना 1967 मध्ये आलेल्या 'फर्ज' या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील 'मस्त बहारों का मैं आशिक' हे गाणे खूप गाजले आणि त्यांनी परिधान केलेले कपडे आणि बूट हा ट्रेंड बनला. यानंतर सतत हिट्स देत जितेंद्र यांची गणना टॉप हिरोमध्ये होऊ लागली.

वयाच्या 14 वर्षी पडले होते प्रेमात
वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी जितेंद्र शोभा कपूर यांच्या प्रेमात पडले होते. 1956-74 पर्यंत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केले. या जोडप्याला एकता कपूर आणि तुषार कपूर ही दोन मुले आहेत.

संजीव कुमार यांच्या प्रेमपत्रात लिहिले होते स्वतःचे नाव
एकेकाळी हेमा आणि धर्मेंद्र यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, तेव्हा संजीव कुमार यांनी हेमा यांच्यावरील आपले प्रेम व्यक्त करण्याचा निर्णय घेतला केला. संजीव यांनी जितेंद्र यांच्याकडून हेमासाठी प्रेमपत्र लिहून घेतले आणि त्यांच्याच हातून हेमा यांच्या घरी पाठवले. हेमा यांच्या घरी पोहोचलेले जितेंद्र मात्र स्वतः हेमा यांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी मोठ्या हुशारीने पत्रात संजीवच्या जागी स्वतःचे नाव लिहिले होते.

हेमा यांच्या कुटुंबीयांना धर्मेंद्र आणि संजीव आवडत नव्हते, पण ते जितेंद्रला पसंत करायचे. नातेवाईक आणि पंडित यांच्यासोबत दोनच दिवसांत जितेंद्र हेमा यांच्या घरी पोहोचले. त्याचवेळी त्यांची होणारी पत्नी शोभा यांना याबाबत समजले आणि त्यांनी हेमाच्या घरी जाऊन चांगलाच गोंधळ घातला. दुसरीकडे धर्मेंद्र यांनी हेमा यांच्या घरी फोन करुन आत्महत्येची धमकी दिली, तेव्हा हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्यास होकार दिला.

करवा चौथच्या दिवशी पत्नीने वाचवला जीव
1975 मध्ये शोभा यांनी जितेंद्र यांच्यासाठी करवा चौथचा उपवास ठेवला होता, पण त्याच दिवशी त्यांना शूटिंगसाठी निघावे लागले होते. त्यांच्या फ्लाइटला उशीर झाल्याने जितेंद्र पत्नीचा उपवास सोडण्यासाठी विमानतळावरून घरी पोहोचले. फ्लाइटची वेळ झाली तेव्हा शोभा यांनी आग्रह करून त्यांना घरी थांबवले. जितेंद्र यांनी मेकअप आर्टिस्टला परत बोलावले आणि दुसऱ्या दिवशी निघण्याचा निर्णय घेतला. पाली हिल येथील घरातून जितेंद्र यांनी विमानतळाकडे पाहिले असता मोठी आग लागलेली दिसली. थोड्याच वेळात बातमी आली की, जितेंद्र ज्या इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइटने जाणार होते ते क्रॅश झाले आहे.

200 चित्रपट पण पुरस्कार एकही नाही
जितेंद्र यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपट केले पण त्यांना अभिनयासाठी एकही पुरस्कार मिळाला नाही. जितेंद्र यांना 2002 ते 2012 पर्यंत 5 वेळा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दोन वेळा दिवाळखोर झाले पण आज 1512 कोटींच्या संपत्तीचे मालक
करिअरच्या सुरुवातीला जितेंद्र यांना महिन्याला 100 रुपये मिळत होते, पण आज हेच जितेंद्र 1512 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. 40 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत जितेंद्र दोनदा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे राहिले. 1972-74 च्या दरम्यान जितेंद्र यांना चित्रपटांमध्ये काम मिळू शकले नाही, त्यामुळे ते बेरोजगार झाले होते. जितेंद्र यांनी 1982 मध्ये आपली संपूर्ण जमापुंजी खर्च करुन 'दीदार-ए-यार' हा चित्रपट बनवला, पण तो फ्लॉप झाला. यामुळे जितेंद्र यांना 2.5 कोटींचे नुकसान झाले आणि ते पुन्हा हलाखीच्या परिस्थिती आले. यातून सावरण्यासाठी त्यांनी एकापाठोपाठ एक 60 चित्रपट केले, त्यापैकी बहुतेक चित्रपट हे रिमेक होते.

गेल्या अनेक वर्षांपासून जितेंद्र चित्रपटांमध्ये दिसले नाहीत. पण त्यांचे होम प्रोडक्शन असलेल्या बालाजी टेलिफिल्म्स, ऑल्ट एंटरटेन्मेंट, बालाजी मोशन पिक्चरच्या माध्यमातून दरवर्षी ते 200-300 कोटींची कमाई करतात. जितेंद्र यांच्याकडे मुंबई आणि इतर शहरांमध्ये अनेक लग्झरी प्रॉपर्टी आहेत. ते मुंबईत ज्या घरात वास्तव्याला आहेत, त्याची किंमत तब्बल 90 कोटींच्या घरात आहे.