आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्षभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या झिम्मा या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता हेमंत ढोमे या चित्रपटाचा दुसरा भाग 'झिम्मा 2' घेऊन येत आहे. नुकताच चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 19 नोव्हेंबर 2021 रोजी 'झिम्मा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लॉकडाउननंतर बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला हा पहिला मराठी चित्रपट होता. चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले होते. परदेशातही चित्रपटाला पसंतीची पोचपावती मिळाली होती. आता हेमंत ढोमे प्रेक्षकांना कुठल्या प्रवासाला घेऊन जाणार याची उत्सुकता लागली आहे.
हेमंत ढोमेने त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवर 'झिम्मा 2'चा मजेशीर टिझर शेअर केला आहे. 'पुढच्या ट्रिपची तयारी सुरू… पुन्हा खेळूया आनंदाचा खेळ..! झिम्मा 2 तुमच्या भेटीला दसऱ्याच्या मुहूर्तावर!,' असे कॅप्शन त्याला दिले आहे.
या व्हिडिओत निर्मला (निर्मिती सावंत) साहेबांकडे (अनंत जोग) पुन्हा एकगा फिरायला जाण्यासाठी परवानगी मागतात. पण यावेळी साहेब त्यांच्यासोबत ट्रीपला जाण्याची तयारी दर्शवतात. मात्र त्यांना नकार देत पुन्हा एकदा बाया बायाच ट्रीपला जायची तयारी करत असल्याचे निर्मला साहेबांना सांगतात. साहेब मात्र यावेळी सूनबाईंना बरोबर घेऊन जा, असे आपल्या पत्नीला सांगतात. आता निर्मला आणि साहेबांची ही सूनबाई कोण, यावेळी ट्रीप कुठे जाणार आणि या ट्रीपमध्ये निर्मला यांच्यासोबतचे सोबती कोण असणार, हे लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मिती धुरा आनंद एल. राय आणि क्षिती जोग यांनी सांभाळली असून विराज गवस, उर्फी काझमी आणि अजिंक्य ढमाळ याचे सहनिर्माते आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी प्यू फिल्म्स निर्मित हा चित्रपट येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाविषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतो, "झिम्मावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. यातील प्रत्येकीमध्ये गृहिणींनी, तरुणींनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. कधी दोन दिवसही एकट्या घराबाहेर न राहिलेल्या महिलांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत आठवडाभर बाहेर जाण्याचे प्लॅन्स केले. झिम्मा सर्वांनाच खूप जवळचा वाटला. अनेकींनी 'झिम्मा 2' लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन या, अशी मागणीही केली. त्या सगळ्या मैत्रिणींच्या आग्रहाखातरच मी 'झिम्मा 2'चा निर्णय घेतला आणि आता लवकरच 'झिम्मा 2' ही सिमोल्लंघन करण्यासाठी येणार आहे. यावेळी मजा डबल झाली असून हा चित्रपटही प्रेक्षक तितकाच एन्जॉय करतील," असे हेमंत ढोमे म्हणाला आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. आता 'झिम्मा 2'मध्ये हीच स्टारकास्ट राहणार की नवीन कलाकारांची एन्ट्री होणार यावरुन लवकरच पडदा उचचला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.