आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेथ अ‍ॅनिव्हर्सरी:वयाच्या 18 व्या वर्षी साकारली होती अमिताभ यांच्या प्रेयसीची भूमिका, सुसाईड नोटमध्ये लिहिले होते- तू माझी स्वप्ने हिरावली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयाच्या 6 व्या वर्षी अभिनेत्री होण्याचा घेतला होता निर्णय

निशब्द, गजनी आणि हाऊसफुल या चित्रपटांत झळकलेली जिया खानला या जगाचा निरोप घेऊन आज 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. जियाने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी हिरोईन बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि वयाच्या 16 वर्षी ते प्रत्यक्षातदेखील आणले. जिया 'तुमसा नहीं देखा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती, परंतु काही कारणास्तव तिची जागा दिया मिर्झाने घेतली. जिया हळूहळू इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करत होती. तिच्या हातात अनेक चित्रपट होते, पण दुर्दैवाने 3 जून 2013 रोजी जियाने या जगाचा कायमचा निरोप घेतला. तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. आज, तिच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या आणि न ऐकलेल्या गोष्टी -

न्यूयॉर्कमध्ये झाला होता जियाचा जन्म
जिया खानचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 रोजी न्यूयॉर्क शहरात झाला होता. तिच्या आईवडिलांनी तिचे नाव नफीला अली रिझवी ठेवले. तिची आई राबिया खान 80 च्या दशकातील एक नावाजलेली अभिनेत्री होती, तर वडील अली रिझवी खान हे व्यापारी होते. जियाच्या जन्मानंतर तिच्या आई-वडिलांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. जिया 2 वर्षांची असताना तिचे वडील दोघींना सोडून निघून गेले, त्यानंतर आई राबियाने जियाला एकटीने वाढवले.

वयाच्या 6 व्या वर्षी अभिनेत्री होण्याचा घेतला होता निर्णय
जिया खानवर लहानपणापासूनच चित्रपटांचा प्रभाव होता. वयाच्या 6 व्या वर्षी राम गोपाल वर्मा यांच्या 'रंगीला' चित्रपटात उर्मिला मातोंडकरला पाहून तिने नायिका बनण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जियाने अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी मॅनहॅटनमधील ली स्टार्सबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. शिक्षणादरम्यान तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. अभिनयासोबतच जियाने नृत्याचेही प्रशिक्षण घेतले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जिया चित्रपटांत नशीब आजमावण्यासाठी मुंबईत दाखल झाली होती.

वयाच्या 16 व्या वर्षी मिळाला होता पहिला चित्रपट, पण हातून निसटला
जिया खानला मुकेश भट्ट यांच्या 'तुमसा नहीं देखा' या चित्रपटाची पहिली ऑफर मिळाली होती. वयाच्या 16 व्या वर्षी तिने हा चित्रपट साईन केला होता. जेव्हा चित्रपट सुरू झाला तेव्हा जिया आणि दिग्दर्शक मुकेश भट्ट यांचे एकमत झाले की, जियाने एवढ्य कमी वयात मॅच्युअर मुलीची भूमिका साकारणे योग्य नाही. अखेर जियाने हा चित्रपट सोडला आणि इमरान खानसोबत दीया मिर्झाची वर्णी या चित्रपटात लागली.

'निशब्द'द्वारे झाली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, जियाला राम गोपाल वर्मांच्या 'निशब्द' या थ्रिलर चित्रपटात कास्ट करण्यात आले. त्या वेळी जिया अवघ्या 18 वर्षांची होती, तिला अमिताभ बच्चन (64) यांच्या अपोझिट भूमिका देण्यात आली होती. या चित्रपटात दोघांचा रोमँटिक प्लॉट आणि किसिंग सीनदेखील होते. चित्रपट रिलीज होताच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आणि बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी दाखवू शकला नाही. हा चित्रपट कदाचित वादात सापडला असेल पण जियाला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले. जियाच्या अभिनयाला समीक्षकांची दाद मिळाली. त्याच वर्षी, जिया आमिर खानसोबत 2007 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'गजनी'मध्ये झळकली.

शाहिदसोबतच्या वाढत्या जवळीकीमुळे चित्रपटातून वगळण्यात आले

2010 मध्ये जिया खानला शाहिद कपूरसोबत 'चान्स पे डान्स' या चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले होते, मात्र काही दिवसांनी दिग्दर्शक केन घोष यांनी जियाला चित्रपटातून काढून टाकले. ते म्हणाले होते की, जियाची सेटवर शाहिद कपूरसोबतची जवळीक वाढत आहे. त्यामुळे ती तिचे काम नीट करत नाहीये. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जियाने सांगितले की, दिग्दर्शकाची तिच्यावर वाईट नजर होती, त्यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. जियाच्या जागी जिनिलियाला कास्ट करण्यात आले होते.

2010 मध्ये जिया खान हाऊसफुलमध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली. हा चित्रपट तिच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ठरला. सर्वाधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटात जियाच्या कामाचे पुन्हा एकदा कौतुक झाले. त्यानंतर जियाला रणबीर कपूरसोबत 'आप का साया'मध्ये कास्ट करण्यात आले होते, पण त्यापूर्वीच तिचे निधन झाले.

3 जून 2013 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली
3 जून 2013 रोजी जिया खानने रात्री 11 ते 11:30 च्या दरम्यान तिच्या जुहू येथील घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यावेळी तिची आई आणि बहीण घरात नव्हत्या. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि 5 जूनला जियावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

6 पानी सुसाईड नोटमध्ये सांगितले होते मृत्यूचे कारण
जिया खानच्या मृत्यूच्या 4 दिवसांनंतर 7 जून रोजी जियाच्या बहिणीला घरात सहा पानी सुसाईड नोट सापडली होती. हे पत्र जियाने लिहिले होते. यात जियाने बॉयफ्रेंड आणि अभिनेता सूरज पांचोलीविषयी लिहिले होते. सूरजसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तिला कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागले होते, याचा उल्लेख या पत्रात होता. जियाच्या मृत्यूनंतर सूरजला अटकदेखील झाली होती.

जियाने सूरज पांचोलीला उद्देशून लिहिले होते, "तुझ्या आयुष्यात महिला आणि पार्टीज आहेत. मी खूप दुखावले गेले आहे. मी माझे बाळ गमावले. तू माझा ख्रिसमस आणि माझा बर्थडे डिनरदेखील खराब केला. व्हॅलेंटाईन डेलासुद्धा तू माझ्यापासून दूर राहिलास. तू मला वचन दिले होते की, एका वर्षाच्या आत तू माझ्याशी लग्न करशील. मला माहिती नाही की, मी या सर्व गोष्टी तुला कशा सांगू. परंतु, आता माझ्याकडे काही उरलेले नाही. मी माझे सर्व काही गमावले आहे. जर तू हे वाचत असशील तर त्यावेळी मी या जगात नसेन. मी आतून तुटले. मी तुझ्यावर प्रेम केले. तरीही तू मला रोज टॉर्चर केले. आता श्वास घेण्यासाठी माझ्याकडे कुठलेही कारण नाही. मला केवळ प्रेम हवे होते. मी तुझ्यासाठी सर्वकाही केले. मी आपल्या दोघांसाठी काम करत होते. माझे भविष्य उद्धवस्त झाले. माझा आनंद तू हिरावून घेतलास. तू कधी माझे प्रेम पाहिलेच नाहीस. माझा स्वाभीमान आणि आत्मविश्वास उरलाच नाहीये. माझे जेदेखील कौशल्य, महत्त्वकांक्षा होत्या, त्या सर्व तू हिरावून घेतल्या आहेत. माझे आयुष्य उद्धवस्त केले आहेस."
.....

बातम्या आणखी आहेत...