आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा"जिया खान खूप चांगली मुलगी होती. तिने कधीही माझ्यावर वैयक्तिक किंवा माध्यमांमध्ये आरोप केले नाहीत. मी जियाला फक्त पाच महिन्यांपासून ओळखत होतो. ती माझी चांगली मैत्रीण होती. त्यावेळी मी फक्त 20 वर्षांचा होतो आणि माझे संपूर्ण लक्ष माझ्या करिअरवर होते. एक मित्र म्हणून मी जियाला जमेल तशी मी मदत केली. त्या वयात मला माझी नीट काळजी घेता आली नाही, पण माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठ्या असलेल्या जियाची काळजी घेण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. पण त्यावेळी जियाला कुटुंबाची जास्त गरज होती. ती वयाच्या 16 व्या वर्षापासून तिच्या कुटुंबाची काळजी घेत होती. तेव्हा जियाला प्रेमाची गरज होती, मदतीची गरज होती, तेव्हा मी इथे होतो, तिचे कुटुंब तिच्यासोबत नव्हते.
जियाने कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक समस्या आणि मानसिक आजारामुळे आत्महत्या केली. मी जियाची आई राबिया खान यांनाही जियाला चांगल्या डॉक्टरांकडे नेण्यास सांगितले होते. तिच्यावर उपचार करा पण त्यांनी ते ऐकले नाही. त्या फक्त तिच्यावर काम करण्यासाठी दबाव टाकत होत्या. जेव्हा त्यांना आर्थिक मदतीची गरज होती तेव्हाचे ते जियाला जवळ करायचे..."
जिया खान आत्महत्या प्रकरणात नुकताच निर्दोष सुटलेला अभिनेता सूरज पांचोलीने या सर्व गोष्टी न्यायालयात सांगितल्या आहेत. अभिनेत्री जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गेल्या 10 वर्षांपासून त्याच्यावर खटला सुरू होता. 28 एप्रिल रोजी त्याला या सर्व आरोपातून मुक्त करण्यात आले. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीने नुकतीच दैनिक भास्करशी बातचीत केली आहे.
निकालाच्या दिवशी कोर्टाच्या कोणत्याही निर्णयासाठी सूरज तयार होता
सूरज म्हणाला, "निकालाच्या आदल्या रात्री मी झोपू शकलो नाही. एवढ्या वर्षांत मी जे काही भोगले आहे ते सर्व माझ्या मनात होते. तरीही मी कोर्टाच्या कोणत्याही निर्णयाला सामोरे जाण्यास तयार होतो. मी संपूर्ण ट्रायलचा सामना केला आहे. ते कुणीही पाहिले नाही, अगदी माझ्या कुटुंबानेदेखील. न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानेच आम्ही यातून बाहेर पडू, अशी आशा होती. त्यांच्याकडे माझ्या विरोधात काहीच नव्हते. माझ्याविरोधात पूर्णपणे चुकीचा खटला चालवण्यात आला. ज्यासाठी मी माझी 10 वर्षे घालवली," असे सूरज सांगतो.
कुटुंबापेक्षा सलमान सरांनी मदत केली
या कठीण काळात चित्रपटसृष्टीतून कुणी सर्वात जास्त पाठिंबा दिला, असा प्रश्न सूरजला विचारण्यात आला. याचे उत्तर देताना सूरजने सलमान खानचे नाव घेतले. तो म्हणाला, "नक्कीच सलमान सर पहिल्या क्रमांकावर होते. त्यांनी माझ्यासाठी जे काही केले ते इतर कुणीही करू शकले नाही. अगदी माझ्या घरच्यांनीही तेवढे केले नाही. याशिवाय मला भूषण कुमार सर, रेमो सर आणि अहमद खान सर यांचेही सहकार्य लाभले. मात्र जे सहकार्य निर्माते आणि स्टुडिओने करायला हवे होते, ते कोणी करू शकले नाही."
"कोर्टातून बाहेर पडताच मी त्याला पहिला मेसेज केला. सलमान म्हणाला, ‘सूरज, तू काहीही चुकीचे केलेले नाही हे तुला माहीत असेल तर तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही," असे सूरज म्हणाला.
मी जिथेही काम मागायला जायचो, तिथे सगळे प्रकरणाविषयी विचारणा करायचे
सूरजने पुढे सांगितले, "केवळ व्यावसायिकदृष्ट्याच नव्हे तर जेव्हा जेव्हा मी माझे मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा नवीन लोकांना भेटायचो तेव्हा प्रत्येकाचा माझ्याकडे बघण्याचा एकच दृष्टिकोन असायचा. मी गेल्या 10 वर्षांत अनेक लोकांकडे काम मागितले, पण या प्रकरणामुळे कोणीही मला काम दिले नाही. ज्याला देशाबाहेर जाण्याची परवानगी नाही आणि डोक्यावर टांगती तलवार आहे अशा व्यक्तीसोबत कॉर्पोरेट्स आणि स्टुडिओला काम करायचे नव्हते. मला आधी क्लीन चिट मिळावी अशी त्यांची इच्छा होती."
एकाही कंपनी जाहिरातीतदेखील काम दिले नाही
सूरजने सांगितले, "या प्रकरणामुळे कोणत्याही कंपनीने माझ्याशी करार केला नाही. जाहिरात क्षेत्रातही माझे खूप नुकसान झाले. तुमच्यावर खटला सुरू असताना एखादी कंपनी तुम्हाला त्यांच्या जाहिरातीत का घेईल. या प्रकरणामुळे अनेक प्रोजेक्ट माझ्या हातून निसटले."
'सुसाइड नोट जियाने नव्हे तर तिच्या आईने लिहिली होती'
हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यास त्यावर तुझी प्रतिक्रिया काय असेल, असा प्रश्न सूरजला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना सूरज म्हणाला, 'आम्ही 10 वर्षे यासाठी खूप मेहनत केली आहे. प्रत्येक पुराव्याला उत्तर दिले आहे. आता त्याचे काहीही होऊ शकत नाही. सुसाइड नोट जियाने नव्हे तर तिच्या आईने लिहिली होती, हे न्यायालयात सिद्ध झाले आहे."
"माझी तुम्हाला विनंती आहे की, मला ज्या आधारावर अटक करण्यात आली तो आधारच खोटा आहे, हे सगळ्यांना सांगण्यात यावे. या सुसाइड नोटमुळे माझा मानसिक छळ झाला आहे," असे सूरज म्हणाला.
हस्ताक्षर तज्ज्ञांनी दूध का दूध पानी का पानी केले
सुरजने हस्ताक्षराचा मुद्दा उशिरा का उपस्थित केला? याचे उत्तर देताना तो म्हणाले, 'माझ्यावर आरोप झाल्यानंतर 8 वर्षांनी मला हा मुद्दा मांडण्याची संधी मिळाली, पण तोपर्यंत कोविड आला आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. हे काम पोलिस यंत्रणेचे आहे. आरोपांच्या 8 वर्षानंतर मला या प्रकरणात काहीतरी करण्याची संधी मिळाली."
"10 वर्षांनंतर हँडरायटिंग एक्सपर्टनी स्पष्ट केले की, ते हस्ताक्षर जियाचे नसून तिची आई राबिया खानचे आहे. मग मला अटक का झाली? मात्र, आता कोणीही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जा किंवा त्याहून वर कुठेतरी जा, आता काहीही होऊ शकत नाही," असा विश्वास सूरजने व्यक्त केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.