आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप आज 59 वर्षांचा झाला आहे. जॉनी आपल्या दमदार अभिनयाने आणि शैलीने चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. त्याला त्याचे चाहते 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन'चा 'जॅक स्पॅरो'च्या रुपातदेखील ओळखतात. जॉनी सध्या चर्चेत आहे. त्याची पुर्वाश्रमीची पत्नी अंबर हर्ड हिने त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकालही आला आहे. युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या जबाबानंतर आलेल्या निकालानुसार जॉनी डेपने हा खटला जिंकला आहे.
कौटुंबिक दबावामुळे जॉनी स्वतःला जखमी करायचा
जॉनी डेप एक अभिनेता, निर्माता आणि संगीतकार आहे. त्याचा जन्म 9 जून 1963 रोजी अमेरिकेत झाला. जॉनी 15 वर्षांचा असताना त्याचे आईवडील वेगळे झाले. नंतर त्याच्या आईने रॉबर्ट पामरशी दुसरे लग्न केले. जॉनी रॉबर्ट पामरला आपली सर्वात मोठी प्रेरणा मानत होता. कौटुंबिक दबावामुळे जॉनी अंगावर ओरखडे काढत असे. त्याने सांगितल्यानुसार, त्याच्या शरीरावरील प्रत्येक जखम एक कहाणी सांगते.
संगीतकार होण्यासाठी अर्धवट सोडले होते शिक्षण
जेव्हा जॉनी 12 वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या आईने त्याला गिटार भेट दिली आणि तेव्हापासून डेपने वेगवेगळ्या बँडमध्ये गिटार वाजवायला सुरुवात केली. वयाच्या 16 व्या वर्षी, जॉनीने दहाव्या वर्गात असताना संगीतकार होण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडले. जॉनी काही दिवसांनंतर पुन्हा शाळेत गेला तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याला सांगितले की, त्याने त्याच्या फॅशनचे अनुसरण करावे आणि 1980 मध्ये त्याने द किड्स हा बँड सुरू केला, त्यानंतर त्याने स्वतःचे नाव बदलून सिक्स गन मेथड केले.
'ए नाईटमेअर ऑन एल्म स्ट्रीट' या चित्रपटातून अभिनय करिअरला केली सुरुवात
वयाच्या 20 व्या वर्षी, जॉनी डेप लॉस एंजिलिसला गेला. येथे एके दिवशी तो अभिनेता निकोलस केजला भेटला. निकोलसने जॉनीला अभिनयात करिअर करावे, असा सल्ला दिला. जॉनीलाही अभिनयात रस होता. निकोलसच्या मदतीने त्याने ए नाईटमेअर ऑन एल्म स्ट्रीट या चित्रपटासाठी ऑडिशन दिली आणि या चित्रपटातील भूमिकेसाठीही त्याची निवड झाली. त्यानंतर इथूनच त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली.
टेलिव्हिजन सीरिज '21 जंप स्ट्रीट'मध्ये झळकला जॉनी
जॉनी डेप 1987 मध्ये फॉक्स टीव्ही टेलिव्हिजन सीरिज 21 जंप स्ट्रीटमध्ये दिसला. या सीरिजच्या यशामुळे तो 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध अभिनेता बनला. यानंतर, 1986 मध्ये जॉनीने ऑलिव्हर स्टोनच्या प्लॅटून चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती.
जॉनीने 1990 मध्ये टिम बर्टनच्या एडवर्ड सिझरहँड्स चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या यशानंतर त्याने टीम बर्टनसोबत दीर्घकाळ काम केले.
'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन'मधून जॉनी बनला जॅक स्पॅरो
2003 मध्ये, वॉल्ट डिस्ने पिक्चर्सच्या 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन: द कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल' या चित्रपटाने जॉनी डेपला मोठे यश मिळवून दिले. या चित्रपटातील जॉनीची पायरेट म्हणजेच जॅक स्पॅरोची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या व्यक्तिरेखेने त्याला जगभरात ओळख मिळवून दिली. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा आणि तिसरा भागही प्रदर्शित झाला, जो प्रेक्षकांना खूप आवडला.
त्यानंतर जॉनीने 2005 मध्ये आलेल्या 'चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी' चित्रपटात विल्ली वोंकाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता.
जॉनी डेपची कमाई
जॉनी डेप आणि अंबर हर्ड प्रकरण
1. 2016 मध्ये लग्नबंधनात अडकलेले जॉनी आणि अंबर हर्ड लग्नाच्या वर्षभरानंतरच वेगळे राहू लागले.
2. 58 वर्षीय जॉनी डेपने 2018 मध्ये द वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाबद्दल माजी पत्नी अंबर हर्डविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. जॉनी डेपची पुर्वाश्रमीची पत्नी अंबरने 2018 च्या लेखात स्वत:ला "घरगुती अत्याचाराचे प्रतिनिधित्व करणारी सार्वजनिक व्यक्ती" म्हटले होते.
3. या हायप्रोफाईल प्रकरणाने जगभरात चर्चा एकवटली. ट्रायल्सदरम्यान अंबर हर्डने तिच्या साक्षीत सांगितले की, डेप तिला मारहाण करायचा. डेपवर लैंगिक हिंसाचाराचे आरोपही झाले. डेपनेसुद्धा हर्डवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.
4. यानंतर या प्रकरणाबाबत दोघांमध्ये सुमारे 6 आठवडे कोर्टात सुनावणी झाली.
5. जॉनी डेप आणि अंबर हर्ड या हायप्रोफाइल कायदेशीर लढाईत 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' स्टार जॉनी डेपचा विजय झाला आहे. या कायदेशीर लढाईत एकापाठोपाठ एक अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. या खटल्यातील ज्युरीने अंबर हर्डला मानहानीसाठी दोषी ठरवले आणि तिने जाणीवपूर्वक जॉनी डेपची बदनामी केली, असा निर्णय दिला.
6. डेपला 15 मिलियन डॉलर्स (सुमारे 116 कोटी रुपये) नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याच वेळी हर्डलाही 2 मिलियन डॉलर्स (सुमारे 15.5 कोटी रुपये) भरपाई देण्याचा निर्णयदेखील देण्यात आला आहे. अंबर हर्डने 2018 मध्ये लैंगिक हिंसाचारावर डेपच्या विरोधात एक लेख लिहिला होता. या लेखामुळे डेपची प्रतिष्ठा मलिन झाली. हा लेख दुर्भावनापूर्ण हेतूने लिहिला गेला असल्याचे आढळले. ज्युरीने डेप आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड या दोघांनाही बदनामीसाठी जबाबदार धरले आहे. ज्युरीला असेही आढळले की, डेपचे वकील अॅडम वाल्डमन यांनी हर्डच्या विरोधात विधाने केली, ज्यामुळे तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला. त्यामुळे हर्डलाही 2 मिलियन डॉलर्स भरपाई मिळेल.
जॉनी डेपला अनेक पुरस्कारांनी करण्यात आले आहे सन्मानित
घटस्फोटाच्या प्रकरणाव्यतिरिक्त जॉनीच्या आयुष्याला बरीच मोठी वादाची किनार आहे. परंतु प्रत्येक वेळी तो जॅक स्पॅरोसारखा संकटावर मात करत आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.