आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

17 वा स्मृतीदिन:सेक्रेटरी-मॅनेजर ठेवणारे पहिले अभिनेता होते जॉनी वॉकर, या कारणामुळे ‘आनंद’मध्ये रुमालाने झाकला होता चेहरा, वाचा या खास गोष्टी

3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • गुरुदत्त यांनी त्यांचे नाव जॉनी वॉकर ठेवले. हेच नाव बरेच यशस्वी ठरले.

अभिनेते जॉनी वॉकर यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. पडद्यावर ते दिसताच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलायचे. जॉनी वॉकर यांना पाहून ते एक नंबरचे दारुडे असतील, असे सगळ्यांना वाटायचे. पण खऱ्या आयुष्यात जॉनी वॉकर यांनी कधीच दारूला हात लावला नाही. त्यांनी 300 चित्रपटांत काम केले मात्र कोणत्याच सीनवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली नाही. आज जॉनी वॉकर यांच्या 17 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याविषयीचे किस्से जाणून घे...

11 नोव्हेंबर 1926 रोजी मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये जन्मलेल्या जॉनी वॉकर यांचे बालपणीचे नाव बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी होते. बालपणीच ते 10 भाऊ-बहिणींसोबत मुंबईला आले होते. मुंबईला आल्यावर त्यांनी बेस्ट बसमध्ये कंडक्टरची नाेकरी केली. लहानपणापासूनच लोकांची नकल करत सर्वांना हसवण्यात तरबेज होते. बसमध्येदेखील ते प्रवाशांना हसवत असत. असेच एकदा अभिनेते बलराज साहनी यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांची विनोदीशैली बलराज यांना आवडली. त्यांनी लगेच काझींची गुरुदत्त यांच्याशी भेट घालून दिली आणि अशा प्रकारे काझी सिनेजगतात आले. त्यांची दारुड्याची भूमिका पाहून गुरुदत्त यांनी त्यांचे नाव जॉनी वॉकर ठेवले. हेच नाव बरेच यशस्वी ठरले.

 • ‘बाजी’च्या आधी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत होते जॉनी वाॅकर

गुरुदत्त यांच्या 'बाजी’ चित्रपटात काम करण्याआधी जॉनी वाॅकर चित्रपटात ज्युनियर कलाकाराच्या रूपात काम करत हाेते. तेव्हा त्यांना गर्दीत उभे राहण्यासाठी पाच रुपये मिळत होते, मात्र एक्स्ट्रा सप्लायर त्यातून आपले एक रुपयाचे कमिशन कापून त्यांच्या हातात 4 रुपये देत होते. या काळात त्यांनी आखिरी पैगाम (1949) मध्ये बद्रुद्दीन नावाचे पात्र साकारले होते.

 • गुलजार यांच्या सांगण्यावरून केला ‘चाची 420’

जॉनी वाॅकर यांना हातोहात काम मिळाले होते, तसेच एकेकाळी त्यांनी चित्रपटातून संन्यास घेतला होता. एका मुलाखतीत जॉनी म्हणाले होते, माझ्यासाठी लोकांनी भूमिका लिहिणे बंद केले होते त्यामुळे मी चित्रपटापासून दूर झालो.चित्रपटातून थोडी उसंत घेऊन मुलांचे पालनपोषण करण्याचे मी आधीपासून ठरवले होते. गुलजार यांच्या सांगण्यावरून 14-15 वर्षानंतर 'चाची 420' स्वीकारला.

 • ‘आनंद’मध्ये रुमालाने झाकला चेहरा

जॉनी यांची ओळख एक प्रसिद्ध विनोदवीर म्हणून झाली होती. त्यामुळे त्यांनी 'आनंद’मध्ये इसाभाई सुरतवालाची भूमिका साकारताना चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांना सांगून एका दृश्यात बदल करून घेतला होता. खरं तर, चित्रपटाच्या शेवटी राजेश खन्ना यांनी साकारलेल्या पात्राचा मृत्यू होतो. तेव्हा जॉनी भेटायला जातात आणि रडत बाहेर येतात. त्यानंतर अमिताभ बच्चन जातात. हे दृश्य बदलण्याचे त्यांनी ऋषिदांना सांगितले होते. ते म्हणाले होते, मी जेव्हा रडत बाहेर येईन तेव्हा चेहऱ्यावर रुमाल ठेवून येईन. कारण मी एक कॉमेडियन आहे आणि हे दृश्य खूपच भावुक आहे. लोकांना वाटेल की मी अभिनयच करत आहे आणि मला रडताना पाहून ते हसतील.

 • लाेकांना हसवण्यातच सुख मिळते

पुढे जाॅनी यांनी 'आर-पार’, 'प्यासा’, 'कागज के फूल’, 'आदमी’, 'नया दौर’, 'मेरे महबूब’, 'हंगामा’, 'मेरा दोस्त मेरा दुश्मन’, 'शान’ आणि 'चाची 420’ सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसवले. जॉनीसाहेबांना विनोदी भूमिका प्रचंड आवडायच्या. लोकांना हसविण्यात ते आनंद मानत. 1955 मध्ये जॉनीसाहेबांनी अभिनेत्री शकिला बानोची बहीण नूर बानो यांच्यासोबत लग्न केले होते. त्यांना 3 मुले आणि 3 मुली आहेत. नासिर खान अभिनयात आहे, इतर सर्व अमेरिकेत सेटल झाले आहेत. 29 जुलै 2003 रोजी जॉनी यांचे मुंबईत निधन झाले.

काही न ऐकलेल्या गोष्टी

 • जॉनीसाहेबांची इंडस्ट्रीत इतकी प्रतिष्ठा होती की, प्रत्येक चित्रपटात त्यांच्यावर एक गाणे असावे अशी वितरकांची इच्छा असायची.
 • पहिले अभिनेते ज्यांनी सेक्रेटरी आणि मॅनेजर ठेवणे सुरू केले.
 • एकमेव अभिनेते ज्यांच्या नावावर 1957 मध्ये 'जॉनी वॉकर’ चित्रपट बनला.
 • जॉनीसाहेबांची जास्तीत जास्त गाणी मोहंमद रफीसाहेबांनी गायली होती.
 • 1985 मध्ये जॉनीसाहेबांनी 'पहुंचे हुए लोग’चे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती.
 • जॉनी यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटात दारुड्याचे पात्र साकारले. पण खऱ्या आयुष्यात त्यांनी कधीच मद्य घेतले नाही.
 • जॉनी रोज आपल्यासोबत सेटवरील 50 ते 60 लोकांसाठी जेवण बनवून घेऊन जात हाेते. काही लोक त्यांच्या घरीही जाऊन जेवण करत असत
 • दिलीप कुमार, लेखक अब्रार अल्वी आणि मेहमूदसह काही लोक जॉनी वॉकर यांच्या शेवटपर्यंत सोबत हाेते.

यश

 • 1959 मध्ये चित्रपट ‘मधुमती’ साठी उत्कृष्ट सहकलाकाराचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले.
 • 1969 मध्ये शिकार चित्रपटासाठी उत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचे फिल्मफेअर अवाॅर्ड मिळाले.