आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'बाहुबली' फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी 'RRR' या चित्रपटातील अभिनेता आणि दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर सध्या त्याच्या लॅम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल या लग्झरी कारमुळे चर्चेत आला आहे. ही शानदार कार खरेदी करणारा ज्युनिअर एनटीआर हा पहिला भारतीय ठरला आहे. आता या कारच्या स्पेशल नंबर प्लेटमुळे देखील त्याच्या नावाची चर्चा होतेय.
9999 नंबरसाठी मोजले लाखो रुपये
ज्युनियर एनटीआरने त्याच्या लॅम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल या लग्झरी कारसाठी स्पेशल नंबर प्लेट घेतली आहे. आणि त्यासाठी त्याने तब्बल 17 लाख रुपये मोजले आहेत. एनटीआरने कारसाठी 9999 हा खास नंबर निवडला आहे. त्याच्या या लग्झरी कारचा नंबर TS 09 FS 9999 असा आहे. अलीकडेच हैदराबादच्या रस्त्यांवर तो या लक्झरी कारने सैर करताना दिसला होता.
खेरताबाद आरटीओ ऑफिसमध्ये आयोजित एका समारंभात ज्युनिअर एनटीआरने या फॅन्सी नंबरसाठी बोली लावली. यानंतर आरटीओकडून एनटीआरला हा नंबर देण्यात आला आहे. एनटीआरकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. यातील बीएमडब्ल्यू 720 एलडी या गाडीचा नंबरदेखील 9999 असाच आहे. ज्युनिअर एनटीआरने खरेदी केलेल्या लॅम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूलची भारतातील एक्स शोरुम किंमत 3.16 कोटी असून त्याने या कारसाठी जवळपास पाच कोटी रुपये मोजल्याच्या चर्चा आहेत.
RRR च्या रिलीजच्या प्रतिक्षेत आहे ज्युनिअर एनटीआर
ज्युनिअर एनटीआर त्याच्या आगामी 'आरआरआर' या चित्रपटात्या रिलीजच्या प्रतिक्षेत आहेत. यामध्ये तो स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीमची भूमिका साकारत आहे. कोमाराम भीम हे गोंड नेते होते. ज्युनिअर एनटीआर व्यतिरिक्त राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट सारखे सुपरस्टार या चित्रपटात काम करत आहेत. हा चित्रपट आधी ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार होता, पण आता त्याचे प्रदर्शन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. नवीन रिलीज डेट लवकरच जाहीर केली जाईल.
या चित्रपटाव्यतिरिक्त ज्युनिअर एनटीआर दिग्दर्शक कोरताला शिवाच्या एका चित्रपटातही काम करत आहे. 'आरआरआर' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतरच या चित्रपटाच्या कामाला वेग येईल, असे म्हटले जात आहे. याशिवाय तो 'केजीएफ' फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.