आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी स्पेशल:एकेकाळी मशिदीत भीक मागून जीवन जगत होते कादर खान, गरीबीमुळे आठवड्यातून तीन दिवस उपाशीपोटी झोपावे लागायचे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1973 मध्ये यश चोप्रांच्या 'दाग' या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले.

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते कादर खान यांचा आज 83 वी जयंती आहे. कादर खान यांनी 1973 मध्ये 'दाग' चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. 300 हून अधिक चित्रपटांत काम केलेल्या कादर खान यांनी 250 हून अधिक चित्रपटांत संवाद लेखन केले. त्यांना 9 वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळाले. भारत सरकारने 2019 मध्ये कादर खान यांचा मृत्यूपश्चात पद्मश्री देऊन सन्मान केला. अशा या महान अभिनेत्याने डिसेंबर 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांचे बालपण अतिशय गरीबीत गेले होते.

भीक मागून केला उदरनिर्वाह
कादर खान यांच्या आईवडिलांना त्यांच्यापूर्वी तीन मुले झाली होती, मात्र सर्वांचे वयाच्या आठव्या वर्षापर्यंत निधन होत होते. कादर यांच्या जन्मानंतर त्यांच्या आईला भीती वाटली की त्यांच्यासोबतही असे काही झाले तर? तेव्हा त्यांच्या आईने अफगानिस्तानहून भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि ते मुंबईतील धारावीत आले.

कादर एक वर्षांचे असताना त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. यानंतर ते डोंगरी येथे एक मशिदीजवळ भीक मागत होते. दिवसभरात मिळणाऱ्या दोन रुपयांवर त्यांचे घर चालत होते. अशा वयात ते पहिल्यांदा कामावर जाणार होते, तेव्हा आईने त्यांना थांबवून सांगितले की, असे तीन-चार पैसे कमावल्याने काही होणार नाही. आता तू फक्त अभ्यास कर इतर त्रास मी सहन करते.

कादर खान यांना लहानपणापासूनच लोकांच्या नकला करण्याची सवय होती. जेव्हा आई त्यांना नमाजासाठी पाठवत असे तेव्हा ते स्मशानभूमीत जाऊन दोन कबरींच्या मध्ये बसून स्वतःसोबत संवाद साधत चित्रपटातील डायलॉग्स बोलत असे. तेथे एक व्यक्ती भिंतीच्या आड उभा राहून त्यांच्याकडे पाहत असायचा. ती व्यक्ती होती अशरफ खान. अशरफ खान त्यावेळी नाटकात काम करत होते आणि त्यांच्या एका नाटकासाठी 8 वर्षीय मुलाची आवश्यकता होती. अशरफ यांनी कादर खान यांना नाटकात काम दिले होते.

दिलीप कुमार यांनी दिली होती संधी
कादर खान अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी मुंबईतील इस्माइल युसुफ कॉलेजमधून ग्रॅज्युएश केले होते. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. मुंबईतील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते लेक्चरर होते. एकेदिवशी कादर खान कॉलेजमध्ये शिकवत असताना दिलीप कुमार यांचा त्यांना फोन आला. त्यांनी कादर यांचे नाटक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. कादर यांनी दिलीप कुमार यांच्यासमोर दोन अटी ठेवल्या. एक म्हणजे नाटक सुरु होण्याच्या वीस मिनिटे आधी यावे आणि दुसरी म्हणजे हे संपूर्ण नाटक पाहावे लागेल. हेच नाटक पाहून दिलीप कुमार यांनी कादर खान यांना दोन चित्रपटांत काम करण्याची संधी दिली.

1973 पासून चित्रपटांमध्ये सुरुवात केली

1973 मध्ये यश चोप्रांच्या 'दाग' या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. 1970 आणि 80 च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांसाठी कथा लिहिल्या. या व्यतिरिक्त त्यांनी 'अदालत' (1976), 'परवरिश' (1977), 'दो और दो पांच' (1980), 'याराना' (1981), 'खून का कर्ज' (1991), 'दिल ही तो है' (1992), 'कुली नं. 1' (1995), 'तेरा जादू चला गया' (2000), 'किल दिल' (2014) यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 2015 मध्ये आलेल्या 'हो गया दिमाग का दही' या चित्रपटात ते अखेरचे मोठ्या पडद्यावर झळकले होते.

अमिताभसोबत 21 चित्रपटांत केले काम

अमिताभ आणि कादर यांनी 'दो और दो पांच', 'अदालत', 'मुकद्दर का सिकंदर', 'श्री नटवरलाल', 'सुहाग', 'कुली', 'कालिया', 'शहेनशाह' आणि 'हम' यांसह 21 चित्रपटांमध्ये काम केले. यापैकी काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला तर काहींसाठी संवाद-पटकथा लेखक म्हणून काम केले. कादर खान यांचे 31 डिसेंबर 2018 रोजी कॅनडामध्ये निधन झाले. त्यांना प्रोग्रेसिव सुप्रा न्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डर होता.