आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसरी पुण्यतिथी:कादर खान यांचे एक स्वप्न राहिले अपूर्ण, अमिताभ बच्चन यांना दिला होता राजकारणात न जाण्याचा सल्ला

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ आणि कादर खान यांच्या मैत्रीत आला होता दुरावा

अतिशय प्रतिभावंत अभिनेते आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी छाप सोडणारे अभिनेते कादर खान यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. वयाच्या 81 व्या वर्षी 31 डिसेंबर 2018 रोजी कॅनडात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. 22 ऑक्टोबर 1937 रोजी अफगाणिस्तानमध्ये काबुल येथे जन्मलेले कादर खान यांनी 1973 मध्ये राजेश खन्ना यांच्या 'दाग' चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. तत्पूर्वी त्यांनी रणधीर कपूर, जया बच्चन अभिनित 'जवानी दिवानी' या चित्रपटासाठी संवाद लिहिले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 250 पेक्षा जास्त चित्रपटांचे संवाद लेखन केले. सुरुवातीच्या काळात खलनायक म्हणून पडद्यावर अवतरलेले कादर खान नंतर लोकांना पोटभर हसवत राहिले. अमिताभ, गोविंदा यांच्यासोबत त्यांनी केलेले चित्रपट सुपरहिट ठरले.

अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांनी 'दो और दो पांच', 'मुकद्दर का सिकंदर', 'मिस्टर नटवरलाल', 'सुहाग', 'कुली', 'शहंशाह' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. पण अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपट एकत्र करुनदेखील त्यांची एक इच्छा अपूर्ण राहिली.

कादर खान यांचे हे स्वप्न पूर्ण झालेच नाही
अमिताभ बच्चनसोबत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका करणा-या कादर खान यांनी त्यांच्या 'अमर अकबर एंथनी', 'सत्ते पे सत्ता', 'मिस्टर नटवरलाल' आणि 'शराबी' या चित्रपटांचे डायलॉगही लिहिले होते. पण कादर खान यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक चित्रपट बनवायचा होता, पण त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही. एका मुलाखतीत कादर खान म्हणाले होते, "अमिताभ बच्चन, जया प्रदा आणि अमरीश पुरी यांना घेऊन मला 'जाहिल' हा चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मला करायचे होते, पण खुदाला कदाचित दुसरेच काही मान्य होते." कादर खान यांनी सांगितल्यानुसार, याचकाळात 'कुली' चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते, ते अनेक महिने रुग्णालयात होते. बरे झाल्यानंतर ते इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी झाले आणि राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे कादर खान यांचे अमिताभ बच्चनसोबत चित्रपट करण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

जेव्हा अमिताभ आणि कादर खान यांच्या मैत्रीत आला होता दुरावा

एकेकाळी कादर खान आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री अतिशय घट्ट होती. पण राजकारणावरून दोघांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता. एका मुलाखतीत कादर खान म्हणाले होते, ''जेव्हापासून ते (अमिताभ बच्चन) खासदार बनले तेव्हापासून मी आनंदी नाहीये. राजकारण असे क्षेत्र आहे, जे व्यक्तीला पुर्णतः बदलून टाकते. जेव्हा ते राजकारणातून परतले तेव्हा ते पुर्वीचे अमिताभ नव्हते.' कादर खान यांनी अमिताभ बच्चन यांना राजकारणात न जाण्याचा सल्ला दिला होता, पण बिग बींनी त्यांचे म्हणणे ऐकले नव्हते.

अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले होते बालपण
कादर खान यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे म्हणजे, त्यांचे बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले. एकदा त्यांच्या आईने त्यांना म्हटले होते की, जर गरीबी दूर करायची असेल तर तुला चांगले शिकावे लागले. आईचे बोलणे त्यांनी मनावर घेतले आणि अभ्यासाकडे लक्ष दिले. शिकत असतानाच त्यांना लिखाणाची आवड लागली. त्यांनी इस्माइल यूसुफ कॉलेजमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिवाय ते एमएच सैबू सिद्दिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर होते.

एका घटनेनंतर बदलले भूमिकांचे स्वरुप
करिअरच्या सुरुवातीच्या काळात कादर खान चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका वठवत होते. त्यांची गणना बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकांमध्ये होऊ लागली होती. पण एका घटनेनंतर त्यांनी खलनायकाची भूमिका सोडून विनोदी भूमिका चित्रपटांमध्ये साकारणे सुरु केले होते. झाले असे की, एकेदिवशी त्यांचा मुलगा शाळेत भांडण करुन घरी परतला होता. जेव्हा त्यांनी मुलाला शाळेत भांडण का केले, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांच्या मुलाने त्यांना सांगितले की, शाळेत सगळेजण त्याला त्याचे वडील वाईट आणि व्हिलन असल्याचे सांगून चिडवतात. मुलाचे हे बोलणे ऐकून कादर खान यांना धक्का बसला आणि त्यांनी त्याच वेळी चित्रपटांमध्ये फक्त चांगल्या भूमिका वठवण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटांमध्ये केले कादर खान यांनी काम
कादर खान यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1972 मध्ये आलेल्या 'दाग' या चित्रपटाद्वारे केली होती. त्यानंतर त्यांनी 'अदालत' (1976), 'परवरिश' (1977), 'दो और दो पांच' (1980), 'याराना' (1981), 'खून का कर्ज' (1991), 'दिल ही तो है' (1992), 'कुली नं. 1' (1995), 'तेरा जादू चल गया' (2000), 'किल दिल' (2014) सह अनेक गाजलेल्या चित्रपटांत अभिनय केला. ते अखेरचे 2015 मध्ये आलेल्या 'हो गया दिमाग का दही' या चित्रपटात झळकले होते.

बातम्या आणखी आहेत...