आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंगा क्वीनची 20 महिन्यांनी ट्विटरवर वापसी:ट्वीट शेअर करत व्यक्त केला आनंद, 'या' कारणामुळे सस्पेंड झाले होते अकाऊंट

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची पंगा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनोट ट्विटरवर पुन्हा परतली आहे. कंगना रनोट हिने ट्वीट करत ट्विटरवर परतल्याचे सांगितले आहे. ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्याने कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. आता तब्बल 20 महिन्यानंतर ती पुन्हा ट्वीटरवर परत आली आहे.

ट्विटरवर परतल्यानंतर तिने पहिले ट्वीट केले. 'Hello everyone, it’s nice to be back here' असे ट्वीट करत कंगनाने आपला आनंद व्यक्त केला. कंगनाच्या या ट्वीटवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. अनेकांनी कंगनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विटरवर परतल्यानंतर आतापर्यंत कंगनाने तीन पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये तिने ट्विटरवर परतल्याचा आनंद व्यक्त केला. त्यानंतर तिने तिच्या आगामी 'इमरजन्सी' या चित्रपटाचा बिहाइंड द सीन व्हिडिओ शेअर केला. आज (25 जानेवारी) हिमाचल दिन असून या खास दिवसाच्या तिने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

का सस्पेंड झाले होते कंगनाचे अकाऊंट?
ट्वीटरच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 2021 मध्ये कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. गेल्यावर्षी पश्चिम बंगाल निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कंगना रनोटने ममता बॅनर्जी यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत एक वादग्रस्त ट्वीट केले होते. त्या ट्वीटनंतर तिचे अकाऊंट कायमस्वरूपी सस्पेंड करण्यात आले होते. इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून कंगना ट्विटरवर पुन्हा येऊ शकते अशा चर्चांना वेग आला होता. आता कंगनाचे ट्वीटर खाते पुन्हा एकदा सुरु झाले आहे. कंगनाच्या ट्विटर अकाऊंटला जवळपास 30 लाख फॉलोअर्स आहेत.

कंगनाचे आगामी प्रोजेक्ट्स
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा तिने सांभाळली असून ती स्वतः चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारताना दिसणार आहे. 1975 मधील भारताच्या आणीबाणीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. 20 ऑक्टोबर 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय प्रसिद्ध बंगाली थिएटर अभिनेत्री बिनोदिनी दासी हिचाही बायोपिक पाइपलाइनमध्ये आहे. याशिवाय 'सीता' आणि 'टिकू वेड्स शेरु' हे तिचे आगामी चित्रपट आहेत.

बातम्या आणखी आहेत...