आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री कंगना रनोट आणि तिची थोरली बहीण व मॅनेजर रंगोली चंदेल जबाब नोंदवण्यासाठी मुंबईतील वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये हजर झाल्या होत्या. यावेळी दोन तास त्यांची चौकशी झाली. या दोघींविरोधात कोर्टाच्या आदेशानुसार 17 ऑक्टोबर रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंगनाला चौकशीसाठी तीनदा समन्स बजावण्यात आले होते, पण भावाच्या लग्नाचे कारण देत ती चौकशीसाठी अनुपस्थित राहिली होती. दोघींविरोधात सबळ पुरावे मिळाल्यास त्यांना अटकही केली जाऊ शकते.
कंगनावर हिंदू-मुस्लिम या दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. तिच्याविरोधात अशाच एका प्रकरणात तुमकुर (कर्नाटक) येथेही एफआयआर दाखल करण्यात आला होता. याशिवाय कंगनावर शेतक-यांचा अपमान केल्याचाही आरोप आहे. यापूर्वी 25 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रनोट आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना 8 जानेवारी रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते.
'आपण मध्ययुगीन काळात जगत आहोत'
कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती म्हणाली, 'जेव्हापासून मी देशहितासाठी बोलतेय तेव्हापासून माझ्यावर अत्याचार होत आहेत. शोषण केले जात आहे. हे सर्व संपूर्ण देश बघत आहे. माझे घर बेकायदेशीरपणे तोडले गेले. शेतक-यांच्या हितासाठी बोलल्याने दररोज किती तरी खटले दाखल होत आहेत. इतकेच नाही तर हसण्यासाठीही खटला दाखल झाला आहे.
कंगना पुढे म्हणाली, 'कोरोनादरम्यान डॉक्टरांच्या हितासाठी बोलल्याप्रकरणी माझी बहीण रंगोली हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात माझे ही नाव ओढले गेले. त्यावेळी मी ट्विटरवरही नव्हते. ते प्रकरण सरन्यायाधीशांनी फेटाळून लावले. सरन्यायाधीश म्हणाले की या प्रकरणात काही अर्थ नाही.'
'मला सांगण्यात आले की तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावावी लागेल. कशासाठी हजेरी लावायची ते सांगायला मात्र कोणी तयार नाही. मी सुप्रीम कोर्टाला हे विचारु इच्छिते की, हा मध्ययुगीन काळ आहे का? जिथे महिला जिवंत जाळल्या जातात. मी काहीही सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. अशाप्रकारचे अत्याचार जगासमोर होत आहेत. ज्याप्रमाणे गुलामगिरीत रक्ताचे अश्रू सहन केले, त्याचप्रमाणे राष्ट्रहिताच्या गोष्टी दडपली गेल्या तर ते पुन्हा एकदा सहन करावे लागेल.'
Why am I being mentally, emotionally and now physically tortured? I need answers from this nation.... I stood for you it’s time you stand for me ...Jai Hind 🙏 pic.twitter.com/qqpojZWfCx
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 8, 2021
कंगनावर याचिकाकर्त्याचे हे होते आरोप
कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर साहिल अशरफ अली सैय्यद यांनी प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कंगना रनोेटने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडवर टीका करताना या ठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.
कंगना वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडमधील घराणेशाहीबद्दल बोलत असते, असा आरोप याचिकाकर्त्याने याचिकेत केला होता. यानंतर वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
कंगनाने बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारात एक विशिष्ट अंतर निर्माण केले आहे. ती नेहमी काही ना काही आक्षेपार्ह ट्विट करते. ज्यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर चित्रपटसृष्टीतील बरेच लोक यातून दुखावले जातात, असा आरोपही तिच्यावर याचिकेतून केला होता.
कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.