आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ:जावेद अख्तर यांच्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीला कंगना पुन्हा गैरहजर, कोर्टाने म्हटले पुढच्या वेळी अटक वॉरंट जारी केले जाईल

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 सप्टेंबरला होणार पुढील सुनावणी

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनोट हिच्याविरोधात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. 14 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होती. या सुनावणीला जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी शबाना आझमी न्यायालयात उपस्थित होते. परंतु कंगना या सुनावणीला पुन्हा एकदा गैरहजर राहिली आहे. कंगनाच्या या वर्तणुकीवर न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने कठोर शब्दांत कंगनाला समज देत सांगितले आहे की, पुढील सुनावणीवेळी जर ती न्यायालयात हजर राहिली नाही तर तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल.

20 सप्टेंबरला होणार पुढील सुनावणी
न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी उपस्थित होते. कंगना न्यायालयात न आल्याबद्दल न्यायमूर्तींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ही सुनावणी आता 20 सप्टेंबरला होईल. कंगनाचे वकील रिजवान यांनी तिचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला. यामध्ये असे नमूद केले होते की, कंगनाला कोविड 19 ची लक्षणे दिसत आहे. गेल्या 15 दिवसांपासून ती आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सातत्याने प्रवास करत आहे. यावेळी ती अनेक लोकांच्या संपर्कात आली आहे. त्यामुळे तिच्या वकीलांनी न्यायालयाकडून सात दिवसांचा अवधी मागितला आहे. तोपर्यंत कंगनाची प्रकृती ही सुधारेल आणि ती याच काळात तिची कोविड टेस्टही करून घेईल.

कंगना न्यायालयाच्या कार्यपद्धतीचा आदर करत नाही
जावेद अख्तर यांचे वकील जयकुमार भारद्वाज म्हणाले, कंगनाला अनेक नोटिसा देऊनही ती येत नाही आणि सुनावणीला हजर राहणे टाळता यावे म्हणून ही सर्व कारणे दिली जात आहे. ती न्यायालयाच्या कार्यपद्धतीचा आदर करत नाही. जावेद अख्तर प्रत्येक सुनावणीला स्वतः उपस्थित राहतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

काय आहे प्रकरण?
मागील वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कंगनाने अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या. एका मुलाखतीमध्ये कंगनाने जावेद अख्तर हे हिंदी सिनेसृष्टीमध्ये गटबाजी करतात असा आरोप केला होता. तसेच याच मुलाखतीमध्ये तिने अख्तर यांच्याविरोधात आणखी ही काही आरोप केले होते. कंगनाने केलेल्या या आरोपांनंतर जावेद अख्तर कमालीचे नाराज झाले आणि त्यांनी तिच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

2 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती
जावेद अख्तर यांनी त्यांचे वकील निरंजन मुंदर्गी यांच्यामार्फत 2 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. यात त्यांनी कंगना रनोटविरूद्ध बदनामी केल्याचा आरोप केला होता .अख्तर यांनी म्हटले होते की टीव्ही मुलाखती दरम्यान कंगनाने त्यांच्यावर खोटा आरोप केला होता की त्यांनी (अख्तरने) हृतिक रोशनविरूद्ध दाखल केलेला खटला मागे घेण्याची धमकी कंगनाला दिली होती.

अख्तर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, कंगनाने मुलाखतीत त्यांना सुसाइड गँगचा भाग असल्याचे सांगितले होते. अख्तर यांनी तिला धमकी दिली होती की तिने हृतिकवरील खटला मागे घेतला नाही तर तिला आत्महत्या करण्याशिवाय मार्ग राहणार नाही असा आरोपही कंगनाने केला होता. अख्तर यांचा असा दावा आहे की कंगनाच्या या टिप्पणीमुळे त्यांना अनेक धमकीचे फोन कॉल आणि मेसेजेस आले. त्यांना सोशल मीडियावरही ट्रोल केले गेले होते. त्यांच्या मते या टिप्पणीमुळे त्यांची प्रतिष्ठा खराब झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...