आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्मफेअरविरोधात कोर्टात जाणार कंगना:म्हणाली - नाही म्हटल्यानंतरही अवॉर्डसाठी नॉमिनेट केले, वारंवार कॉल करत आहेत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायम चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिने फिल्मफेअर विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. सतत नकार देऊनही कंगनाला पुरस्कारासाठी नामांकित केल्यामुळे तिने या मासिकाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे. फिल्मफेअर या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागामध्ये कंगनाला नामांकन देण्यात आले आहे. 'थलायवी' या चित्रपटासाठी तिला हे नामांकन मिळाले आहे. मात्र, कंगनाने आता या मॅगझिनवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.

'थलायवी'साठी मिळाले नामांकन
67व्या फिल्मफेअर पुरस्कार 2022साठीची नामांकन यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये रणवीर सिंहला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीमध्ये '83' चित्रपटासाठी नामांकन मिळाले आहे, तर कंगनाला 'थलायवी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत नामांकन मिळाले आहे. कंगनाला फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी, क्रिती सेनन, परिणीती चोप्रा, तापसी पन्नू आणि विद्या बालन यांच्यासह सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. मात्र, कंगनाला हे नॉमिनेशन आवडलेले नाही.

कंगनाने व्यक्त केली नाराजी
कंगनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने मासिकाविरोधात खटला दाखल करण्याचे कारणही दिले आहे. कंगनाने केलेल्या दाव्यानुसार, अनेकदा नाही म्हटल्यानंतरही फिल्मफेअर या चित्रपट मासिकाने त्यांच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कंगनाला आमंत्रित केले आहे. यामुळे कंगना खूपच नाराज आहे.

‘फिल्मफेअर’वर कंगनाने घातला बहिष्कार
इंस्टा स्टोरीमध्ये कंगनाने लिहिले की, तिने 2014पासून फिल्मफेअरवर बहिष्कार घातला आहे. हे मासिक अनैतिक, भ्रष्ट आणि पूर्णपणे अन्यायकारक आहे. तसे मी याचा भाग होणार नाही, असे कंगना म्हणाली आहे. इतकेच नाही तर मला यावर्षी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक कॉल येत आहेत, कारण त्यांना 'थलायवी'साठी मला फिल्मफेअर पुरस्कार द्यायचा आहे, असेही तिने सांगितले आहे.

‘फिल्मफेअर’ने नामांकन घेतले मागे
कंगनाच्या या आरोपांनंतर ‘फिल्मफेअर’ने तिचे नामांकन मागे घेतले आहे.फिल्मफेअरने याबाबत स्पष्टीकरण देखील दिले आहे. कंगना रनोटने केलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचेही मासिकाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

'इमरजन्सी' आहे कंगनाचा आगामी चित्रपट
सध्या कंगना तिच्या आगामी 'इमरजन्सी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत, कारण मणिकर्णिका नंतर पुन्हा एकदा कंगना दुसऱ्यांदा दिग्दर्शन करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 25 जूनला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...