आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्यांवर संतापली कंगना रनोट:म्हणाली - माझ्या बहिणीवर अ‍ॅसिड हल्ला झाला होता, आमचे कुटुंब उद्धवस्त झाले होते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिने अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अ‍ॅसिड फेकणाऱ्या लोकांविरोधात आपला राग व्यक्त केला आहे. मंगळवारी (13 डिसेंबर) दिल्लीच्या द्वारका परिसरात एका 17 वर्षीय मुलीवर अ‍ॅसिड फेकण्यात आले होते. या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावर आता कंगना रनोटने सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाची थोरली बहीण रंगोली हिच्यावरदेखील एका व्यक्तीने अ‍ॅसिड हल्ला केला होता. कंगनाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यावेळी तिच्या बहिणीवर 52 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या, असा खुलासा केला आहे.

माझ्या बहिणीवर 52 शस्त्रक्रिया झाल्या
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कंगनाने म्हटले, "मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी बहीण रंगोली चंदेलवर रस्त्यावरील एका रोड साइड रोमियोने अ‍ॅसिड हल्ला केला होता. त्यावेळी तिच्यावर 52 सर्जरी झाल्या, मानसिक तसेच शारीरिक त्रासाचा तिला सामना करावा लागला. आमचे कुटुंब उद्धवस्त झाले होते. या प्रसंगानंतर कोणीही दुचाकी किंवा चालत माझ्या बाजूने जात असेल तर मी माझा चेहरा झाकून घ्यायचे. अज्ञात व्यक्ती माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करणार असे मला वाटायचे. यामुळे मला स्वतःला एका थेरपीचा आधार घ्यावा लागला," असा खुलासा कंगनाने केला.

याविरोधात कठोर पाऊल उचलणे गरजेचे
पुढे कंगना म्हणाली, "अशा गुन्हेगारांना अजूनही थांबवण्यात आले नाही. सरकारला याविरोधात कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे. अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे या गौतम गंभीरच्या मताशी मी सहमत आहे," असे कंगना म्हणाली. मुलींवर अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तींना फाशीची शिक्षा द्यावी असं विधान भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी केले होते. आता त्याला कंगनाही पाठिंबा देत आहे.

अ‍ॅसिड हल्ल्यात रंगोली थर्ड डिग्री बर्न झाली होती

कंगना रनोटची बहीण रंगोली चंदेल 21 वर्षांची असताना तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. यात ती थर्ड डिग्री भाजली होती. एका मुलाखतीत कंगनाने खुलासा केला होता की, त्यावेळी रंगोलीचा अर्धा चेहरा जळाला होता, तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली होती, एक कान वितळला होता आणि तिच्या स्तनांनाही गंभीर इजा झाली होती. आता रंगोली विवाहित आहे आणि तिला 5 वर्षांचा मुलगा आहे. ती बर्‍याचदा इव्हेंट्स आणि स्क्रिनिंगमध्ये कंगनाला सोबत दिसत असते.

कंगना 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार
कंगनाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती तिच्या आगामी 'इमरजन्सी' चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलवर काम करत आहे. या चित्रपटात अभिनयासोबतच कंगना स्वतः दिग्दर्शनही करत आहे. हा चित्रपट कंगनाचे प्रोडक्शन हाऊस 'मणिकर्णिका' अंतर्गत बनत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये रिलीज होणार आहे. यामध्ये कंगना इंदिरा गांधींची भूमिका साकारताना दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...