आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

तुटलेल्या ऑफिसची अवस्था पाहून कंगनाचा निर्धार:कंगना म्हणाली - उद्धवस्त झालेल्या ऑफिसमधूनच काम करणार; तोडफोडीत सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याची शक्यता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 9 सप्टेंबर रोजी बीएमसीने दोन तास कारवाई करून कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केलीय.
  • जानेवारीपासून कोणतेही काम केले नसल्याचे कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

9 सप्टेंबर रोजी बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेत्री कंगना रनोटच्या ऑफिसवर कारवाई करत तोडफोड केली. यात कंगनाच्या ऑफिसचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. हिमाचलहून मुंबईत आल्यानंतर कंगनाने गुरुवारी आपल्या उद्धवस्थ झालेल्या ऑफिसची पाहाणी केली. त्यानंतर तिने एक ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आणि सोबतच या उद्धवस्त झालेल्या ऑफिसमधूनच काम करणार असल्याचा निर्धार केला.

आता या ऑफिसची डागडुजी करण्यासाठी माझ्याजवळ पैसे नसल्याचे कंगनाने सांगितले आहे. तिने ट्विट केले, “माझे ऑफिस 15 जानेवारी रोजी सुरु होणार होते. मात्र त्याच काळात कोरोनाचे संकट आले, त्यामुळे आम्ही जे काही काम करायचं होते ते अर्ध्यावरच थांबवले होते. मात्र आता या कार्यालयाची डागडुजी करण्यासाठी किंवा ते उभारण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. मी याच उद्धवस्त झालेल्या, तोडलेल्या ऑफिसमधून काम करण्यास सुरुवात करेल. हे उद्धवस्त झालेले ऑफिस एक प्रतिक आहे, जी स्त्री या जगात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करते तिच्यासोबत असेच होते हे यातून सांगण्यात येतंय”, असे ट्विट कंगनाने केले आहे.

  • मुंबईत पोहोचल्यानंतर आईचा फोन उचलला नाही

कंगनाने आणखी एक ट्विट करुन मुंबईत दाखल झाल्यानंतर आईचा फोन उचलला नसल्याचे सांगितले. याचे कारण सांगताना तिने ट्विट केले, 'जेव्हा माझे ऑफिस तोडले जात होते, तेव्हा माझ्या आईचा चेतावनी देणारा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला, जणू काय ती म्हणत होती, 'मी सांगितले होते तुला.' तेव्हापासून मी तिचा फोन उचलला नाही", असे कंगना म्हणाली.

  • बुधवारी कंगना ऑफिसची पाहणी करायला आली होती

बुधवारी कंगना तिच्या तुटलेल्या ऑफिसमध्ये पोहोचली. ती तेथे 10 मिनिटे थांबली. यावेळी ती भावूक झालेली दिसली. तसाच संताप देखील तिच्या चेह-यावर दिसत होता. मात्र यावेळी कंगनाने कोरोनाच्या काळातील नियमांचे पालन केले नाही. तिने चेह-यावर मास्क लावला नव्हता आणि सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही ती पालन करताना दिसली नाही.

  • कंगनाचे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाले

9 सप्टेंबर रोजी बीएमसीने कंगनाच्या ऑफिसमध्ये सुमारे दोन तास तोडफोडीची कारवाई केली. या कारवाईत कंगनाचे सुमारे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. कंगनाने हे तीन मजली ऑफिस तयार करण्यासाठी सुमारे 48 कोटी रुपये खर्च केले होते.

शिवसेनेच्या सांगण्यावरून महापालिकेने कंगनाच्या ऑफिसची तोडफोड केल्याचा दावा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध कंगना असा वाद सुरु आहे. बीएमसीच्या कारवाईनंतर कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिले होते. “आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अहंकार मोडेल”, असे कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती.