आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाविरोधात देशद्रोहाचा खटला:कंगना रनोट आणि तिच्या बहिणीला मुंबई पोलिसांनी तिस-यांदा समन्स बजावले, भावाच्या लग्नाचे कारण देत दोन वेळा चौकशीसाठी गैरहजर

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना आणि रंगोली यांच्याविरोधात सबळ पुरावे मिळाल्यास दोघींना अटक होण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री कंगना रनोट आणि तिची थोरली बहीण रंगोली चंदेल यांना मुंबई पोलिसांनी बुधवारी तिस-यांदा समन्स बजावले आहे. दोघींना 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या दोघींविरोधात 17 ऑक्टोबर रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यापूर्वी कंगनाला 26 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र भावाच्या लग्नाचे कारण देत 15 नोव्हेंबर नंतरच चौकशीसाठी हजर होणार असल्याचे कंगनाच्या वतीने सांगण्यात आले होते. दोघी बहिणी सध्या हिमाचलमध्ये आहेत.

दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप
कंगनासह तिची बहीण रंगोली रनोट विरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंगनाने मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्विट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात कंगना विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

कंगनाविरोधात याचिकाकर्त्याचे हे आहेत आरोप

कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर साहिल अशरफ अली सैय्यद यांनी प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कंगना रनोेटने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडवर टीका करताना या ठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

कंगना वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडमधील घराणेशाहीबद्दल बोलत असते, असा आरोप याचिकाकर्त्याने याचिकेत केला होता. यानंतर वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

कंगनाने बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारात एक विशिष्ट अंतर निर्माण केले आहे. ती नेहमी काही ना काही आक्षेपार्ह ट्विट करते. ज्यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर चित्रपटसृष्टीतील बरेच लोक यातून दुखावले जातात, असा आरोपही तिच्यावर याचिकेतून केला होता.

कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.