आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:मुंबईच्या अंबोली पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता, आज नोंदवणार आपला जबाब

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • अपूर्व मेहता आपल्या जबाबात कोणत्या गोष्टींचा उलगडा करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर अपूर्व मेहता आज (28 जुलै) अंबोली पोलिस स्टेशनमध्ये आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले आहे. यापूर्वी सोमवारी पोलिसांनी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांची सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये दोन तास चौकशी केली होती.

आपला जबाब नोंदवण्यासाठी महेश भट्ट दुपारी बारा वाजता पोलिस ठाण्यात पोहोचले आणि दुपारी अडीचपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. सुशांत आणि रिया चक्रवर्ती (सुशांतची गर्लफ्रेंड) यांच्या नात्याबद्दल पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असे सांगण्यात येत आहे. मात्र, चौकशी संपल्यानंतर भट्ट मीडियाच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता तेथून निघून गेले होते.

 • महेश भट्ट यांच्या चौकशीची जागा बदलण्यात आली होती

महेश भट्ट यांना चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले. पण मीडियाची गर्दी पाहून भट्ट यांनी पोलिसांना सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये येण्याची विनंती केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले होते.

 • करण जोहरचीदेखील होणार चौकशी

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी या आठवड्यात चित्रपट निर्माता आणि धर्मा प्रॉडक्शनचा प्रमुख करण जोहरची चौकशी केली जाणार असल्याचे समजते. न्यूज एजन्सी एएनआयने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने हे सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी करण जोहरला सुशांतसोबतच्या त्याच्या ‘ड्राइव्ह’ चित्रपटाच्या कराराची कॉपीही मागितली आहे.

 • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाने केली सीबीआय चौकशीची मागणी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पार्थ यांनी सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी दिले.

 • मुंबई पोलिसांवर संतापली होती कंगना रनोट

मुंबई पोलिसांनी चित्रपट निर्माता करण जोहरचा मित्र आणि धर्मा प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता यांना चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. मात्र करण जोहरऐवजी अपूर्व मेहताला चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याने कंगना भडकली होती. सुशांतच्या हत्याकांडाची चेष्टा करणे बंद करा, असे तिने मुंबई पोलिसांना उद्देशून म्हटले होते.

 • पोलिस असा निर्लज्जपणा कसा दाखवू शकतात?

कंगनाच्या वतीने तिच्या टीमने एक ट्विट केले होते. त्यात लिहिले होते की, "समन्स जारी करतानाही मुंबई पोलीस इतका निर्लज्जपणा कसा दाखवू शकतात? कंगनाला समन्स पाठवण्यात आला आहे तिच्या मॅनेजरला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या सर्वात चांगल्या मित्राच्या मॅनेजरला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. का? साहेबांना त्रास होऊ नये म्हणून?", असे या ट्विटमध्ये म्हटले गेले.

 • कंगनाने महाराष्ट्र सरकारवर केला होता हल्लाबोल

याप्रकरणी आतापर्यंत करण जोहरची चौकशी न झाल्याने शनिवारी कंगना रनोटच्या टीमने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. करण जोहर हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचा मित्र आहे, त्यामुळे त्याला कधीही पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात येणार नाही असे ट्विट कंगनाच्या टीमने केले होते. एक टि्वटला उत्तर देताना कंगनाच्या टीमने हा दावा केला होता. ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कंगनाच्या टीमने लिहिले की, "ते कधीही त्याला बोलावणार नाहीत. कारण तो आदित्य उद्धव ठाकरे यांचा चांगला मित्र आहे. हे त्यांचे सरकार आहे आणि त्यांनी कंगनाच्या मुलाखतीपूर्वी हे प्रकरण बंद केले. ते आपल्या मित्राचा बचाव करत असल्याचा हा पुरावा आहे."

 • कंगनाने केले आहे करण जोहरला लक्ष्य

सुशांतच्या मृत्यूपासूनच कंगना करण जोहरला लक्ष्य करीत आहे. तिने करणवर घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला असून यालाच कंटाळून सुशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असे तिचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर करणने सुशांतला फ्लॉप स्टार सिद्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक ड्राइव्ह हा चित्रपट थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करुन त्याचे करिअर उद्धवस्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, असा दावाही कंगनाने केला आहे.

आतापर्यंत 38 जणांची झाली आहे चौकशी

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या केल्याचे पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच, पोलिसांच्या तपासणीत तो डिप्रेशनमध्ये असल्याचेही समोर आले आहे. सुशांत डिप्रेशनमध्ये का होता? आणि त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी 38 जणांची चौकशी केली. यात ब-याच मोठ्या नावांचा समावेश आहे -

 • 27 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांची दोन तास चौकशी केली. या चौकशीत त्यांनी रिया आणि सुशांतच्या नात्याविषयी भट्ट यांना प्रश्न विचारले. सोबतच त्यांच्या आगामी 'सडक 2' या चित्रपटाबद्दलही त्यांना विचारपुस करण्यात आली. या चित्रपटासाठी सुशांतला विचारणा झाली होती, मात्र नंतर आदित्य रॉय कपूरचे नाव अंतिम करण्यात आले होते.
 • याप्रकरणी मंगळवारी (28 जुलै) धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांचीही मुंबई पोलिस चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे.
 • सुशांतवर उपचार करणा-या चारही डॉक्टरांव्यतिरिक्त, चित्रपट समीक्षक राजीव मसंद, यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा, सुशांतचे घरातील कर्मचारी, मॅनेजर, पीआर टीम, एक्स मॅनेजर, मित्र, मैत्रिणी, सह-कलाकार आणि कुटुंबातील सदस्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याशिवाय यशराज फिल्म्सचे काही माजी अधिकारी आणि कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनीही आपला जबाब नोंदवला आहे. आणखी काही अधिका-यांची चौकशी केली जाईल.
 • 23 जुलै रोजी पोलिसांनी सुशांतचे मित्र आणि फिल्ममेकर रुमी जाफरी यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावले होते. जाफरी यांनी पोलिसांना सांगितल्यानुसार, सुशांत सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे त्यांना ठाऊक होते. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीकडुन त्यांना याविषयी समजले होते.
 • 21 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी चित्रपट समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार राजीव मसंद यांची आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. त्यांच्यावर कुणाच्या तरी सांगण्यावरुन सुशांतविरोधात निगेटिव्ह ब्लाइंड आर्टिकल लिहिल्याचा आणि त्याच्या चित्रपटांना निगेटिव्ह रिव्ह्यू देत असल्याचा आरोप आहे.
 • यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माता आदित्य चोप्रा यांची मुंबई पोलिसांनी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये चौकशी केली. वास्तविक सुशांतने आदित्य चोप्रासह 'शुद्ध देसी रोमान्स', 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' आणि 'पानी' या तीन सिनेमांसाठी करार केला होता. पण 'पानी' हा चित्रपट तयार होऊ शकला नाही. याबद्दल आदित्य यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यात त्यांनी सांगितले की, दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासोबतच्या क्रिएटिव्ह डिफरन्समुळे हा चित्रपट बनू शकला नाही.
 • याशिवाय फिल्ममेकर संजय लीला भन्साळींचीही चौकशी झाली आहे. 'पानी' या चित्रपटासाठी आपले चार चित्रपट सुशांतने सोडले होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, "मी सुशांतला ऑफर केलेले चार चित्रपट म्हणजे 'गोलियों की रासलीला रामलीला', 'बाजीराव-मस्तानी', 'रीड' (जो बनला नाही) आणि 'पद्मावत'. सुशांत 'रामलीला'च्या वेळी YRFसोबत करारात होता. आणि 'पानी'साठी कार्यशाळा घेत होता. त्याचप्रमाणे मी सुशांतला 'बाजीराव-मस्तानी', 'रीड' आणि 'पद्मावत' (शाहिद कपूरची भूमिका) साठी भेटलो होतो. पण त्याने आपल्या सर्व तारखा 'पानी' या चित्रपटासाठी दिल्या होत्या.
 • चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी ईमेलद्वारे आपला जबाब पोलिसांना पाठवला आहे. शेखर कपूर यांनी सांगितले की, पानी हा चित्रपट बंद झाल्याने सुशांतला मोठा धक्का बसला होता. तो खचून डिप्रेशनमध्ये गेला होता. कारण या चित्रपटासाठी त्याने आपली बरीच वर्षे दिली होती. याकाळात त्याने अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या. शेखर कपूर यांना चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्येही बोलावले जाऊ शकते.
 • अभिनेत्री कंगना रनोटचीही पोलिस चौकशी करणार आहे. सुशांतला बॉलिवूडच्या नेपोटिज्मचा मोठा फटका बसल्याचा आरोप कंगनाने उघडपणे केला आहे, तर शेखर कपूर यांनीहीकाहीसे असेच संकेत दिले होते. कंगनाने सांगितल्यानुसार, तिला पोलिसांकडून चौकशीसाठी समन मिळाले आहे. पण सध्या ती मनालीत असल्याने चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही.

दरम्यान, खासदार रुपा गांगुली, अभिनेता शेखर सुमन, टीव्ही अभिनेता तरुण खन्नासह अनेक जणांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.