आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधीर कपूर आणि बबिता पुन्हा नव्याने संसार करणार:घटस्फोट न घेता झाले होते विभक्त, ‘या’ कारणामुळे आला होता नात्यात दुरावा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर आणि त्यांच्या पत्नी बबिता गेल्या 35 वर्षांपासून वेगळे राहात होते. पण आता एवढ्या वर्षांनी दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्यातील दुरावा आता संपला आहे. रणधीर आणि बबिता घटस्फोट न घेता मागील 35 वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. पण आता मात्र दोघेही एकत्र आले आहेत.

दोघांच्या या निर्णयाने केवळ कुटुंबीय आणि नातेवाईकच खूश नाहीत तर त्यांचे चाहतेही खूश झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बबिता सर्व सामान घेऊन पतीच्या वांद्रे येथील नवीन घरात राहण्यासाठी पोहोचल्या आहेत.

बबिता आणि रणधीर कपूर सोबत राहणार असल्याने त्यांच्या दोन्ही मुली अर्थातच करिश्मा कपूर आणि करीना कपूर आनंदी आहेत. कारण आता उतारवयात दोघेही एकाच छताखाली राहू शकतील आणि एकमेकांची काळजी घेऊ शकतील. दोघांनीही बराच काळ एकमेकांपासून अंतर ठेवले होते. प्रेमविवाह असूनही लग्नानंतरही ते मतभेदांमुळे वेगळे राहिले. अशा परिस्थितीत एवढ्या वर्षांनी त्यांचे पुन्हा एकत्र येणे ही सर्वांसाठी मोठी गोष्ट आहे. रणधीर आणि बबिता यांनी 1971 मध्ये लग्न केले होते. पण मतभेदामुळे 1988 मध्ये ते वेगळे झाले होते.

रणधीर आणि बबिता का झाले होते वेगळे?
रणधीर कपूर आणि बबिता यांची पहिली भेट 1969 मध्ये आलेल्या ‘संगम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांची एकमेकांची ओळख झाली आणि नंतर हळूहळू त्यांच्यात भेटीगाठी वाढत गेल्या. रणधीर यांना बबिता यांची आपल्या कुटुंबीयांशी ओळख करून द्यायची होती, म्हणून त्यांनी बबिता यांना त्यांच्या एका चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत कास्ट करायचे ठरवले. या बहाण्याने त्यांचे कुटुंब बबिताला जवळून ओळखतील, असे त्यांना वाटले. त्यांनी बबिता यांना 'कल आज और कल' या चित्रपटात कास्ट केले. राज कपूर यांनाही बबिता पसंत पडल्या. बबिता आणि रणधीर यांच्या लग्नाला राज कपूर यांचा नकार नव्हता. पण त्यांनी बबिताकडे लग्नानंतर चित्रपटात काम न करण्याची अट घातली. बबिता यांचे रणधीर कपूर यांच्यावर खूप प्रेम होते. म्हणून त्यांनी सासरे राज कपूर यांची ही अट मान्य केली.

करिअरमधील डाऊनफॉलमुळे दोघांच्या नात्यात आला दुरावा
रणधीर आणि बबिता यांचे लग्न 6 नोव्हेंबर 1971 रोजी झाले होते. लग्नानंतर दोघेही खूप आनंदी होते. लग्नाच्या 4 वर्षांनंतर त्यांची पहिली मुलगी करिश्मा कपूरचा जन्म झाला. यानंतर 20 सप्टेंबर 1980 रोजी दुसरी मुलगी करीनाचा जन्म झाला.

पण 1981 पासून दोघांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. त्यांच्यातील मतभेद वाढू लागले. याचे कारण म्हणजे 80च्या दशकापासून रणधीर कपूर यांच्या करिअरला उतरती कळा लागली होती. याकाळात त्यांचा एकही चित्रपट चालला नाही. आर्थिक परिस्थिती ढासळू लागली होती. यामुळे त्यांना दारुचे व्यसन जडले. आणि त्यांनी करिअरवर अजिबात लक्ष केंद्रित केले नाही. ज्याचा परिणाम त्यांच्या नात्यावरही होऊ लागला. 1987 मध्ये बबिताने रणधीर कपूरपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, पण दोघांनी घटस्फोट घेतला नाही.

बबिताच्या म्हणण्यानुसार मी आयुष्य जगू शकत नव्हतो - रणधीर कपूर
एका मुलाखतीत बबिता आणि आपल्या नात्याबद्दल बोलताना रणधीर कपूर म्हणाले होते- 'तिला (बबिता) वाटले की, मी दारु पिणारी आणि रात्री उशीरा घरी परतणारी एक खूप वाईट व्यक्ती आहे. तेच तिला आवडले नाही. मला माझे आयुष्य तिच्या म्हणण्यानुसार जगायचे नव्हते. अर्थात आमचे लव्ह मॅरेज झाले होते, पण ती मला मी आहे तसे स्वीकारु शकली नाही. पण हरकत नाही. आम्हाला दोन मुली आहेत. बबिताने त्यांचे नीट संगोपन केले आणि आज दोघीही आपापल्या करिअरमध्ये यशस्वी आहेत,' असे ते म्हणाले होते.

मुलींच्या फीसाठीही पैसे नव्हते - रणधीर कपूर
सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे रणधीर कपूर यांच्यासमोर हलाखीच्या परिस्थिती निर्माण झाली होती. एक वेळ अशी आली की, त्यांच्याकडे दोन्ही मुलींची फी भरायलाही पैसे नव्हते. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, आज कोणत्याही अभिनेत्यासाठी पैसे कमवणे खूप सोपे झाले आहे. आमच्या काळात तसे नव्हते. माझ्यावर एक वेळ अशी आली होती की, माझ्याकडे माझ्या मुलींच्या शिकवणीसाठीदेखील पैसे नव्हते. पैसे मिळवण्यासाठी आम्ही खूप कष्ट करायचो, तो काळ माझ्यासाठी इतका कठीण होता की, मी माझ्या कमाईतून पत्नी बबिताचा खर्चही उचलू शकत नव्हतो,' असा खुलासा रणधीर कपूर यांनी केला होता.

बातम्या आणखी आहेत...