आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याचा संघर्ष:केके गोस्वामींना कमी उंचीमुळे सर्कसवाले 50 हजारांत खरेदी करणार होते, कसे बनले शक्तिमानचे खलीबली?

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मुंबईत येऊन धडपड करणे सोपे नसते. आणि जेव्हा तुमची उंची कमी असते तेव्हा हा संघर्ष अजूनच कठीण होतो. टीआरपी वाढवण्यासाठी लोक मला टीव्ही शोमध्ये काम द्यायचे. माझ्या कमी उंचीमुळे लोकांना मला बघायचे असायचे. मी लहान असताना माझ्या आईला माझ्या कमी उंचीमुळे शेजारी टोमणे मारायचे. काम न मिळाल्याने मी अनेक रात्री फक्त पाणी पिऊन काढल्या आहेत.'

हे सांगत आहेत अभिनेते केके गोस्वामी. ज्यांना तुम्ही त्यांच्या खऱ्या नावाने नव्हे तर शक्तिमान या टीव्ही मालिकेतील खली बालीच्या पात्राने ओळखत असाल. त्यांनी हिंदीसह अनेक भोजपुरी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. टीव्ही शोमधील त्यांच्या कामाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

केके गोस्वामी यांच्यासाठी बिहार ते मुंबई हा प्रवास सोपा नव्हता. कमी उंचीमुळे सर्कसवाल्यांना त्यांना 50 हजार रुपयांना विकत घ्यायचे होते, पण कुटुंबाने त्यांना प्रत्येक पावलावर साथ दिली. कमी उंचीमुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक टोमणे ऐकावे लागले. कमी उंची ही त्यांच्या अभिनय कारकिर्दीतही त्यांच्या संघर्षाचे कारण ठरली.

आजच्या स्ट्रगल स्टोरीजमध्ये केके गोस्वामी यांच्या संघर्षाची कहाणी त्यांच्याच शब्दांत…

माझा जन्म बिहारमधील मुझफ्फरपूर या छोट्याशा गावात झाला. वडिलांचे कॉस्मेटिकचे छोटेसे दुकान होते. माझ्या फावल्या वेळेत मीही त्यांच्यासोबत दुकानात काम करायचो. दुकानासोबतच वडील गावातील नाटक कंपनीचे संचालक होते. गावातील सर्व नाटकांचे दिग्दर्शन ते करत असत. मीही या नाटकांमध्ये भाग घ्यायचो. इथूनच माझा अभिनयाकडे कल वाढला.

मी बहुधा सातवी किंवा आठवीत होतो. मुझफ्फरपूरमधील मोतीपूर येथे हरदी मेळा भरला होता. वडिलांनी तिथे कॉस्मेटिकचे दुकान थाटले होते. एके दिवशी मी वडिलांसोबत जत्रा पाहायला गेलो आणि त्यांना दुकानात मदतही केली. यादरम्यान एका सर्कस कंपनीच्या काही लोकांची माझ्यावर नजर पडली. त्या लोकांना मला त्यांच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे होते.

या संदर्भात, ते लोक माझ्या वडिलांना भेटले आणि त्यांना म्हणाले - तुम्ही तुमचा मुलगा आमच्याकडे द्या, आमच्या सर्कस कंपनीत आम्हाला त्याला सोबत न्यायचे आहे. वडिलांनी नकार दिला आणि म्हणाले - हा माझा मुलगा आहे, आम्ही त्याला शिकवतोय. आम्हाला त्याची काही अडचण नाही, मग आम्ही तुम्हाला त्याला का द्यावे. त्या लोकांनी वडिलांना 50 हजार रुपयांच्या मोबदल्यात मला मागितले होते. परंतु वडिलांनी त्यांना स्पष्ट शब्दांत नकार दिला. अनेकदा नकार दिल्यानंतरही ते लोक आग्रह करत राहिले.

ते लोक इतके हट्टी होते की, त्यांनी आमच्या घरापर्यंत आमचा पाठलाग केला आणि ते मला त्यांच्यासोबत घेऊन जाण्यासाठी हट्ट करू लागले. हे लोक माझे अपहरण करतील याची वडिलांना खूप भीती वाटत होती. यामुळे मला गावी पाठवण्यात आले.

मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर जेव्हा मी गावातून शहराकडे निघालो तेव्हा मला जाणवले की, मी इतरांपेक्षा वेगळा आहे. यापूर्वी मला स्वतःमध्ये कोणतीही कमतरता दिसली नाही. मला पाहून मुले माझ्या मागे धावायची, पण त्यावर आई म्हणायची की, ज्या माणसात अनेक गुण असतात, लोक त्याच्याच मागे धावतात.

माझी उंची फक्त ३ फूट आहे. माझी आई शेजाऱ्यांशी भांडायची, तेव्हा माझ्या उंचीचे भांडवल करुन ते माझ्या आईला टोमणे मारायचे. ते खूप चुकीचे आणि वाईट बोलायचा. मात्र, त्यानंतरही या गोष्टींचा फारसा परिणाम झाला नाही. कधी कधी या गोष्टींचा अतिरेक झाला की, वाईट वाटायचे.

मॅट्रिकनंतर मी अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज केले पण नोकरी मिळाली नाही. त्याचे कारण होते की, मी फक्त 3 फूट उंच होतो. यामुळे मी दुकान उघडले आणि फोटोग्राफी करायला सुरुवात केली. यादरम्यान माझी भेट भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कुमार विकल यांच्याशी झाली. या भेटीचा किस्साही रंजक आहे.

एक दिवस दुकान बंद करून मी घराकडे निघालो. पण वाटेत एका गाडीपाशी थांबलो आणि मिठाई खाऊ लागलो. यादरम्यान माझे एका व्यक्तीसोबत थोडेसे भांडण झाले, त्यानंतर तो रागाने म्हणाला - मी कोण आहे हे तुला माहीत नाही, मी भोजपुरी इंडस्ट्रीचा दिग्दर्शक कुमार विकल आहे. हे ऐकून मी त्यांची माफी मागू लागलो आणि बदल्यात त्यांना रबडी खाऊ घातली. त्यांचा राग शांत झाला, मग त्यांनी मला त्यांचे कार्ड दिले आणि कामाचे आश्वासन देऊन मुंबईला येण्यास सांगितले.

त्यानंतर मी मुंबईला गेलो आणि तिथे कुमार विकल यांनी मला 'रखिह अंचरवा के लाज' या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. या चित्रपटाचा नायक विजय खरे याने मला खूप साथ दिली. या चित्रपटानंतर मी त्याच्यासोबत स्पॉट बॉय म्हणून काम केले. सेटवर चहा देण्यापासून त्याचा सगळा हिशेब मीच बघत असायचो.

काही दिवसांनी माझ्याकडे काम नव्हते, त्यानंतर माझा खरा संघर्ष मुंबईत सुरू झाला. हलाखीच्या परिस्थितीमुळे आठवड्यातून तीन दिवस उपाशी काढावे लागत होते. परिस्थिती इतकी वाईट होती की, भूक लागली तरी खायला काहीच नसायचे. पाणी बघून उलट्या व्हायच्या, पण आज पाणी पिऊ आणि उद्या भाकरी खाऊ असा विचार मी करायचो. तब्बल पाच वर्षे अशीच काढली.

एके दिवशी माझा एक मित्र म्हणाला की, मी किती दिवस असे न जेवता झगडणार. त्याने मला बिअर बारमध्ये वॉचमन म्हणून नोकरी करण्याचा सल्ला दिला. मला तिथे महिन्याला 500-600 रुपये मिळतील, राहायला जागा मिळेल आणि चांगले जेवणही मिळेल असे त्याने मला सांगितले. मला हे काम आवडले, त्यानंतर मी तिथे काम मागायला गेलो. तिथल्या चौकीदाराने मला ग्राहक समजून आत पाठवले.

मी आत गेलो, पाहिले की सगळे मस्ती करत आहेत, मग थोड्या वेळाने बाहेर जाऊन वॉचमनला सांगितले की, मला या हॉटेलच्या मालकाला भेटायचे आहे. त्याने भेटण्याचे कारण विचारले. मलाही त्यांच्यासारखा चौकीदार म्हणून काम करायचे आहे, असे मी सांगितले. त्याने नकार दिला आणि मालकाला भेटू दिले नाही. मला वाटले की तो हे जाणूनबुजून करतोय, म्हणून मी आग्रह करत राहिलो. माझ्या हट्टीपणाने तो इतका चिडला की, त्याने मला काठीने मारून पळवण्याचा प्रयत्न केला. मला याचे खूप वाईट वाटले आणि मग मी ठरवले की, मला कितीही संघर्ष करावा लागला तरी अभिनेता म्हणूनच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची.

केके गोस्वामी पत्नी पिंकू, मुले नवदीप आणि सौम्यासोबत.
केके गोस्वामी पत्नी पिंकू, मुले नवदीप आणि सौम्यासोबत.

या काळात मी ज्यांच्यासोबत राहत होतो ते मला हिंदी चित्रपट आणि टीव्ही शोच्या ऑडिशनसाठी घेऊन जात असत. अशाप्रकारे मला शक्तिमान टीव्ही शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये लोकांना माझे काम खूप आवडले, त्यानंतर अनेक टीव्ही शो आणि चित्रपट ऑफर झाले. चित्रपटांतील माझ्या बहुतेक भूमिका छोट्या असायच्या. माझी उंची कमी असल्याने मला कोणीही मुख्य भूमिका देत नव्हते, साइड लीड रोलची ऑफरही मिळत नव्हती. टीआरपी वाढवण्यासाठी मला छोट्या-छोट्या भूमिका दिल्या जायच्या. त्याचे कारण म्हणजे लहान मुलांना माझे काम आवडते म्हणून मला काम मिळायचे. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे.

2001 मध्ये मी टीव्ही शो ज्युनियर जी साठी शूटिंग करत होतो. त्याच काळात घरच्यांनी माझे लग्न निश्चित केले. माझ्या पत्नीला आधीच माझी उंची फक्त 3 फूट असल्याचे सांगण्यात आले होते. पण तिला यात काही अडचण नव्हती. जेव्हा तिच्या गावातील लोकांना समजले की, तिचे लग्न माझ्याशी ठरले आहे, तेव्हा त्यांनी माझ्या सासरच्या लोकांना खूप चिथावण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांनी मला ज्युनियर जी मध्ये पाहिले होते. लोकांच्या बोलण्यानंतर, माझ्या पत्नीला पुन्हा विचारण्यात आले की, ती खरंच माझ्याशी लग्न करायला तयार आहे का? यावर तिने उत्तर दिले- मी त्यांना आधीच माझा पती म्हणून स्वीकारले आहे, आता मी माझा निर्णय बदलू शकत नाही.

आईच्या प्रकृती अस्वस्थाचे कारण सांगून घरच्यांनी मला घरी बोलावले, कारण यापूर्वी माझे दोनदा लग्न ठरले होते, पण मी लग्नाला गेलो नाही. यामुळे कुटुंबीयांना यावेळी धोका पत्करायचा नव्हता. एकदा मी लग्नाला गेलो नव्हतो, त्याऐवजी माझ्या भावाचे लग्न लावण्यात आले होते. त्यामुळे घरातील सदस्यही चांगलेच संतापले होते.

यावेळी मी घरी गेलो तेव्हा मला कळले की, माझे लग्न ठरले आहे. मला पाहून मुलगी मला नकार देईल, अशी भीती मनात होती. या कारणास्तव मी तिच्या कुटुंबीयांना विनंती केली की, लग्न जास्त धूमधडाक्यात न करता मंदिरात व्हावे. त्यांनी माझा शब्द पाळला आणि अशाप्रकारे मंदिरात आमचे लग्न झाले.

लग्नानंतर मी पत्नीसोबत मुंबईला आलो. आम्हाला दोन मुले झाली. माझ्या कमी उंचीचा परिणाम त्यांच्यावरही झाला. त्यांनाही टोमणे ऐकावे लागले. मी माझ्या मोठ्याला शाळेत सोडायचो, जेव्हा त्याच्या एका मित्राने मला पाहिले तेव्हा त्याने माझी चेष्टा करायला सुरुवात केली. यामुळे माझ्या मुलाला खूप वाईट वाटले. जेव्हा मला हे कळले तेव्हा मी त्याला शाळेच्या काही अंतरावर सोडत असे जेणेकरून इतर मुलांनी त्याची चेष्टा करू नये. काही दिवसांनी मी त्याला शाळेत सोडणे पूर्णपणे बंद केले. मी माझ्या बायकोला शाळेत घेऊन जायला सांगितले, मग तिने दोन्ही मुलांना शाळेत सोडायला सुरुवात केली.

अशी ही पहिला घटना नव्हती. याआधी मी लहान असताना, माझ्या मोठ्या भावाला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. एकदा तो मला एका दुकानात घेऊन गेला जिथे काही मुलांनी माझी चेष्टा करायला सुरुवात केली आणि मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरी आल्यानंतर त्याने मला कुठेही नेणार नाही, असे घरच्यांना सांगितले. बाहेरचे लोक माझी चेष्टा करतात, जी त्याला आवडली नव्हती.

अलीकडेच केके गोस्वामी यांच्याकडे गेल्या 6 वर्षांपासून कोणतेही काम नसल्याचे वृत्त आले होते. यावर ते म्हणाले- असे अजिबात नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी गेल्या 4 वर्षांपासून कोणत्याही मोठ्या टीव्ही शो आणि चित्रपटांचा भाग नाही असे सांगितले होते. माझ्याकडे अजून काम आहे. माझा द डार्क जंगल हा चित्रपट येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे. तसेच, मी तुंबाडच्या दिग्दर्शकासोबत एका बिग बजेट वेब सिरीजवर काम करत आहे, जी लवकरच रिलीज होणार आहे.