आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड गायक केके (कृष्ण कुमार कुन्नथ) यांचे मंगळवारी वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले. परफॉर्मन्सनंतर ते अस्वस्थ अवस्थेत हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना सीएमआरआय (कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. दरम्यान, गायक अंकित तिवारीने ट्विटरवर केके यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
केके यांनी गमतीने म्हटलेले सत्यात उतरले
व्हिडिओमध्ये केके 'आंखों में तेरी' हे रोमँटिक गाणे गाताना दिसत आहेत. गाताना ते प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मुलींकडे माईक फिरवतात आणि त्यांना गाणे म्हणायला सांगतात. त्यानंतर ते गमतीने 'हाय, मैं मर जाऊं यहीं पे.' असे म्हणतात. पण कुणाला माहित होत की, त्यांनी गमतीने म्हटलेले त्याच रात्री खरे ठरेल. त्यांच्या अकाली निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दिव्यांका त्रिपाठीने अंकितच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे
व्हिडिओ शेअर करताना अंकित तिवारीने कॅप्शनमध्ये लिहिले, "केके म्हणाले होते की, मैं मर जाऊं यहीं पै आणि ही दुर्दैवी घटना घडली. यावर विश्वासच बसत नाहीये. ओम शांती." अंकितच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने लिहिले, "आयुष्य आपल्यासोबत कधी कधी असे वागते. या बातमीने खूप दुःख झाले आहे. देव केके यांच्या आत्म्याला शांती देवो," असे दिव्यांका म्हणाली आहे.
केके यांनी हिंदी-तामिळसह 11 भाषांमध्ये गाणी गायली
23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीत जन्मलेले प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ यांना इंडस्ट्रीत केके या नावाने ओळखले जाते. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांसाठीही गाणी गायली. केके यांनी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी सुमारे 35,000 जिंगल्स गायल्या होत्या.
'माचीस' चित्रपटातील 'छोड आये हम' या गाण्याद्वारे केले होते पदार्पण
केके यांनी बॉलिवूडमध्ये 'माचीस' या चित्रपटातील 'छोड आये हम' या गाण्याद्वारे पदार्पण केले होते. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप तडप' या गाण्याद्वारे त्यांना मोठा ब्रेक मिळाला. याशिवाय केके यांनी 'यारो', 'पल', 'कोई कहे कहता रहे', 'मैंने दिल से कहा', 'आवरापन बंजारापन', 'दस बहाने', 'अजब सी', 'खुदा जाने' आणि 'दिल इबादत', 'तू ही मेरी शब है' सारखी अनेक सुंदर गाणी गायली आहेत.
2000 मध्ये केके यांना 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप-तडप' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा गिल्ड फिल्म पुरस्कार मिळाला होता. 2008 मध्ये 'ओम शांती ओम'मधील 'आँखों में तेरी' आणि 2009 मध्ये 'बचना-ए हसीनो' मधील 'खुदा जाने' या गाण्यांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
'पल' या म्युझिक अल्बममधून गायनाची केली होती सुरुवात
2021 मध्ये केके यांना मिर्ची म्युझिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान केके यांनी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी 'जोश ऑफ इंडिया' हे गाणे गायले होते. त्यांच्या या गाण्यात अनेक भारतीय क्रिकेटर्सही झळकले. केके यांनी 'पल' या म्युझिक अल्बममधून आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.