आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इट्स पार्टी टाइम:'लगान'ला 21 वर्षे पूर्ण, आमिर खानने टीमसाठी घरी ठेवली जंगी पार्टी, व्हिडिओ आणि फोटो व्हायरल

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या पार्टीला या चित्रपटाची टीम उपस्थित होती.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या लगान या चित्रपटाच्या रिलीजला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपट 15 जून 2001 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एवढ्या वर्षांनंतर आजही हा चित्रपट लोक आवडीने बघतात. 2001 मध्ये या चित्रपटाने 53 कोटींची कमाई केली होती. विविध पुरस्कार सोहळ्यात अनेक पुरस्कार आपल्या नावी करणा-या या चित्रपटाने त्यावेळी ऑस्करवारीदेखील केली होती. आता चित्रपटाला 21 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नुकतीच आमिरच्या घरी एक जंगी पार्टी झाली. या पार्टीला या चित्रपटाची टीम उपस्थित होती. आता पार्टीचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत.

आमिर खानच्या प्रॉडक्शनने 'लगान' टीमच्या इंटिमेट सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील 'चले चलो' हे गाणे वाजत असून संपूर्ण टीम एकत्र मस्ती करताना दिसत आहे.

2021 मध्ये महामारीच्या काळात, चित्रपटाच्या रिलीजला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्टारने व्हर्च्युअल गॅदरिंग केले होते. पण यावेळी दिग्दर्शकासह संपूर्ण स्टारकास्ट या एव्हरग्रीन चित्रपटाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. आशुतोष गोवारीकरपासून ते अखिलेंद्र मिश्रा, ग्रेसी सिंग, यशपाल शर्मा, रघुवीर यादव, राजेश विवेक उपाध्याय, दया शंकर पांडे, राजेंद्रनाथ झुत्शी, राजा अवस्थी, सुहासिनी मुळे, प्रदीप रामसिंग रावत, अमीन गाझी यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, लगानला आतापर्यंत यश मिळत आहे. उद्योग वृत्तांनुसार, यूकेच्या अनेक आघाडीच्या निर्मात्यांनी आमिर खान प्रॉडक्शनला चित्रपटाच्या हक्कांसाठी विनंती केली आहे आणि वेस्ट एंड थिएटरबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

या चित्रपटाने 8 राष्ट्रीय पुरस्कार, 8 फिल्मफेअर पुरस्कार, 8 स्क्रीन पुरस्कार आणि 10 आयफा पुरस्कार जिंकले होते.आमिरच्या व्हॉट्सअॅपवर 'लगान 11' नावाचा एक ग्रुप आहे, ज्यामध्ये अजूनही चित्रपटाशी संबंधित लोक कनेक्ट आहेत.

आमिर खानचा आगमी चित्रपट

आमिर खान लवकरच 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आमिरसोबत करीना कपूर, मोना सिंह, नागा चैतन्य हे देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...