आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किस्से:मंदिराबाहेर झाला होता 'रामायणा'त मंथराची भूमिका साकारणा-या ललिता पवार यांचा जन्म, भगवानदादामुळे झाली होती चेह-याची अशी अवस्था

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • अ‍ॅक्शन चित्रपटात स्टंट करणा-या अभिनेत्री, रामायणातील मंथरा म्हणून प्रसिद्ध...
 • 1938 मध्ये आलेल्या 'राजकुमारी' या चित्रपटामध्ये ललिता पवार यांनी दुहेरी भूमिका साकारली होती.
 • 'चतुर सुंदरी' या चित्रपटात ललिता यांनी 17 भूमिका साकारल्या होत्या, जो आतापर्यंतचा विक्रम आहे.

घराघरात रामायणातील मंथरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ललिता पवार यांची आज 104 वी जयंती आहे. ललिता यांचा जन्म 18 एप्रिल 1916 रोजी येवल्याचे (नाशिक) रेशमी आणि सुती वस्त्रांचे सधन व्यापारी लक्ष्मणराव सगुण यांच्या घरी झाला होता. 24 फेब्रुवारी 1998 रोजी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ललिता यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला. मात्र 'रामायण' मालिकेत त्यांनी साकारलेली मंथराची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 1987 साली जेव्हा त्यांनी रामानंद सागर यांच्या रामायणात मंथराची भूमिका साकारली होती, तेव्हा त्यांना इंडस्ट्रीत काम करुन 62 वर्षे लोटली होती.  

 

 • ललिता यांनी स्वत: च्या चित्रपटात नाव बदलले

ललिता पवार यांचे वडील लक्ष्मणराव सगुन हे नाशिकमधील श्रीमंत उद्योजक होते. असे म्हणतात की जेव्हा ललिता यांची आई गर्भवती होती, तेव्हा अंबा देवीच्या मंदिरात दर्शनाला गेली जेथे तिला बाळंतपणाचा त्रास झाला आणि मंदिराबाहेर ललिता यांचा जन्म झाला. अंबा देवीच्या नावावरुन त्यांचे नाव अंबिका असे ठेवले गेले. एकदा अंबिका त्यांचे वडील आणि भावासोबत पुण्यात चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी गेल्या होत्या, तिथे दिग्दर्शक नाना साहेबांनी त्यांना पाहिले आणि बालकलाकाराची भूमिकेसाठी त्यांची निवड केली. पण ललिताच्या वडिलांचा याला कडाडून विरोध होता. बरीच समजूत घातल्यानंतर त्यांनी ललिता यांना अभिनयासाठी परवानगी दिली. वयाच्या नवव्या वर्षी ललिता यांनी मूकपटात बालकलाकाराची भूमिका करायला सुरुवात केली होती. आर्यन कंपनीच्या नानासाहेब सरपोतदारांनी त्यांना या क्षेत्रात येण्याची संधी दिली होती. ललिता पवार यांचे भाऊ मास्टर शांताराम सगुण या नावाने मूकपटात काम करत असे.

 • 18 रुपये होता पगार

नानासाहेब सरपोतदार यांच्याच कंपनीत ललिता पवार यांनी 18 रुपये मासिक पगारावर काम करणे सुरु केले. तर त्यांच्या भावाला 7 रुपये मासिक पगार मिळत होता. 1928 च्या ‘राजा हरिश्चंद्र’; या मूकपटापासून ललिता यांना मुख्य नायिकेच्या भूमिका मिळण्यास सुरुवात झाली. ‘गनिमी कावा’;, ‘आर्य महिला’;, ‘ठकसेन’;, ‘पारिजातक’;, ‘भीमसेन’;, ‘पृथ्वीराज संयोगिता’;, ‘नको गं बाई लग्न’;, पतित उधार, सुभद्रा हरण, चतुर सुंदरी हे त्यांचे मूकपट लोकप्रिय झाले होते. ललिता यांनी त्यांच्याच बॅनरमध्ये बनलेल्या दुनिया क्या है या चित्रपटात स्वतःचे नाव बदलून ललिता ठेवले होते. अंबिका नाव लोकांच्या स्मरणात राहणार नाही, असे त्यांना वाटले होते. 

 • अ‍ॅक्शन सीनसुद्धा केले आणि स्वीमसुटही घातला

ललिता पवार यांनी 1935 पर्यंत मुकपटात अभिनय केला. 1935 मध्ये त्या पहिल्यांदा बोलपटात झळकल्या. त्यांचा पहिला बोलपट होता 'हिम्मत-ए-मर्दा'. या चित्रपटात ललिता पवार ग्लॅमरस अवतारात झळकल्या होत्या. विशेष म्हणजे या चित्रपटातील सर्व गाणी ललिता यांनी स्वतः गायली होती. चार आठवडे हा चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत चालू होता. त्यानंतर 1936 मध्ये त्या सिनेनिर्मिती क्षेत्रात आल्या. त्यांची निर्मिती असलेला 'दुनिया क्या है' हा चित्रपट होता. नेताजी पालकर आणि अमृत या चित्रपटांमध्ये त्या इमोशनल भूमिकेत झळकल्या होत्या. याशिवाय त्यांनी अ‍ॅक्शन चित्रपटातही काम केले. 1932 मध्ये आलेल्या ‘मस्तीखोर माशूक’ आणि ‘भवानी तलवार’, 1933 मध्ये आलेल्या ‘प्यारी कटार’ आणि ‘जलता जिगर’, 1935 च्या ‘कातिल कटार’ या चित्रपटांत त्यांनी अ‍ॅक्शन सीन केले.  दैनी खजाना या चित्रपटात स्वीमसुटही परिधान केला होता. त्याकाळात ललिता यांनी अनेक टॅबू ब्रेक केले होते. 

 • एका थापडीने उद्धवस्त झाले होते करिअर

ललिता पवार अभिनेत्रीच्या रुपात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणयात यशस्वी ठरल्या होत्या. मात्र एका चित्रपटाच्या सेटवर अभिनेते भगवानदादा यांनी मारलेल्या थापडीने त्यांचे करिअर उद्धवस्त केले होते. ही घटना 1942 मधील होती. त्यावेळी 'जंग-ए-आझादी' या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. भगवानदादाबरोबर एका प्रसंगाचे त्या चित्रण करीत होत्या. थंडीच्या दिवसात, तळ्यात स्नान करीत असलेल्या ललिताला मास्टर भगवान थोबाडीत देतो असा सीन होता. भगवानदादा पैलवान होते आणि फिल्मी दुनियेत नवखे होते. त्यांनी चुकून ललिता यांच्या कानफटीत एक सणसणीत ठेवून दिली. त्यामुळे ललिता यांच्या डाव्या डोळयाची रक्तवाहिनी फुटली, चेहऱ्याला तात्पुरता पॅरॅलिसिसचा अॅटॅक आला. सतत तीन वर्षे उपचार घेऊनही शेवटी त्यांच्या डाव्या डोळ्यात दोष निर्माण झाला. त्यांना मुख्य नायिकेच्या भूमिका सोडून देऊन पुढे चरित्र नायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या. त्या भूमिका पुढे ललिता यांना प्रसिद्धीच्या शिखरावर घेऊन गेल्या.

 • दीर्घ करिअरसाठी गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले गेले

भारतीय चित्रपटसृष्टीत प्रदीर्घ काळ काम करणार्‍या महिला अभिनेत्री म्हणून ललिता पवार यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या साइटवर नोंदवलेल्या नोंदीनुसार हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी सात दशके काम केले. याकाळात त्यांनी 700 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सात दशकांच्या या कारकीर्दीत त्यांनी सकारात्मक, नकारात्मक आणि मोहक अशा सर्व प्रकारच्या पात्रांना जिवंत केले आहे.  

 • पहिले लग्न ठरले होते अयशस्वी

दिग्दर्शक जी. पी. पवार यांच्याबरोबर ललिता यांचा पहिला विवाह झाला आणि त्या ललिता पवार झाल्या. जी.पी. पवारांबरोबर ललिता यांनी सात-आठ चित्रपटही केले होते. मात्र दुर्दैवाने हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यानंतर ललिता यांनी अंबिका स्टुडिओचे मालक आणि निर्माते रामप्रकाश गुप्ता यांच्याबरोबर दुसरा विवाह केला होता.

 • जे काम केले त्यात जीव ओतला...

डोळ्याला झालेल्या दुखापतीनंतर एका मुलाखतीत ललिता यांनी सांगितले होते, माझे नायिका म्हणून करिअर संपुष्टात आले आहे, याची मला जाणीव झाली होती. कारण नायिकेसाठी सॉफ्ट फेसची गरज असते. मी निश्चय केला, की यापुढे ज्या भूमिका मिळतील, त्यात आपले सर्वोत्तम द्यायचे. 1962 मध्ये ललिता 'गृहस्थी' या सिनेमात झळकल्या होत्या. हा सिनेमा ज्युबली हिट ठरला. या सिनेमासाठी त्यांना भरपूर पुरस्कार मिळाले.  

 • लता मंगेशकर यांना दिले होते सोन्याचे कानातले

मायापुरीला 1975 मध्ये दिलेल्या मुलाखतीत ललिता पवार यांनी एक अतिशय रंजक गोष्ट सांगितली होती, 'महाराष्ट्रात खूप पूर्वी एक कार्यक्रम झाला होता. एक छोटी मुलगी गायला बसली होती. तिने इतके चांगले गायले की मी स्वतःला विसरले. या मुलीला बक्षिस का मिळाले नाही, याचा मला राग आला. मी उभी राहिले आणि सांगितले की या मुलीला माझ्याकडून सुवर्ण पदक दिले पाहिजे, परंतु नंतर मी सुवर्ण पदक घेऊन आलेले नाही, याची मला जाणीव झाली, मग मी शांतपणे माझ्या जागी बसले. नंतर मी सोन्याचे कानातले बनवले आणि कोल्हापूरला जाऊन त्या मुलीला दिले. त्या मुलीचे नाव लता मंगेशकर होते.'

 • दोन दिवस घरातच पडून राहिला होता मृतदेह

1990 मध्ये ललिता यांना जबड्याचा कॅन्सर झाला. उपचारासाठी त्या पुण्यात स्थायिक झाल्या. कॅन्सरमुळे दिवसेंदिवस त्यांचे वजन कमी होत गेले आणि त्यांची स्मरणशक्तीही कमजोर झाली. 26 फेब्रुवारी 1998 रोजी त्यांच्या पतींनी त्यांना फोन केला, मात्र त्यांनी तो उचलला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय पुण्याच्या घरी दाखल झाले. येथे त्यांना त्यांचा मृतदेह आढळून आला. पोस्टमार्टममध्ये उघड झाले, की 24 फेब्रुवारी रोजीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच पडून राहिला होता. त्यांच्या निधनाबद्दल कुणालाच कळू शकले नव्हते. आज ललिता पवार आपल्यात नाहीत, मात्र त्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिकांमधून त्या नेहमीच जीवंत राहतील.

बातम्या आणखी आहेत...