आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून 92 वर्षीय लता दीदी आयसीयूमध्ये होत्या. रुग्णालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. लता दीदींच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी त्यांची बहीण आशा भोसले आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर हेही रुग्णालयात पोहोचले आहेत. जवळपास दोन तास आत राहिल्यानंतर दोघे म्हणाले, दीदी बऱ्या आहेत, तुम्ही सर्व प्रार्थना करा.
राज ठाकरेंनी केली प्रकृतीची विचारपूस
लता दीदी अजूनही ICU मध्ये आहेत आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत, असे त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दीदींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी इस्पितळात गेले आहेत.
मध्यंतरी प्रकृतीत झाली होती सुधारणा, आरोग्य मंत्र्यांनी दिली होती माहिती
पाच दिवसांपूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लता दीदींच्या प्रकृतीविषयी माहिती देताना सांगितले होते की, 'मी लता दीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोललो. त्या ब-या होत आहेत. त्यांनी कोरोना आणि न्यूमोनियावर मात केली आहे. त्या काही काळ व्हेंटिलेटरवर होत्या, पण आता त्यांचे व्हेंटिलेटरही काढून टाकण्यात आले आहे. 15 दिवसांच्या उपचारानंतर त्या व्हेंटिलेटवर नाही. त्यांना फक्त ऑक्सिजन दिला जात आहे. लता दीदी सतत डोळे उघडत आहेत. कोरोनामुळे त्या थोड्या अशक्त झाल्या आहेत, पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.'
परंतु नुकत्याच आलेल्या माहितीनुसार लता दीदींची तब्येत खालावली असून चाहते त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी सदिच्छा व्यक्त करत आहेत.
याआधीही नोव्हेंबर 2019 मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना 28 दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.