आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लता मंगेशकर@91:मंगेशकर नव्हे हर्डीकर आहे लता दीदींचे आडनाव, गाण्याच्या रेकॉर्डिंगपूर्वी नेहमी आपल्या पायातील चप्पल बाजूला काढून ठेवतात, वाचा दीदींच्या या खास गोष्टी

मुंबई7 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 91 वा वाढदिवस आहे.

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर... भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. लतादीदींचा आज वाढदिवस आहे. 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदौर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीयन गोमंतक कुटुंबात त्यांचा झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता दीदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.

लता मंगेशकर यांनी लग्न का केले नाही, याचे उत्तर त्यांनी स्वत: दिले होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की घरात सर्व सदस्यांची जबाबदारी माझ्यावर होती. अशावेळी अनेकदा लग्नाचा विचार मनात आला मात्र तो प्रत्यक्षात कधीच अमलात आणला नाही. खूप कमी वयातच काम करण्यास सुरुवात केली होती. 1942मध्ये वयाच्या 13व्या वर्षी लताजी यांच्या डोक्यावरून वडिलांची सावली हरपली. त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली.

गेल्या सहा ते सात दशकांत त्यांनी नऊशेहून अधिक हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. याशिवाय इतर 37 प्रादेशिक भाषांमधूनही त्यांनी गाणी गायली. त्यांनी गायलेल्या गाण्यांची एकूण संख्या 25 हजारांपेक्षाही जास्त असावी. सहा दशकांहून अधिकचा काळ लतादीदींनी आपल्या सुरेल आवाजाने गाजवला आहे. वाचा दीदींविषयीच्या या खास गोष्टी...

दीदी गाणं रेकॉर्डिंग करताना नेहमी आपल्या पायातील चप्पल बाजूला काढून ठेवतात. शीष चॅटजी यांनी 2008 साली 'लता गीतकोष' नावाने एक पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकात त्यांनी हा उल्लेख केला होता.

 • लता दीदी केवळ एकच दिवस शाळेत गेल्या होत्या. शाळेत गेल्यानंतर दीदींनी आपल्या वर्गातील मुलांना गाणे शिकवणे सुरु केले होते. शिक्षकांनी त्यांना रागावल्यानंतर दीदी नाराज झाल्या आणि त्यानंतर त्या कधीच शाळेत गेल्या नाही.
 • 'आज तुम्ही रिजेक्ट केले. मात्र एक दिवस असा येईल जेव्हा सर्व निर्माते आणि दिग्दर्शक लताच्या पाया पडून तिला आपल्या सिनेमात गाणे गाण्याची विनंती करतील.' 'शहीद' या सिनेमाचे दिग्दर्शक शशधर मुखर्जी यांनी लता मंगेशकर यांचा आवाज खूप पातळ असल्याचे कारण देत त्यांना रिजेक्ट केले होते. तेव्हा दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी रागात येऊन ही भविष्यवाणी केली होती.
 • लता दीदींनी 1942 ते 1948 या काळात आठ सिनेमांमध्ये काम केले. 'पहिली मंगळा गौर' हा लता दीदींचा पहिला सिनेमा होता. तसे पाहता दीदी पाच वर्षांच्या असताना त्यांनी आपल्या वडिलांच्या एका नाटकातसुद्धा अभिनय केला होता.
 • कवी प्रदीप यांनी लिहिले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल `ऐ मेरे वतन के लोगो' हे लता दीदींनी गायलेले गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांना आपले अश्रू आवरता आले नव्हते.

 • 1990 साली लता दीदींनी स्वतःचे होम प्रॉडक्शन सुरु केले. त्यांच्या होम प्रॉडक्शनमध्ये 'लेकिन' नावाचा एकमेव सिनेमा तयार झाला होता.
 • 'माई म्हणायची, की तिला (लता) परींनी पाठवले आहे. तिचा आवाज असा आवाज आहे, जो जगात पहिले कधी कुणी ऐकला नाही आणि अशा आवाजाची निर्मिती भविष्यातही कधी होणार नाही,'' असे आशा भोसले यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
 • लता दीदींचे सिंगिंग करिअर खूप मोठे राहिले आहे. 1970 आणि 80च्या दशकानंतर लता दीदींनी त्या संगीतकारांबरोबर काम केले, ज्यांच्या वडिलांबरोबरसुद्धा त्यांनी काम केले होते. यामध्ये राहुल देव बर्मन (सचिन देव बर्मन यांचा मुलगा), राजेश रोशन (रोशन यांचा मुलगा), अनु मलिक (सरदार मलिक यांचा मुलगा) यांचा समावेश आहे.
 • 1987 साली लता दीदींच्या नावाची नोंद जगातील सर्वाधिक गाणे गाणा-या गायिकेच्या रुपात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. 1948 ते 1987 या काळात दीदींनी 20 भाषांमध्ये तब्बल तीस हजारांहून अधिक गाणी गायली होती.
 • लता यांना पहिल्यांदा स्टेजवर गाणे गाण्यासाठी 25 रुपये मिळाले होते. याला त्या पहिली कमाई मानतात.
 • मंगेशकर कुटुंबीयांचे मूळ आडनाव हर्डीकर होते. पण ते मूळचे गोव्यातील मंगेशी येथील राहणारे असल्याने त्यांनी पुढे मंगेशकर हे आडनाव लावण्यास सुरुवात केली.
 • मास्टर विनायक दीदींना मराठी सिनेमांत गाण्याची आणि अभिनयाची संधी दिली. वसंत जोगळेकरांच्या 'किती हसाल' या 1942 सालच्या चित्रपटातले 'नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी' हे सदाशिव नेवरेकरांनी संगीतबद्ध केलेले मराठी गीत गाऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
 • वसंत जोगळेकरांच्याच 1946 सालच्या 'आप की सेवा में' या हिंदी चित्रपटात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले 'पा लागू कर जोरी' हे पहिले गीत दीदींनी गायले.
 • लता दीदींना हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवणे आणि आपली जागा निर्माण करणे तेवढे सोपे नव्हतं. त्या काळात हिंदी संगीतात नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई अंबालेवाली यांच्यासारख्या गायिकांच्या अनुनासिक आणि जड आवाजाची मोहिनी भारतीयांवर पडली होती. त्यामुळे त्या काळातील प्रथितयश निर्मात्यांना दीदींचा आवाज अतिशय `बारीक' वाटला. काहींनी तो नाकारलासुद्धा. पण त्या काळातील सुप्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांना दीदींच्या आवाजावर पूर्ण विश्वास होता. जनाब हैदर साहेबांनी हा पुढच्या काळातला शाश्वत आवाज आहे, हे तेव्हाच ओळखले होते. त्यांनीच दीदींना मजबूर (1948) या सिनेमात 'दिल मेरा तोडा' हे गीत गाण्याची संधी दिली.
 • 1950 नंतर लता दीदींचा उत्कर्षाचा काळ सुरू झाला. त्या काळातील अनिल विश्वास, नौषाद, सज्जाद हुसेन, वसंत देसाई, हंसराज बहल, वसंत देसाई यांच्यासारखे जुने आणि त्या काळात उदयाला येणारे एस. डी. बर्मन, सलील चौधरी, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, मदन मोहन, उषा खन्ना, रवी, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आर डी बर्मन अशा सगळ्याच संगीतकारांकडे दीदी गाऊ लागल्या. या सगळ्यांकडे गायलेल्या दीदींच्या गाण्यांना अमाप लोकप्रियता मिळत गेली.
 • 1962 साली लता दीदींच्या जेवणात विष कालवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतर त्या तीन महिने रुग्णालयात होत्या. पोलिस तपासात हा प्रयत्न कुणी केला होता, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते.
 • संगीतकार सलील चौधरी यांनी 'मधुमती' या चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेल्या 'आजा रे परदेसी' या गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. त्यानंतर सतत दहा वर्ष त्यांना हे पारितोषिक मिळत राहिले. दीदींना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर नवीन कलावंतांना संधी मिळावी म्हणून त्यांनी फिल्मी कॅटेगरी अवॉर्ड घेण्यास नकार दिला.
 • 'आनंदघन' या नावाने त्यांनी काही चित्रपटांना संगीतही दिले. त्यांनी काही मराठी (वादळ) आणि हिंदी (झांजर, कांचन, लेकीन) अशा चित्रपटांची निर्मितीही केली.

दीदींना 1969 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मविभूषण ही पारितोषिके प्रदान करण्यात आली. शिवाय चित्रपटसृष्टीतील भरीव कामगिरीबद्दल देण्यात येणारा `दादासाहेब फाळके' हा सर्वोच्च सन्मानही त्यांना प्रदान करण्यात आला. एवढेच नव्हे, तर भारतातील सर्वोच्च समजला जाणारा `भारतरत्न' हा किताब त्यांना 2001 मध्ये प्रदान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...