आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागानकोकिळा लता मंगेशकर यांना रविवारी (9 जानेवारी) सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. चाहते दीदी लवकरात लवकर ब-या व्हाव्या म्हणून प्रार्थना करत आहेत. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 92 वर्षीय लता मंगेशकर यांना वयामुळे इतरही अनेक समस्या आहेत. त्यामुळे डॉक्टर त्यांची विशेष काळजी घेत आहेत. त्याच वेळी, त्यांना कोविडसह न्यूमोनिया देखील आहे. पुढील 8 ते 10 दिवस डॉक्टर त्यांना देखरेखीखाली ठेवतील.
दिव्य मराठीने पेडर रोडवरील लता दीदींचे निवासस्थान असलेल्या प्रभाकुंज येथील स्थिती जाणून घेतली. प्रभाकुंजमध्ये वास्तव्याला असलेल्या एकट्या लता दीदी कोरोना पॉझिटिव्ह नाहीत, इमारतीत आणखी 4-5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या इमारतीमध्ये बाहेरील व्यक्ती आणि वाहनचालकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. जवळपास 2 वर्षांपासून लता दीदी क्वचितच घराच्या बाल्कनीत दिसल्या. त्यांचा रियाजही चार वर्षांपासून नियमित नाही.
लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही दीदींना झाला संसर्ग
लता मंगेशकर यांची भाची रचना हिने सांगितले की, लता दीदींची प्रकृती स्थिर आहे. दीदी लवकर ब-या होऊन घरी परत याव्या हीच सर्वांची प्रार्थना आहे. त्यांनी सांगितले की, दीदींनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते, त्यानंतरही त्यांना संसर्ग झाला आहे. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
प्रभाकुंजच्या पहिल्या मजल्यावर राहतात लता मंगेशकर
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लता दीदींचा फ्लॅट आहे. तसेच त्यांची बहीण उषा मंगेशकर, भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब याच इमारतीत राहतात. आशा भोसले या अशोका टॉवर लोअर परळ येथे राहतात. आम्ही जेव्हा लता मंगेशकर यांच्याबद्दल त्यांच्या इमारतीतील लोकांशी आणि शेजा-यांशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कॅमे-यासमोर येण्यास नकार दिला. त्यांनी आम्हाला सांगितले की, ते जवळपास 15 वर्षांपासून येथे राहत आहेत. पूर्वी लता दीदी त्यांना दिसायच्या, कित्येकदा त्या बाल्कनीत बसलेल्या असायच्या किंवा लिफ्टमधून उतरताना दिसायच्या, पण 2019 मध्ये आजारी पडल्यावर त्या फक्त एक-दोनदाच दिसल्या.
प्रभाकुंज इमारतीतील अजूनही अनेक फ्लॅटमध्ये कोविडचे रुग्ण, घरातच क्वारंटाइन आहेत
इमारतीतील रहिवाशांच्या वाहनचालकांना इमारतीत प्रवेश नाही. कोविड आल्यापासून हा नियम लागू करण्यात आला आहे. शेजाऱ्यांनी सांगितले की, सध्या प्रभाकुंज इमारतीमधील 4 ते 5 घरांमध्ये कोविड रुग्ण आहेत, जे होम क्वारंटाइन आहेत. त्यांच्या घराच्या गेटवर एक चिठ्ठीही आहे. यापूर्वीही 2 ते 3 कुटुंबे पॉझिटिव्ह आली होती, ती आता बरी झाली आहेत. कोविडच्या पहिल्या लाटेत या इमारतीत बरेच रुग्ण समोर आल्यानंतर ती इमारत सील देखील करण्यात आली होती.
पूर्वी दीदींच्या रियाजचा आवाजही ऐकू येत असे
लता दीदींसोबत इमारतीत राहणारी व्यक्ती म्हणाली, 3-4 वर्षांपूर्वी दीदी पहाटे रियाज करायच्या तेव्हा आमच्या घरापर्यंत आवाज ऐकू यायचा. त्यांच्या इतक्या जवळ राहण्याचे भाग्य लाभले यासाठी आम्ही स्वतःला नशीबवान समजतो.
दीदी लवकर ब-या होवो ही प्रार्थना
शेजाऱ्यांनी सांगितले की, ज्या दिवसापासून आम्हाला दीदींच्या प्रकृतीची माहिती मिळाली त्या दिवसापासून आम्ही सर्वजण त्या लवकर बऱ्या होऊन परत याव्यात अशी प्रार्थना करत आहोत. आम्ही त्यांना ब-याच दिवसांपासून पाहिलेले नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.