आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणींमध्ये रमल्या लता मंगेशकर:लता दीदींनी शेअर केली रेडिओवरील पहिल्या गाण्याची आठवण, म्हणाल्या - 'रेडिओवरील माझा आवाज ऐकला तेव्हा ते खूप खुष झाले होते'

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 79 वर्षांपूर्वी लता दीदींनी रेडिओवर दोन नाट्यगीतं गायली होती.

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी आपल्या स्वर्गीय स्वरांमधून चाहत्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला आहे. वयाच्या 91 व्या वर्षी देखील त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. नुकतीच त्यांनी रेडिओवर गायलेल्या आपल्या पहिल्या गाण्याची आठवण चाहत्यांना सांगितली आहे. 79 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी लता दीदींनी रेडिओवर पहिल्यांदा गाणं गायलं होतं.

सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा देताना दीदी म्हणतात, “16 डिसेंबर 1941 साली मी माझ्या कारकिर्दीतील रेडिओवरील पहिलं गाणं गायलं होतं. आज या घटनेला 79 वर्ष पुर्ण झाली आहेत. मी दोन न्याट्यगीत गायली होती. जेव्हा माझ्या वडिलांनी रेडिओवरील माझा आवाज ऐकला तेव्हा ते खूप खुष झाले होते. ही आनंदाची बातमी त्यांनी माझ्या आईला देखील सांगितली होती. आता मला कुठल्याच गोष्टीची चिंता नाही असं म्हणत त्यांनी माझं कौतुक केलं होतं,” असं दीदी म्हणाल्या.

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. तर अनेक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये देखील गायन केले आहे. 2001 साली त्यांना 'भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला. गायनाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना पद्म विभूषण, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके अवार्ड सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे.

बातम्या आणखी आहेत...