आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लायगर' मुव्ही रिव्ह्यू:विजयचा अभिनय दमदार, मात्र भावनाशून्य आणि लॉजिक नसलेला आहे चित्रपट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरी जगन्नाथ दिग्दर्शित बहुचर्चित 'लायगर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून विजय देवरकोंडाने हिंदी पडद्यावर पाऊल ठेवले असून त्याचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. विजयसह राम्या कृष्णन आणि अनन्या पांडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. तर आंतराराष्ट्रीय फायटर माइक टायसन चित्रपटात कॅमिओ भूमिकेत आहे. कसा आहे हा चित्रपट चला जाणून घेऊया...

कथा - चित्रपटाची कथा मुंबईतून सुरु होते. मुळचा बनारसचा असलेला लायगर आणि त्याची आई शिवमणी मुंबईत चहा विकून उदरनिर्वाह करतात. लायगरचे वडील लायन हे बॉक्सर होते. म्हणूनच लायगरने वडिलांपेक्षा मोठा फायटर बनून नाव कमवावे अशी त्याच्या आईची इच्छा असते. यासाठी आई त्याला एमएमए मास्टरकडे नते. पण हलाखीच्या परिस्थितीमुळे लायगरच्या ट्रेनिंगसाठी पैसे भरण्याची ऐपत नसल्याने ती पडेल ते काम करुन त्याला शिकवेल असे सांगते. दरम्यान लायगरच्या फायटिंगमुळे फिदा होऊन तान्या नावाची तरुणी त्याच्या प्रेमात पडते. पण काही कारणास्तव ती नंतर लायगरला नकार देते. पुढे लायगर फायटिंगवर लक्ष केंद्रित करुन आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारतो.

लेखन-दिग्दर्शन - चित्रपटाच्या कथेत काहीच बेस नाही. भावनाशून्य कथानक असल्याने प्रेक्षक चित्रपटाशी जोडला जात नाही. पुरी यांनी टिपिकल साऊथ स्टाइलने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे हिंदी प्रेक्षकांपेक्षा साऊथचे प्रेक्षक या चित्रपटाशी जास्त कनेक्ट होऊ शकतील.

अभिनय - अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर विजय देवरकोंडाने त्याची भूमिका चोख बजावली आहे. अनन्यानेही तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला न्याय दिला आहे. पण राम्या कृष्णन कुठेही गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत वावरणारी महिला दिसली नाही. रोनित रॉय कोचच्या भूमिकेत ठिकठाक वाटला. माइक टायसनची व्यक्तिरेखाही प्रभावी वाटलेली नाही.

निष्कर्ष - चित्रपटात गाण्यांचा उगाच भडीमार करण्यात आला आहे. क्लायमॅक्स बोअर करणारा आहे. इमोशन आणि लॉजिकचा ठावठिकाणाच चित्रपटात नाहीये. चित्रपटाकडून अपेक्षा होत्या, पण प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला आहे. दिव्य मराठीकडून 'लायगर'ला 1.5 स्टार.

बातम्या आणखी आहेत...