आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकी प्रकरण:सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, लूक आउट नोटीस जारी

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. आता या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध LOC (लूकआउट सर्कुलर) जारी केली आहे. हा संशयित आरोपी हरयाणाचा रहिवासी असून तो ब्रिटनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्यात सलमानच्या जवळच्या मित्राला गोल्डी ब्रारच्या नावाने धमकीचा ईमेल आला होता. त्यानुसार, सलमानच्या मित्राने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी प्राथमिक तांत्रिक तपशील तपासल्यानंतर हा ईमेल यूकेहून पाठवल्याचे समोर आले होते. सलमान खानला पाठवलेल्या कथित मेलमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या मेलमध्ये लिहिले होते, "गोल्डी भाई (गोल्डी ब्रार) यांना तुमच्या बॉस सलमान खानशी बोलायचे आहे. लॉरेन्स बिश्नोई यांची मुलाखत तुम्ही पाहिलीच असेल. बघितली नसेल तर बघायला सांगा. प्रकरण बंद करायचे असेल तर प्रकरण मिटवा. समोरासमोर बोलायचे असेल तर सांगा. आता वेळीच कळवले आहे, पुढच्या वेळी फक्त धक्काच मिळेल."

या प्रकरणानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सतत येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानने सुरक्षिततेसाठी नवीन बुलेटप्रूफ कारही खरेदी केली आहे. याशिवाय त्याला मुंबई पोलिसांकडून Y+ सुरक्षादेखील देण्यात आली आहे.

याआधी 'एबीपी'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला उघडपणे धमकी दिली. आमच्या भागात सलमान खानने काळवीट मारल्याचे लॉरेन्सने म्हटले होते. त्याला आमच्या बिकानेरच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल. जर त्याने माफी मागितली नाही तर मी त्याला योग्य उत्तर देईन.

सलमानचे चित्रपट
सलमान खानचा नुकताच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात सलमानसह पूजा हेगडे शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'किक-2' तसेच 'नो एन्ट्री'च्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असेही म्हटले जात आहे. तसेच यशराज फिल्म्सने शाहरुख आणि सलमानची मुख्य भूमिका असलेल्या 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटाचीदेखील घोषणा केली आहे.