आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे 'धकधक गर्ल':माधुरीला अभिनेत्री नव्हे व्हायचे होते सूक्ष्मजीवतज्ज्ञ, सुभाष घईंनी दिलेला शब्द पाळला आणि 9 फ्लॉप सिनेमांनंतर माधुरी दीक्षित बनली सुपरस्टार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा माधुरीचा मानस होता.

बॉलिवूडमध्ये मिलियन डॉलर स्माईलची मालकीण माधुरी दीक्षित आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. डिव्हाइन चाइल्ड हायस्कूलमध्ये तिने आपले प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती कथ्थक नृत्यांगना आहे. तिने सुमारे 8 वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते. दोन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडवर माधुरीने अधिराज्य गाजवले.

फ्लॉप चित्रपटाने झाली करिअरची सुरुवात

माधुरीला बॉलिवूडची डान्सिंग क्वीन म्हणून देखील संबोधले जाते. तिच्या प्रत्येक सिनेमात तिचा एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स हा ठरलेलाच असतो. 1984 साली 'अबोध' या सिनेमाद्वारे माधुरीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मात्र या सिनेमाद्वारे ती प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरली होती. त्यानंतर माधुरीने 'आवारा बाप', 'स्वाती' या फ्लॉप सिनेमांमध्येही काम केले होते.

सुभाष घईंची पडली माधुरीवर नजर

अखेर एक दिवस शोमॅन सुभाष घई यांची नजर माधुरीवर पडली. त्यांनी 'कर्मा' सिनेमातील एका डान्स सिक्वेन्ससाठी माधुरीची निवड केली. मात्र नंतर हा डान्स सिक्वेन्सच सिनेमातून काढून टाकण्यात आला होता. पण घई यांनी माधुरीला शब्द दिला की, ते आपल्या दुस-या सिनेमात तिला एक दमदार भूमिका देतील. यासोबतच त्यांनी माधुरीकडे एक अट ठेवली. सुभाष घई यांनी माधुरीला सांगितले की, छोट्या-मोठ्या भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून स्वतःची इमेज तयार करु नकोस. माधुरीनेही त्यांचे म्हणणे ऐकले आणि सुभाष घईंनी त्यांच्या 'उत्तर-दक्षिण' या सिनेमात माधुरीला संधी दिली.खरं तर हा सिनेमासुद्धा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

'तेजाब'द्वारे मिळाला मोठा ब्रेक

'दयावान' आणि 'वर्दी' यांसारख्या सिनेमांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर सुभाष घईंनी तिला मोठा ब्रेक दिला. 1988 साली माधुरी सुभाष घईंच्या 'तेजाब' सिनेमात झळकली. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. या सिनेमाद्वारे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली; तसेच तिला तिचे पहिले फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले. या सिनेमातील 'एक दो तीन...' या गाण्याने माधुरीने सगळ्यांचे होश उडवले आणि ती बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली.

'तेजाब' सिनेमाने गोल्डन ज्युबली साजरी केली. हा 1988 सालचा सुपरहिट सिनेमा होता.1990 मध्ये तिने इंद्रकुमार याच्या 'दिल' सिनेमात आमिर खान याच्या नायिकेची भूमिका साकारली. त्या वर्षी हा सिनेमा तिकीट खिडकीवरचा सर्वांत यशस्वी सिनेमा ठरला. या सिनेमातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

'दिल' सिनेमाच्या यशानंतर माधुरीच्या हिट सिनेमांची जणू काही मालिकाच सुरू झाली. 'साजन' (1991), 'बेटा' (1992 ),'खलनायक' (1993), 'हम आप के है कौन' (1994), 'राजा' (1995) असे अनेक लोकप्रिय सिनेमे तिने दिले. 'बेटा' सिनेमामधील अभिनयासाठी तिला तिचा दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

'हम आप के है कौन' या सिनेमाने विक्रमी उत्पन्न कमवीत हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या सिनेमाने भारतात 65 कोटी रुपयांहून अधिक, तर परदेशांत 15 कोटी रुपयांची कमाई केली. या सिनेमातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या 'अंजाम' या सिनेमातील भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. 'अंजाम' सिनेमामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा मिळाली.

माधुरीच्या चाहत्यांची यादी लांबलचक आहे. ती तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली. प्रसिद्ध पेंटर दिवंगत एमएफ हुसैनसुद्धा माधुरीचे मोठे चाहते होते. माधुरीच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याची कबूली त्यांनी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, ते सुरुवातीला माधुरीचे पेंटिंग बनवून आनंदीत व्हायचे. ते माधुरीला साक्षात सरस्वती म्हणायचे. त्यांच्या मनात भीती होती की, माधुरीला भेटल्यानंतर ते आनंदाचे वेडे होतील. हुसैन यांनी माधुरीबरोबर मिळून 'गजगामिनी' हा सिनेमा बनवला. सिनेमाला व्यावसायिक यश मिळू शकले नाही, मात्र समीक्षकांच्या पसंतीची पावती या सिनेमाला मिळाली.

1996 साली रिलीज झालेला माधुरीचा 'प्रेमग्रंथ' हा सिनेमा आपटला. मात्र समीक्षकांनी माधुरीच्या अभिनयाचे कौतुक केले. यानंतर एका मागोमाग एक माधुरीचे सिनेमे फ्लॉप होऊ लागले. मात्र तरीदेखील हिंमत न हारता माधुरीने पुन्हा जोमाने कामाला लागली.

शाहरुख खानबरोबरचा 'दिल तो पागल है' या सिनेमाद्वारे माधुरी परतली आणि पुन्हा बॉलिवूडवर आपली जादू चालवली. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आणि या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या सिनेमाने व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांची प्रशस्तीही मिळवली.

प्रकाश झा यांच्या 'मृत्युदंड' या सिनेमातही तिने अभिनय केला. या सिनेमाने जिनीव्हा तसेच बँकॉक येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचे पारितोषिक पटकावले. या सिनेमातील अभिनयासाठी तिला स्टार स्क्रिन आणि सॅन्सूई अवॉर्ड्स मिळाले. त्यानंतर माधुरी संजय लीला भन्साळींच्या 'देवदास' सिनेमात दिसली. हा सिनेमा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला. या सिनेमासाठी माधुरीला सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

एक दो तीन (तेजाब), हम को आज कल है (सैलाब), बडा दुख दिन्हा (राम लखन), धक धक (बेटा), चने के खेतमे (अंजाम), दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन ), चोली के पीछे (खलनायक), अखिया मिलाऊ (राजा), मेरा पिया घर आया (याराना), के सेरा सेरा (पुकार), मार डाला (देवदास) या गाण्यांमधील माधुरीने केलेल्या नृत्यांची प्रशंसा झाली.

बातम्या आणखी आहेत...