आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची सीबीआय चौकशीची मागणी, अनिल देशमुख यांना सोपवले पत्र; गृहमंत्र्यांनी यापूर्वी सीबीआय चौकशीला दिला होता नकार

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, यासाठी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची घेतली भेट
  • विशेष म्हणजे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळली होती सीबीआय चौकशीची मागणी
Advertisement
Advertisement

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पार्थ यांनी सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी दिले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सुशांत प्रकरणात विविध स्तरातून सीबीआय चौकशीची मागणी होत असताना गृहमंत्र्यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. सोबतच, त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास व्यक्त केला होता. आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या मुलानेच ही मागणी केल्याने गृहमंत्री काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • मुंबई पोलिसांचा निष्पक्षतेवर पूर्ण विश्वास आहे

पार्थ पवार यांनी गृहमंत्र्यांना सोपवलेल्या पत्रात म्हटले की, "मुंबई पोलिसांच्या निष्पक्षतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, परंतु केंद्रीय अन्वेषण विभागाला या चौकशी जबाबदारी देऊन या प्रकरणात योग्य न्याय देऊ शकतो."

  • सुशांतच्या मृत्यूची योग्य चौकशी झाली पाहिजे

पार्थ पवार यांनी या भेटीत त्यांनी सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती केली आहे. 'सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी', अशा आशयाचे ट्विट करुन पार्थ यांनी या भेटीबाबत माहिती दिली आहे.

पार्थ पवार यांचे ट्विट...

  • गृहमंत्र्यांनी सीबीआयच्या तपासाला स्पष्ट नकार दिला होता

यापूर्वी 17 जुलै रोजी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते की, "मुंबई पोलिसांकडून अभिनेत्याच्या मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे आणि याप्रकरणी अनेक जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. ते म्हणाले की, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची गरज नाही. आमचे पोलिस अधिकारी योग्य दिशेने या प्रकरणाचा तपास करू शकण्यात सक्षम आहेत, असे देशमुख म्हणाले होते.

आतापर्यंत याप्रकरणात काय-काय झाले?

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या केल्याचे पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच, पोलिसांच्या तपासणीत तो डिप्रेशनमध्ये असल्याचेही समोर आले आहे. सुशांत डिप्रेशनमध्ये का होता? आणि त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी 38 जणांची चौकशी केली. यात ब-याच मोठ्या नावांचा समावेश आहे -

  • 27 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांची दोन तास चौकशी केली. या चौकशीत त्यांनी रिया आणि सुशांतच्या नात्याविषयी भट्ट यांना प्रश्न विचारले. सोबतच त्यांच्या आगामी सडक 2 या चित्रपटाबद्दलही त्यांना विचारपुस करण्यात आली. या चित्रपटासाठी सुशांतला विचारणा झाली होती, मात्र नंतर आदित्य रॉय कपूरचे नाव अंतिम करण्यात आले होते.
  • याप्रकरणी आता धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांचीही मुंबई पोलिस चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे. करण जोहरऐवजी अपूर्ण मेहताची चौकशी होत असल्याने अभिनेत्री कंगना रनोटने संताप व्यक्त केला आहे. करण जोहरला चौकशीसाठी का बोलावले जात नाही? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.
  • यामध्ये सुशांतवर उपचार करणा-या चारही डॉक्टरांव्यतिरिक्त, चित्रपट समीक्षक राजीव मसंद, यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा, सुशांतचे घरातील कर्मचारी, मॅनेजर, पीआर टीम, एक्स मॅनेजर, मित्र, मैत्रिणी, सह-कलाकार आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. यशराज फिल्म्सचे काही माजी अधिकारी आणि कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनीही आपला जबाब नोंदवला आहे. आणखी काही अधिका-यांची चौकशी केली जाईल.
  • 23 जुलै रोजी पोलिसांनी सुशांतचे मित्र आणि फिल्ममेकर रुमी जाफरी यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावले होते. जाफरी यांनी पोलिसांना सांगितल्यानुसार, सुशांत सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे त्यांना ठाऊक होते. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीकडुन त्यांना याविषयी समजले होते.
  • 21 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी चित्रपट समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार राजीव मसंद यांची आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. त्यांच्यावर कुणाच्या तरी सांगण्यावरुन सुशांतविरोधात निगेटिव्ह ब्लाइंड आर्टिकल लिहिल्याचा आणि त्याच्या चित्रपटांना निगेटिव्ह रिव्ह्यू देत असल्याचा आरोप आहे.
  • यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माता आदित्य चोप्रा यांची मुंबई पोलिसांनी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये चौकशी केली. वास्तविक सुशांतने आदित्य चोप्रासह 'शुद्ध देसी रोमान्स', 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' आणि 'पानी' या तीन सिनेमांसाठी करार केला होता. पण 'पानी' हा चित्रपट तयार होऊ शकला नाही. याबद्दल आदित्य यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यात त्यांनी सांगितले की, दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासोबतच्या क्रिएटिव्ह डिफरन्समुळे हा चित्रपट बनू शकला नाही.
  • याशिवाय फिल्ममेकर संजय लीला भन्साळींचीही चौकशी झाली आहे. 'पानी' या चित्रपटासाठी आपले चार चित्रपट सुशांतने सोडले होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, "मी सुशांतला ऑफर केलेले चार चित्रपट म्हणजे 'गोलियों की रासलीला रामलीला', 'बाजीराव-मस्तानी', 'रीड' (जो बनला नाही) आणि 'पद्मावत'. सुशांत 'रामलीला'च्या वेळी YRFसोबत करारात होता. आणि 'पानी'साठी कार्यशाळा घेत होता. त्याचप्रमाणे मी सुशांतला 'बाजीराव-मस्तानी', 'रीड' आणि 'पद्मावत' (शाहिद कपूरची भूमिका) साठी भेटलो होतो. पण त्याने आपल्या सर्व तारखा 'पानी' या चित्रपटासाठी दिल्या होत्या.
  • चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी ईमेलद्वारे आपला जबाब पोलिसांना पाठवला आहे. शेखर कपूर यांनी सांगितले की, पानी हा चित्रपट बंद झाल्याने सुशांतला मोठा धक्का बसला होता. तो खचून डिप्रेशनमध्ये गेला होता. कारण या चित्रपटासाठी त्याने आपली बरीच वर्षे दिली होती. याकाळात त्याने अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या. शेखर कपूर यांना चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्येही बोलावले जाऊ शकते.
  • अभिनेत्री कंगना रनोटचीही पोलिस चौकशी करणार आहे. सुशांतला बॉलिवूडच्या नेपोटिज्मचा मोठा फटका बसल्याचा आरोप कंगनाने उघडपणे केला आहे, तर शेखर कपूर यांनीहीकाहीसे असेच संकेत दिले होते. कंगनाने सांगितल्यानुसार, तिला पोलिसांकडून चौकशीसाठी समन मिळाले आहे. पण सध्या ती मनालीत असल्याने चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही.

दरम्यान, खासदार रुपा गांगुली, अभिनेता शेखर सुमन, टीव्ही अभिनेता तरुण खन्नासह अनेक जणांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. वकील, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक ईशकरण सिंह भंडारी यांना या प्रकरणातील तथ्यांची चौकशी करत असून सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करणे योग्य आहे की नाही हे तपासत आहेत.

Advertisement
0