आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महेश कोठारे बर्थडे स्पेशल:अवघा 1 रुपया देऊन महेश यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंना 'धुमधडाका'साठी केले होते साईन, 'या' कारणामुळे गमवावे लागले होते स्वतःचे घर

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महेश कोठारे आज वयाच्या 67 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.

भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा आज वाढदिवस असून ते वयाच्या 67 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. महेश कोठारे यांना घरातून अभिनयाचे बाळकडू मिळाले आहेत. त्यांचे वडील अंबर कोठारे हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. तर आईसुद्धा या अभिनेत्री आहेत. महेश कोठारे यांनी ‘छोटा जवान’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. ‘राजा और रंक’, ‘मेरे लाल’ या चित्रपटांमध्ये ते बालकलाकाराच्या रुपात झळकले. ‘शुभमंगल सावधान’, ‘झपाटलेला’, ‘धूमधडाका’, ‘माझा छकुला’, ‘झपाटलेला 2’, ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी ‘मासूम’, ‘लो मैं आ गया’ आणि ‘खिलौना बना खलनायक’ या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

मराठी चित्रपटसृष्टीचे आघाडीचे अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून त्यांच्या नावाची गणना होते. पण हे यश त्यांना सहजासहजी मिळालेल नाही. आईवडील दोघेही कलाक्षेत्रात असूनदेखील या क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करायला त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. आज महेश कोठारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला सांगतोय, त्यांच्या या संघर्षाविषयी...

  • वकील आहेत महेश कोठारे

महेश कोठारे यांचे आईवडील दोघेही कलाक्षेत्रातील असल्याने ते चित्रपटांकडे वळले. छोटा जवान, राजा और रंक मधून लहानपणीच अभिनयाला त्यांनी यशस्वी सुरुवात केली होती. परंतु मोठेपणी हिरो म्हणून माझे चित्रपट एकापाठोपाठ आपटत गेले. अशा काळात वकिलीचे शिक्षण झाले असल्याने मी काही काळ वकिलीही केली, पण अपयशाने हार मानायची नाही, असा माझा स्वभावच होता, असे महेश कोठारे एका मुलाखतीत म्हणाले होते.

  • चित्रपट बनवण्यासाठी मित्राकडून उसणे घेतले होते पैसे

हीरो म्हणून फारसे यश मिळत नसल्याचे बघून महेश कोठारे यांनी स्वतः चित्रपट बनवायचे ठरवले. पण चित्रपट बनवण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नव्हते. म्हणून त्यांनी त्यांच्या एका मित्राकडून 20 हजार रुपये उसने घेऊन एका निर्मात्याकडून 'प्यार किये जा' या हिंदी चित्रपटाचे हक्क विकत घेतले आणि त्याचा मराठीत रिमेक बनवला. हा चित्रपट होता धूमधडाका. हा चित्रपट साकारल्यावर मराठी चित्रपटसृष्टीत एकच धूमधडाका उडाला आणि महेश कोठारे दिग्दर्शक म्हणून नावारुपास आले.

  • हिंदीत निर्माता म्हणून ठरले अपयशी

महेश कोठारे यांनी हिंदीत 'मासूम' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 'लो मैं आ गया' या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. पण दुर्दैवाने हा चित्रपट सणकून आपटला. या चित्रपटाच्या अपयशाने मी आर्थिकदृष्ट्या 20 वर्षे मागे गेलो. कर्जाची परतफेड, घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत करावी लागली होती, असे महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

  • नुकसानामुळे गमवावे लागले होते घर

जुन्या आठवणींना उजाळा देताना महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत खूप नुकसान सहन करावे लागले होते. एकवेळ अशी आली होती की, कोल्हापूरवरून चित्रपटाच्या शूटिंगवरून मुंबईला परतताना माझ्याजवळ स्वत:चे घरही उरले नव्हते. पछाडलेला, खबरदारच्या यशानंतर हळूहळू गाडी रुळावर आली होती.

  • लक्ष्मीकांत यांनी अवघ्या 1 रुपयात साइन केला होता महेश कोठारेंचा चित्रपट

‘धुमधडाका’ चित्रपटासाठी महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना केवळ 1 रुपया देऊन साईन केले होते. महेश कोठारे यांनी स्वतः एका मुलाखतीत का किस्सा सांगितला होता. केवळ एक रुपया देऊन मी लक्ष्याला आपल्या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका ऑफर केली होती. एवढेच नाही तर लक्ष्याने देखील माझी ऑफर आनंदाने स्वीकारली, असे महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील लक्ष्मीकांत सोबतच्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलताना महेश कोठारे म्हणाले होते, "आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू यांच्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकात माझे आई-वडील दोघंही काम करत होते. माझी आई या नाटकामध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेत होती. तर वडील एका सावंत नावाच्या सीआयडी अधिकाऱ्याची भूमिका साकरत होते. बबन प्रभूंच्या निधनानंतर आत्माराम यांनी त्यांच्या स्मरणार्थ नव्याने नाटक करायचे ठरविले. या नव्याने आलेल्या नाटकात बबन प्रभूंची भूमिका त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे करत होता. नाटकाची तालीम पाहताना लक्ष्याच्या अभिनयाने मला प्रभावित केले. बबन प्रभूंची भूमिका त्याने तंतोतंत साकारली होती. बबन प्रभू यांच्या अभिनयाच्या इतके जवळ त्यावेळी कोणीच गेले नव्हते. यावेळी माझ्या डोक्यात ‘धुमधडाका’ या चित्रपटाचा विषय सुरु होता. मी त्याच क्षणी एक रुपया देऊन लक्ष्याला ‘धुमधडाका’ या चित्रपटासाठी लक्ष्याला साइन करुन घेतले."

बातम्या आणखी आहेत...