आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीतकार 'राम लक्ष्मण' फेम 'लक्ष्मण' कालवश:'हम आपके है कौन'सह गाजलेल्या चित्रपटांचे संगीतकार विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांचे निधन

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांनी नागपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला

'मैंने प्यार किया', 'हम आपके हैं कौन' आणि 'हम साथ साथ हैं'सह 90 हून अधिक चित्रपटांना संगीतबद्ध करणारे संगीतकार राम लक्ष्मण फेम लक्ष्मण यांचे निधन झाले आहे. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सूना, नातवंडे, दोन मुली असा आप्त परिवार आहे.

शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी नागपुरात अखेरचा श्वास घेतला. नागपूर येथे ते त्यांचा मुलगा अमरसोबत राहात होते. टेक्नोक्रॅट पवन झा यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी दिली. "संगीत क्षेत्रातील आणखी एक मोठी हानी. संगीत दिग्दर्शक राम लक्ष्मण यांचे काल रात्री नागपुरात निधन झाले. 80 आणि 90 च्या दशकात त्यांनी 'मैंने प्यार किया', "हम आपके हैं कौन 'सारख्या चित्रपटात संगीत दिले होते,' असे पवन झा यांनी म्हटले आहे.

दादा कोंडके यांनी दिले होते राम लक्ष्मण हे नाव
राम लक्ष्मण यांचे खरे नाव विजय काशीनाथ पाटील होते. त्यांनी त्यांचे थोरले बंधू सुरेंद्र पाटील यांच्यासह 1975 मध्ये म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र पाटील यांना त्यांच्या चित्रपटाला संगीत देण्याची ऑफर दिली. दादा कोंडके यांनीच या दोघांना राम लक्ष्मण हे नाव दिले. सुरेंद्र पाटील यांना राम आणि विजय पाटील लक्ष्मण या नावाने ओळखले जाऊ लागले. मात्र 1976 मध्ये 'एजेंट विनोद' या चित्रपटाला संगीत दिल्यानंतर सुरेंद्र पाटील यांचे किडनीच्या आजाराने निधन झाले. सुरेंद्र यांच्या पश्च्यात केवळ लक्ष्मण या नावाने संगीत न देण्याचा निर्णय विजय यांनी घेतला आणि त्यांनी राम-लक्ष्मण हेच नाव पुढे कायम ठेवले. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल 92 चित्रपट आहेत. विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांनी हिंदीच नव्हे तर मराठी चित्रपटांनाही संगीत दिले. यात दादा कोंडके यांच्या गाजलेल्या पांडू हवालदार (1975) या चित्रपटाचा समावेश आहे. ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ हे त्यांनी संगीतबद्ध केलेले काही मराठी चित्रपट आहेत.

'मैनें प्यार किया'द्वारे मिळाला होता मोठा ब्रेक
राम लक्ष्मण यांना सूरज बडजात्या यांच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाद्वारे मोठा ब्रेक मिळा होताला. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सोबतच हा पहिला असा चित्रपट होता, ज्याने संगीतातील तीन प्रमुख श्रेणीतील म्हणजे सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक सिंगर आणि सर्वोत्कृष्ट गीत हे पुरस्कार आपल्या नावी केले होते. याच चित्रपटाने फिल्मफेअरमध्ये एकुण 11 नॉमिनेशनपैकी तब्बल 6 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले होते. यात संगीतातील तीन पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट मेल डेब्यू, सर्वोत्कृष्ट फिमेल डेब्यूचा समावेश होता. त्यानंतरचे ‘हम आप के है कौन’ व ‘हम साथ साथ है’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले.

कादर ऑर्केस्ट्रातून केली होती करिअरची सुरुवात

विजय पाटील यांची सुरूवात नागपुरातील गाजलेल्या कादर ऑर्केस्ट्रातून झाली. एम. ए. कादर हे त्यांचे बालमित्र. बाबा स्वामी, एम. ए. कादर व विजय पाटील हे तिघे ऑर्केस्ट्रात गायचे. काही वर्षांनी ते मुंबईला निघून गेले. त्यांच्या जाण्याने एक हृदयस्थ मित्र गमावला, अशी शोकसंवेदना कादर यांनी व्यक्त केली. एकदा झालेली मैत्री ते शेवटपर्यत जपत. त्यांनीच मला अंतिम न्याय व फौज या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. कादर संगीत अकादमीचे उद्घाटन आम्ही त्यांच्या हस्ते केले होते, अशी आठवण कादर यांनी सांगितली.

राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेले काही चित्रपट

  • एजंट विनोद (1976)
  • मैंने प्यार किया (1989)
  • 100 डेज (1991)
  • हम आपके हैं कौन (1994)
  • हम साथ-साथ हैं (1999)
बातम्या आणखी आहेत...