आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 28 एप्रिल 2016 रोजी सोलापूरमध्ये छापा टाकून सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. त्यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी प्रमुख आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी ममता कुलकर्णीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कागदपत्रे गहाळ
मात्र ममता कुलकर्णी हिने दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित कागदपत्रे गहाळ झाली आहेत. ती सापडत नसल्याने याचिकेअभावी तीन वेळा सुनावणी होऊ शकली नसल्याबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. तसेच ही कागदपत्रे सापडत नसल्यास संबंधित पक्षकारांच्या मदतीने ती पुन्हा तयार करावीत आणि पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयासमोर सादर करावीत, असे आदेश न्यायालयाने निबंधक कार्यालयाला दिले आहेत.
या प्रकरणातील सहआरोपीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी स्वत:ला दूर केले होते, ही बाब प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायमूर्ती डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ममता कुलकर्णी हिच्या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून स्वत:ला दूर ठेवत असल्याचे स्पष्ट केले.
हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी ममताने वकील माधव थोरात यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायमूर्ती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका तिसऱ्यांदा सुनावणीसाठी आली. त्या वेळी ममता कुलकर्णी हिने दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित कागदपत्रे अद्यापही सापडलेली नसून त्याचा शोध सुरू असल्याचे न्यायालयाच्या निबंधक कार्यालयातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.