आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनमोहन देसाई यांना बॉलिवूड मसाला चित्रपटांचे मास्टर म्हटले जाते. आज त्यांची 29 वी पुण्यतिथी आहे. लॉस्ट अँड फाऊंड या थीमवर त्यांनी इतके चित्रपट बनवले की, तो बॉलिवूडचा एक नवीन ट्रेंड बनला. 'कुली', 'मर्द', 'अमर अकबर अँथनी'पासून 'तुफान'पर्यंत, त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये कौटुंबिक वियोग आणि पुनर्मिलनाच्या कथा होत्या.
देसाई यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत सलग 7 सुपरहिट चित्रपट बनवले, ज्यामुळे बिग बींच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. मनमोहन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 23 चित्रपट केले, त्यापैकी 15 चित्रपट प्रचंड गाजले. खुद्द मनमोहन देसाईंच्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी होती. वडील किकूभाई देसाई हे चित्रपट निर्माते होते, पण मनमोहन फक्त 4 वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले. त्यांनी बरेच कर्ज घेतले होते. ज्याची परतफेड करण्यासाठी सर्व मालमत्ता विकली गेली.
मनमोहन देसाई वयाच्या 20 व्या वर्षी चित्रपट दिग्दर्शक बनले. राज कपूर आणि नूतन यांना घेऊन एक चित्रपटही बनवला होता, ज्याचे नाव होते 'छलिया'. देसाई हे एकमेव दिग्दर्शक आहेत ज्यांनी बॅक टू बॅक 11 ज्युबिली हिट दिले आहेत, त्यापैकी 4 सुवर्ण महोत्सवी आणि 7 रौप्य महोत्सवी ठरले होते.
देसाई यांच्या पत्नी प्रभा यांचे कमी वयातच निधन झाले. काही वर्षे एकटे राहिल्यानंतर ते अभिनेत्री नंदा यांच्या प्रेमात पडले, त्यानंतर त्यांचा साखरपुडादेखील झाला. पण लग्नाआधीच देसाई यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर नंदा यांनीही आयुष्यभर लग्न केले नाही. त्यांनी मनमोहन देसाई यांच्या विधवेच्या रुपात जीवन व्यतित केले.
आज मनमोहन देसाई यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही न ऐकलेल्या गोष्टी वाचा-
वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांना गमावले
मनमोहन देसाई यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1937 रोजी मुंबईत झाला, मात्र त्यांचे पूर्वज गुजरातचे होते. त्यांचे वडील किकूभाई देसाई देखील एक चित्रपट निर्माता होते आणि 1931 ते 1941 पर्यंत ते पॅरामाउंट फिल्म स्टुडिओचे मालक होते. त्यांनी बहुतेक अॅक्शन चित्रपट केले.
मनमोहन देसाई 4 वर्षांचे असताना त्यांचे वडील किकूभाई यांचे निधन झाले. ते अनेक चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते, यासाठी त्यांनी बाजारातून भरपूर कर्ज घेतले होते. पैसे फेडता येत नसल्याने व्याज वाढत होते. याच तणावात त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असे सांगितले जाते.
कर्ज फेडण्यासाठी आईने मालमत्ता विकली
एक काळ असा होता की, देसाई कुटुंबाचे चित्रपटसृष्टीत खूप नाव होते, पण किकूभाईंच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. यानंतर मनमोहन देसाई यांच्या आईने कर्ज फेडण्यासाठी सर्व मालमत्ता विकल्या. नंतर कुटुंबाने किकूभाईंचे छोट्याशा कार्यालयाला आपले घर बनवले.
भाऊ सुभाषमुळे चित्रपटसृष्टीत काम मिळाले
मनमोहन देसाई यांचे मोठे बंधू सुभाष हे देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. मनमोहन देसाई यांचे नाव अॅक्शनपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनीच सुचवले होते. त्यानंतर मनमोहन देसाई यांनी दीर्घकाळ सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.
राज कपूर आणि नूतनसोबत चित्रपट करण्याचे स्वप्न होते
एके दिवशी मनमोहन देसाई यांच्या भावाने त्यांना विचारले की, तुला कोणत्या प्रकारचे चित्रपट करायचे आहेत आणि त्या चित्रपटात कुणी काम करावे असे वाटते? यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, मला या चित्रपटात राज कपूर आणि नूतनने भूमिका साकारावी असे वाटते.
वयाच्या 20 व्या वर्षी राज कपूर आणि नूतनसोबत चित्रपट केला
जेव्हा मनमोहन यांचे भाऊ सुभाष यांच्याकडून राज कपूर यांना याची माहिती मिळाली, तेव्हा ते म्हणाले - हे कसे होऊ शकते. मनमोहन आता फक्त 20 वर्षांचा आहे. तो चित्रपट कसा बनवू शकतो? यावर सुभाष देसाई म्हणाले होते - राज साहेब, तुम्ही जेव्हा पहिला चित्रपट केला होता तेव्हा तुम्हीही त्याच वयाचे होते. जर तुम्ही चित्रपट बनवू शकता तर माझा भाऊ चित्रपट का बनवू शकत नाही.
राज कपूर यांना हे खूप आवडले, पण त्यांनी एक अट घातली की, जर मनमोहन यांनी चित्रपटातील गाणी पडद्यावर बरोबर मांडली तरच ते चित्रपट पूर्ण करतील, अन्यथा ते चित्रपट सोडतील. त्या चित्रपटाचे नाव होते छलिया. या चित्रपटातील "डम-डम डिगा-डिगा" हे गाणे मनमोहन देसाई यांनी सुंदर चित्रित केले. त्यानंतर राज कपूर यांनी चित्रपट पूर्ण केला.
खऱ्या आयुष्यात त्यांचे नायक जसे चित्रपटात लग्न करत असत तसेच लग्न केले
मनमोहन देसाई यांचे त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या प्रभा या मुलीवर प्रेम होते. रोज सकाळी प्रभा त्यांच्या घरातून निघायच्या, त्याच वेळी तेदेखील घरातून निघायचे. बसमध्येही ते त्यांच्या मागच्या सीटवर बसायचे, पण प्रेम व्यक्त करायला घाबरायचे.
एके दिवशी त्यांनी हिंमत एकवटली आणि प्रभाला म्हणाले, मला तू आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे.
प्रभा यांच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता, पण प्रभा आपल्या निर्णयावर ठाम होत्या. अखेर कुटुंबाला प्रभा यांचे म्हणणे ऐकावे लागले आणि त्यांनी दोघांचे लग्न लावून दिले. दोघांना एक मुलगा असून केतन देसाई हे त्याचे नाव आहे. तोदेखील एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहे.
चित्रपट पुन्हा शूट करण्यासाठी स्वतःचे मानधन वापरले
मनमोहन देसाई यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली की, ते दोन वर्षे बेरोजगार राहिले. त्यानंतर त्यांनी शम्मी कपूर यांच्या सांगण्यावरून एक अपूर्ण चित्रपट पूर्ण केला, जो दिग्दर्शकाने अर्धवट सोडला होता. मनमोहन देसाईंनी दिवसाला 500 रुपये मानधन घेऊन चित्रपट पूर्ण केला.
जेव्हा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होणार होते, तेव्हा ते म्हणाले - माझ्या फीच्या पैशातून आधीच्या दिग्दर्शकाने शूट केलेले सीन देखील पुन्हा शूट केले पाहिजेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही, पण यातून मनमोहन देसाई यांच्या कारकिर्दीला पुन्हा सुरुवात झाली. 'बदतमीज' असे या चित्रपटाचे नाव होते.
60 च्या दशकात बहुतेक चित्रपटांचे चित्रीकरण फक्त स्टुडिओमध्येच व्हायचे. मनमोहन देसाई यांना 'ब्लफ मास्टर' चित्रपटातील 'गोविंद आला रे' हे गाणे खऱ्या लोकेशनवर शूट करायचे होते. त्यानंतर त्यांनी पोलिस आणि स्थानिक गुंडांच्या मदतीने या गाण्याचे शूटिंग पूर्ण केले. अशा प्रकारे, खऱ्या लोकेशनवर शूट केलेले हे पहिले बॉलिवूड गाणे ठरले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला, पण हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडले.
'अमर अकबर अँथनी' हा चित्रपट बनवण्याची कल्पना वर्तमानपत्र वाचून सुचली
त्यानंतर 1977 मध्ये 'अमर अकबर अँथनी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सिने इतिहासातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची कल्पना मनमोहन यांना एके दिवशी वर्तमानपत्रातील बातमीवरून सुचली. एका व्यक्तीने आपल्या तीन मुलांना उद्यानात सोडून आत्महत्या केल्याचे ते वृत्त होते. या बातमीचा ते दिवसभर विचार करत राहिले.
संध्याकाळी त्यांनी लेखक प्रयाग राज यांची भेट घेतली. प्रयाग राज यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या होत्या. त्यांनी प्रयाग राजला संपूर्ण बातमी सांगितली, मग प्रयाग राज म्हणाले - विचार करा जर त्या व्यक्तीने आत्महत्या केली नसती आणि तो उद्यानात परतला असता तर त्याची काय अवस्था झाली असती. यानंतर प्रयाग राज कथा डेव्हलप करताना पुढे म्हणाले - जर वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी त्या तीन मुलांना घेतले तर पुढे कथा कशी असेल.
हे करत असताना दोघेही या बातमीवर चर्चा करत गेले आणि यातच अर्धी रात्र निघून गेली. दोघे दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटले आणि कथा पुढे नेली. मनमोहन देसाई यांच्या पत्नीनेही या चित्रपटाच्या कथेत त्यांना सूचना दिल्या होत्या. अखेर या बातमीवर चित्रपट तयार झाला आणि त्याने यशाचा झेंडा रोवला.
ऋषी कपूर यांच्यावर चिडले होते, तरीही त्यांना चित्रपट करण्यासाठी राजी केले
मनमोहन देसाई यांना 'अमर अकबर अँथनी' या चित्रपटात अकबरच्या भूमिकेसाठी ऋषी कपूरला कास्ट करायचे होते. या भूमिकेसाठी त्यांनी ऋषी कपूर यांच्याशी संपर्क साधला असता ते राजस्थानमध्ये 'लैला मजनू' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे कळले, दोघांचे फोनवर बोलणे झाले.
मनमोहन देसाई म्हणाले की, मी एक चित्रपट बनवत आहे, ज्यामध्ये तू अकबराची भूमिका करावी असे मला वाटते. हे ऐकून ऋषी कपूर यांनी नकार दिला. त्याचे कारण म्हणजे त्यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर याआधीच अकबराच्या भूमिकेत दिसले होते. अकबराची भूमिका केली तर आपली तुलना आजोबा पृथ्वीराज यांच्याशी होईल, असे त्यांना वाटले होते.
मनमोहन देसाई यांना याचा खूप राग आला. पण ते ऋषी कपूर यांची समजूत घालत राहिले. त्यांनी ऋषी कपूर यांना पटवून दिले की, मला मुघल सम्राट अकबरावर चित्रपट करायचा नाही. तेव्हा ऋषी कपूर यांनी ही भूमिका साकारण्यास होकार दिला.
'अमर अकबर अँथनी' चित्रपटातील एक दृश्य पाहून अमेरिकन लेखिका देसाईंना भेटायला भारतात आल्या
मनमोहन देसाई यांचा मुलगा केतनने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत 'अमर अकबर अँथनी' चित्रपटातील एका दृश्याशी संबंधित एक मजेदार किस्सा शेअर केला होता. केतनने सांगितले की, चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये तिन्ही मुलांचे रक्त आईला देण्यात आले होते.
हे दृश्य पाहून कोनी हॅम या अमेरिकन लेखिका मनमोहन देसाईंना भेटायला भारतात आल्या होत्या. त्या म्हणाला की, कोणीतरी इतक्या निराधार गोष्टी पडद्यावर इतक्या नेत्रदीपक पद्धतीने कसे दाखवू शकते.
जेव्हा कोनी हॅम मनमोहन देसाईंना भेटल्या तेव्हा त्यांनी त्यांना सेट दाखवला. त्यांना शूटिंगच्या ठिकाणी नेले आणि ते सीन कसे शूट करतात, हे देखील सांगितले. मनमोहन देसाईंची काम करण्याची पद्धत त्यांना इतकी आवडली की त्यांनी मनमोहन देसाईंवर Enchantment of the Mind: Manmohan Desai’s Films हे पुस्तक लिहिले.
गाणे सुरू होताच प्रेक्षक थिएटरबाहेर गेल्याने मनमोहन यांनी चित्रपट पाहणे बंद केले
मनमोहन देसाई यांना त्यांच्या चित्रपटातील गाणी खूप आवडायची. एकदा ते थिएटरमध्ये त्यांचा एक चित्रपट पाहायला गेले होते. चित्रपटाचे गाणे सुरू होताच प्रेक्षकांमधील एक सदस्य बाहेर जात होता. मनमोहन देसाईंनी त्याला विचारले, तू कुठे चालला आहेस?
त्याने उत्तर दिले - वॉशरूमला जात आहे.
देसाई म्हणाले - तुम्ही आता बाहेर जाऊ शकत नाही, चित्रपटाचे गाणे नुकतेच सुरू झाले आहे, ते ऐकून जा.
त्यांच्या बोलण्यावर त्या व्यक्तीला राग आला.
नाट्यगृहाच्या व्यवस्थापकाने मनमोहन देसाई यांना समजावून सांगितले की, येथे उपस्थित असलेले सर्व लोक त्यांना हवे तेव्हा बाहेर जाऊ शकतात. या घटनेनंतर मनमोहन देसाई यांनी कधीही चित्रपटगृहात चित्रपट पाहिला नाही.
पापा चित्रपटांप्रमाणे, तुमच्या आयुष्याचा दुसरा भाग देखील सर्वोत्तम असेल…
मनमोहन देसाई कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांच्या पत्नीचे 1979 मध्ये निधन झाले. यानंतर ते पूर्णपणे एकटे पडले. वडिलांची अवस्था पाहून मुलगा केतन म्हणाला - पापा, जसा तुमच्या चित्रपटांचा सेकंड हाफ बेस्ट असतात, तसेच तुमच्या आयुष्याची सेकंड इनिंगदेखील उत्कृष्ट असेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा.
मुलाच्या बोलण्याने त्यांना खूप धीर दिला, त्यानंतर त्यांनी 'देशप्रेमी', 'कुली'सारखे उत्कृष्ट चित्रपट केले.
जेव्हा शशी कपूर यांना वाटले की मनमोहन देसाईंना त्यांचा जीव घ्यायचा आहे
मनमोहन देसाई यांचे शशी कपूर यांच्यासोबत व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंध होते. मनमोहन देसाई यांना माझा जीव घ्यायचा आहे, असे शशी कपूर कायम म्हणत असत, असा किस्सा देखील प्रसिद्ध आहे.
शशी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, मनमोहन देसाई त्यांच्या कलाकारांना शूटिंगदरम्यान धोक्यात पाहून आनंद घ्यायचा. मनमोहन देसाईंच्या चित्रपटात जेवढे स्टंट त्यांनी केले तेवढे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीच केले नव्हते.
'आ गले लग जा' चित्रपटाच्या शेवटच्या अॅक्शन सीनचे शूटिंग सुरू होते. या अॅक्शन सिक्वेन्सच्या एका सीनमध्ये शशी कपूर यांना आरशाला धडकायचे होते. या सीनसाठी मनमोहन देसाई त्यांना म्हणाले - तुला हा सीन बॉडी डबलशिवाय शूट करायचा आहे. शशी यांनी मात्र तसे करण्यास नकार दिला.
नंतर हा सीन त्यांच्या बॉडी डबलने शूट केला, पण बॉडी डबलच्या डोक्याला खूप दुखापत झाली. आणि त्याला तब्बल 60 टाके लागले होते. यानंतर शशी पुन्हा मनमोहन देसाईंना म्हणाले होते - बघ तुला मी हा स्टंट करावा असे वाटत होते, तुला माझा जीव घ्यायचा होता.
स्पॉट बॉयच्या सांगण्यावरून सीन फायनल करण्यात आला
मनमोहन देसाईंचा प्रेक्षकांच्या मर्जीनुसार चित्रपट बनवण्यावर विश्वास होता. एकदा ते मुलगा केतनच्या चित्रपटाच्या सेटवर उपस्थित होते. चित्रपटाचा एक सीन शूट केला जात होता. तो सीन तीन वेळा रिटेक करण्यात आला. तेव्हा त्यांना तिथे उपस्थित असलेला स्पॉट बॉय दिसला, जो विचित्र चेहरा करुन उभा होता. मनमोहन देसाई यांनी त्याला बोलावून विचारले - काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का? असा चेहरा करून का उभा आहेस?
स्पॉट बॉयने उत्तर दिले की, सीनचा फक्त पहिला टेक बरोबर होता, बाकीचे शेवटचे दोन टेक योग्य नव्हते. हे ऐकून त्यांनी आपल्या मुलाला केतनला बोलावले आणि म्हणाले - हा स्पॉट बॉय म्हणतोय की पहिला सीन चांगला होता, त्यामुळे तुम्ही तो शॉट चित्रपटात समाविष्ट करा. कारण या स्पॉट बॉयप्रमाणेच सामान्य माणूस आपला प्रेक्षक आहे.
वयाच्या 52 व्या वर्षी अभिनेत्री नंदासोबत केला होता साखरपुडा
नंदा यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा मनमोहन देसाई त्यांच्या कामाने आणि सौंदर्याने खूप प्रभावित झाले होते. त्यांचा मुलगा केतन यालाही ही गोष्ट माहीत होती. पत्नी प्रभा यांचे निधन झाल्यावर मुलगा केतन आणि वहिदा रहमान यांनी त्यांना आणि नंदा यांना जवळ आणण्यास मदत केली.
एके दिवशी वहिदा रहमान यांनी मनमोहन देसाई आणि नंदा यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले. त्याचवेळी मनमोहन देसाई यांनी नंदा यांना त्यांच्या मनाची गोष्ट सांगितली. त्यानंतर 1992 मध्ये वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी नंदासोबत साखरपुडा केला. नंदा यांचेही त्यांच्यावर खूप प्रेम होते.
मनमोहन देसाई यांच्या निधनानंतर नंदा विधवेप्रमाणे जीवन जगल्या
मनमोहन देसाई यांचा साखरपुड्यानंतर 2 वर्षांतच घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. मनमोहन देसाई यांच्या निधनानंतर अभिनेत्री नंदा पूर्णपणे एकाकी पडल्या. त्यांनी घरातून बाहेर पडणे देखील बंद केले होते आणि जेव्हा त्या घराबाहेर पडत असत तेव्हा पांढरी साडी नेसत असत. मनमोहन देसाई यांच्या निधनानंतर त्यांनी इतर कुणाशीही लग्न केले नाही. संपूर्ण आयुष्य त्या विधवा महिलेप्रमाणे जगल्या.
काहींनी आत्महत्येचे कारण दिले तर काहींनी हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले
मनमोहन देसाई यांचा 1 मार्च 1994 रोजी झालेला मृत्यू रहस्यमय ठरला. त्यांनी आत्महत्या केल्याचे काही जणांनी सांगितले, तर काहींच्या मते त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. पण एवढ्या वर्षांनंतरही त्यांच्या मृत्यूचे गूढ उकललेले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.