आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याचा संघर्षाचा काळ:मनोज बाजपेयींनी 'सत्या'नंतर खरेदी केली होती पहिली कार, म्हणाले - त्याकाळात खूप कमी पैसे मिळायचे

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते मनोज बाजपेयींनी आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा त्यांना चित्रपटासाठी अतिशय कमी मानधन मिळायचे. त्यांच्याकडे मुंबईत स्वतःचे घरही नव्हते. 'सत्या' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास 8 वर्षांनी त्यांनी घर खरेदी केले होते.

अलीकडेच मनोज यांनी एका मुलाखतीत त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितले. मनोज यांनी सांगितले की, ते ज्या चित्रपटांमध्ये काम करत असे त्या चित्रपटांचे बजेट खूपच कमी असायचे, त्यामुळे त्यांना मिळणारी फी देखील खूप कमी असायची. 'सत्या'मध्ये काम केल्यानंतर पहिली कार खरेदी करू शकलो, असे मनोज यांनी सांगितले.

पूर्वी चित्रपटांमधून फारशी कमाई होत नव्हती - मनोज
मनोज यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगितले की, 'मी त्यावेळी जे चित्रपट करत होतो, त्यातून मला फारसे पैसे मिळत नव्हते. मी सत्या, शूल, झुबैदा, दिल पर मत ले यार सारखे चित्रपट केले होते. हे सर्व चित्रपट कमी बजेटचे होते. मी हे चित्रपट केले, कारण मला त्यांचा एक भाग व्हायचे होते. या चित्रपटांतून मी पैसा कमावू शकलो नाही पण त्यात काम करून माझी अभिनयाची भूक नक्कीच भागली,' असे मनोज म्हणाले.

'सत्या'नंतर पहिली गाडी घेतली
मनोज पुढे म्हणाले, 'सत्याच्या सात-आठ वर्षांनंतर मी स्वतःसाठी घर विकत घेऊ शकलो. तोपर्यंत चित्रपटातून मिळणाऱ्या पैशातून माझे दिवस ढकलणे सुरू होते. सत्या हा चित्रपट केल्यानंतर मी स्वतःसाठी फक्त एक कार घेऊ शकलो. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण तो काळ आणि ते जीवन मला आवडायचे. त्याकाळी मी कुठेही स्वतंत्रपणे फिरू शकत होतो. पण आज जेव्हा सुरक्षा रक्षक माझ्यासोबत फिरतात तेव्हा माझा जीव गुदमरतो'

1994 मध्ये पहिला ब्रेक मिळाला, प्रत्येक एपिसोडसाठी 1500 रुपये मिळायचे
मनोज बाजपेयी आज यशोशिखरावर आहेत, पण हे यश त्यांना सहजासहजी मिळालेले नाही. बिहारमधील एका साध्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

मुंबईत त्यांना ला कुणीही ओळखत नव्हते. दोन वेळचे जेवण तर दुरच पण साधा वडापावही त्यांना महाग वाटायचा. ट्रेनने प्रवास करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे.

मनोज दररोज 5 किमी पायी प्रवास करायचे. 1994 मध्ये महेश भट्ट यांनी त्यांच्या 'स्वाभिमान' या टीव्ही मालिकेतून त्यांना पहिला ब्रेक दिला होता. त्यात काम करण्यासाठी त्यांना प्रत्येक एपिसोडसाठी 1500 रुपये मिळायचे.

'भिखू म्हात्रे'च्या पात्राने मिळवून दिला होता राष्ट्रीय पुरस्कार

मनोज यांनी शेखर कपूर यांच्या 'बँडिट क्वीन' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र त्यांना खरी ओळख मिळवू दिली ती 1998 मध्ये आलेल्या राम गोपाल वर्मांच्या 'सत्या' या चित्रपटाने. या चित्रपटातील 'भिखू म्हात्रे' या पात्राने त्यांना देशभरात ओळख मिळवून दिली. या भूमिकेसाठी मनोज यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

अभिनेत्री मनोजला म्हणाली होती - तू हिरोसारखा दिसत नाहीस
संघर्षाच्या काळात मनोज यांना त्यांच्या दिसण्यावरुन अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. एक काळ होता जेव्हा मनोज यांचा लूक कुणालाच आवडत नव्हता. त्यांचा चेहरा चांगला नाही, असे लोक त्यांना अनेकदा सांगायचे. संघर्षाच्या दिवसांत एका प्रसिद्ध अभिनेत्रीने त्यांना ‘मनोज, मला तू आवडत नाहीस, तू चांगला दिसत नाहीस,' असे सांगितले होते.

मात्र, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी मनोज यांना ‘झुबैदा’ चित्रपटात कास्ट केले. या ऑफरने त्यांना धक्काच बसला. चित्रपटात राजपुत्राच्या भुमिकेसाठी मनोज यांना ऑफर देण्यात आली होती. पण या भूमिकेसाठी आपण योग्य व्यक्ती नाही, असे त्यांना वाटले होते. मनोज श्याम बेनेगल यांच्याकडे गेले आणि म्हणाले, 'तुम्ही हे का करत आहात? मला राजकुमार म्हणून कास्ट करू नका, मी राजकुमारसारखा दिसत नाही.' तेव्हा बेनेगल यांनी राजपुत्राचा एक फोटो काढला आणि विचारले 'खऱ्या आयुष्यात राजपुत्र त्यांच्यापेक्षा वेगळा दिसतो का?'

मनोज यांच्या आगामी चित्रपटावरून वादंग, आसाराम ट्रस्टने पाठवली नोटिस
मनोज बाजपेयींच्या आगामी 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. 8 मे रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आसाराम बापू ट्रस्टने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. खरं तर, चित्रपटात एका 16 वर्षांच्या मुलीवर एका भोंदूबाबाने अत्याचार केल्याचे दाखवण्यात आले आहे.

हा चित्रपट सत्य घटनांनी प्रेरित असल्याचे डिस्क्लेमरमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे. चित्रपटात दिसणाऱ्या भोंदूबाबाचा लूक आसारामसारखा आहे. ट्रस्टच्या वकिलांनी कोर्टाकडे चित्रपटाचे प्रदर्शन आणि प्रमोशन थांबवण्याची विनंती केली आहे. हा चित्रपट 23 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE 5 वर प्रदर्शित होणार आहे.